या तळ्याच्या खोल गर्भी

बऱ्याच वेळी आपल्या मनात खोलवर भावनांचे कल्लोळ सुरू असतात पण रोजच्या आयुष्यात सामोरे जावे लागणाऱ्या परिस्थितीमुळे आपण त्यांना खोलवरच दाबून ठेवत असतो. पण आत कुठे तरी हा सगळा ताण, राग, उद्वेग सारं काही खदखदत असते. पण चेहऱ्यावर आपण ओढलेला असतो तो शांत दिसणारा मुखवटा. अगदी या निश्चल तळ्यासारखा. याच भावनेतून सुचलेली ही कविता.


या तळ्याच्या खोल गर्भी,
गूढ काही दडवलेले.
उसळूनी येइल झणी ते,
शांत जरी ते भासताहे .

थंडशा पाण्या मधेही,
दाह तो ना शांत झाला.
अजूनही फुलतोच आहे,
धुमसणारा हा निखारा.

भोवतीच्या या तळ्याची,
वाफ होईल त्या क्षणाला.
ज्या क्षणी लागेल बत्ती,
अन् फुटे अंगार सारा…


तळ्याच्या काठावरून

नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीच्या मागच्या बाजूला असलेला हा पाझर तलाव. अतिशय शांत आणि हिरवागार असणारा हा परिसर नाशिकमधील एक छान जागा आहे. तळ्याच्या बाजूने जाणारा रस्ता तुम्हाला सातपूर MIDC मध्ये घेऊन जाईल. कधी गेलात नाशिकला तर एखादी चक्कर नक्की टाका. नाशिककरांच्या भाषेत सांगायचे तर एक पट्टा मारून या!

माझ्या आणखी इतर कविता वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

%d bloggers like this: