Adi's Journal

Pieces of my thourhgs

वर्षाऋतू …..ऋतू नवजीवनाचा…..

उन्हाळ्याचा शेवट…मे महिन्याचे शेवटचे दिवस. सगळीकडे नुसत्या सुकाल्याच्या खुणा पसरलेल्या. भेगाळलेली जमीन, झाडे जणू जळून गेलेली, गवत वळून सोने झालेले, प्राण्यांची अन्न-पाण्यासाठी वणवण चालू. लोक पंख्याकडे बघत उकाडा दूर न केल्याबद्दल त्याला दोष देत घामाघूम होतायत. सूर्य तर केवळ जणू जगाला भाजून काढण्यासाठीच तळपतोय. सगळेच लोक घामेजून पाण्याच्या आणि शीतपेयांच्या शोधात आहेत. कुत्री मांजरांसारखी जनावर तर सार्वजनिक नळातून गळणाऱ्या एकेका थेंबावर तुटून पडतात. झरे, ओहाळ, नद्या-नाले पार आटून गेलेत. जगातील सगळ्यात बुद्धिमान समजणाऱ्या प्राण्यांनी बनवलेले सगळे पाणीसाठे खोल गेलेत. आणि बिचारा काहीच करू शकत नाही. नाइलाजानी  पाणीकपात जाहीर झालीये. थोडक्यात सगळीकडे औदासीन्य पसरलं आहे आणि सगळे फक्त आकाशाकडे डोळे लावून त्या काळ्या मेघाची प्रतीक्षा करत आहेत. आणि तो मात्र क्षितिजावरही साध दर्शनसुद्धा देण्याचे कष्ट घेत नाही. कायम सगळ्यांपासून लपत, लांब जात, चिडवत असतो. अजून आतुरतेने वाट बघायला भाग पडतो.

“अरे तो आला रे!!!!!!!!!!!! तो बघा तिथे….” ज्याची सगळे आतुरतेने वाट बघत होते त्या काळ्या ढगाला दूर क्षितिजावर बघून सगळे उल्हासीत झाले. पण थोड्याच वेळात निराशेच्या निश्वासांशिवाय काहीच उरले नाही….मेघ जणू लपाछपी खेळल्या सारखा हुलकावणी देऊन दूर कुठेतरी निघून गेला.सगळे आपले नशिबाला दोष देत बसले. त्याशिवाय त्यांच्या हातात होते तरी काय? पण थोड्याच दिवसात श्री. मेघ आले आणि या वेळी सगळ्या कुटुंब काबिल्यासकट आले आणि चांगले ३-४ महिने मुक्कामाच्या तयारीनेच आले. सगळ्या कुटुंबाला बघून सगळेच आनंदी झाले. झटक्यात वातावरण बदलले सगळीकडे उत्साह संचरला. थंड वारे वाहू लागले. सगळे आकाश व्यापून मेघ कुटुंबीयांनी पृथ्वीवासियांसाठी सावली धरली. त्यांच्या मागे गेलेला  सूर्य आपले साम्राज्य धुळीला मिळाल्याने निराश झालेला दिसत होता. श्री. मेघांनी त्याचे साम्राज्य हस्तगत केले. भेगाळलेली कोरडी जमीन आता अजून भेगांचा त्रास नाही असा विचार करत होती तर प्राणी अन्नपाण्याची वणवण संपेल या विचारात. माणसे आदल्या दिवशीच्या पाणी कपातीमुळे रिकाम्या असलेल्या नळांना पाणी कधी येईल याची वाट आता बघायची नाही या विचारात. सगळेच जण आता सम्राट मेघ पृथ्वीवर जीवनाचा पहिला थेंब कधी पडतात याकडे चातकासारखे डोळे लावून बसले आहेत. आणि अखेर तो क्षण आला, मेघांच्या गर्जना सुरु झाल्या जणू ते सगळ्या जनतेला ओरडून सांगत आहेत, “आम्ही आपल्या मागण्या ऐकल्या, साम्राज्य हाती घेतल्यावरची पहिली घोषणा आम्ही करत आहोत. प्रजाजनहो, लवकरच आम्ही आपल्यावर पर्जन्यवृष्टी करून आपणाला उपकृत करू.”

आणि घोषणा झाल्यावर अगदी थोड्याच कालावधीत, दिलेल्या आश्वासनानुसार सम्राटानी पृथ्वीवर जीवनाचा सडा पडायला सुरुवात केली. ज्याच्यासाठी ही पृथ्वी आसुसली होती तो पर्जन्यवर्षाव  होत होता. सगळे प्रजाजन खुश झाले. झाडे जणू प्रदीर्घ आणि शांत झोपेतून उठल्यासारखे ताजेतवाने झाली. आपल्या भेगांच्या जखमा आता भरल्या जाणार या विचारांनी जमीन कोण आनंदात होती. इतकी कि लगेच तिनी हिरवागार शालू नेसून आनंद व्यक्त सुद्धा करून दाखवला. झरे, ओहाळ डोंगरांच्या अंगाखांद्यावरून उसळ्या मारत आपला आनंद व्यक्त करत होते. नद्या आनंदानी दुथड्या भरून जीवन वितरणाचे आपले कार्य पार पाडण्यासाठी वेगात धावत होत्या. तहानलेले सारे जीव आपली तहान त्या मधुर पाण्यानी शांत करत होते. सम्राट मेघांच्या साम्राज्यातील सगळे प्रजाजन सुखी होते आणि सम्राटाच्या दीर्घ कारकिर्दीची मनोमन कामना करत होते…..

Related Posts

5 thoughts on “वर्षाऋतू …..ऋतू नवजीवनाचा…..

Leave a Reply