भटक्या…

दुर्गभ्रमंती म्हटलं की तरुणाईच रक्त सळसळत. आणि पावसाळ्यात तर जास्तीच. पण काही वर्षांपूर्वी जर हा विषय कुणी काढला असता तर एका म्हाताऱ्याचं रक्त नक्कीच सळसळलं असतं. तुम्ही म्हणाल काय चेष्टा करता काय. म्हातारा कशाला दुर्गभ्रमंती मध्ये उडी मारेल. अर्थात तुमचा प्रश्न स्वाभाविक आहे. तुम्हा आम्हालाच साधी पार्वती चढायची म्हटलं तर ऐन तारुण्यात धाप लागते. परंतु हा म्हातारा अगदी विलक्षण होता. वय बघीतलं तर म्हाताराच म्हणायचं पण शरीर आणि त्यापेक्षाही मनानी हा माणूस चिरतरुण होता.

गोपाळ नीलकंठ हा दांडेकरांच्या कुटुंबातील म्हातारा दुर्ग म्हटलं रे म्हटलं कि अर्ध्या रात्रीतही उठून सर्वांच्या पुढे चालू लागेल. खांद्याला पिशवी लटकवायची, तहान लाडू भूक लाडूचा शिधा उचलायचा आणि चालू लागायचं असा गो नी दां चा नित्याचा कार्यक्रम. किल्ला कुठलाही असो, वेळ, काळ, ऋतू, कोणताही असला तरी गो नी दां चा उत्साह तेवढाच. आणि असंही नाही कि एकटेच भटकतील, दर वेळी तरूणांच एखादा टोळक बरोबर घ्यायचं कधी एखादाच सोबती घ्यायचा आणि एखाद्या किल्ल्यावर चढाई करायची.

नीलकंठ आणि अंबिका दांडेकरांच्या पोटी जन्माला आलेल्या बारा भावंडामधले एक गोपाळ. ८ जुलै १९१६ साली अमरावती जिल्ह्यात गो नि दां चा जन्म झाला. विदर्भात नागपूर येथे शिक्षण घेत असताना वयाच्या तेराव्या वर्षी महात्मा गांधींच्या तरुणांना दिलेल्या हाकेला उत्तर म्हणून हा मुलगा घरातून जो पाळला तो फारसा घरात परत कधी टिकलाच नाही. त्यांचा जन्म झाला तोच मुळी दुर्गभ्रमणासाठी असं म्हटल्यास काहीच गैर होणार नाही. हा माणूस घरी कमी आणि गड-किल्ल्यांवरच जास्त सापडायचा. लेखन कार्यही एकीकडे चालू होतंच. त्याच दरम्यान त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला आणि संघाचे प्रचारक म्हणूनही त्यांनी भटकंतीची मिळालेली संधी सोडली नाही. संघाच्या विचारांचा पडलेला प्रभाव आणि राष्ट्रीयत्वाची तीव्र जाणीव जी एकदा झाली ती आयुष्यभर जाणवत राहिली. संघ बंदी दरम्यानचे सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गाडगे बाबांचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग तर घेतलाच पण स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये क्रांतीकारकांना भूमिगत असताना मदत करून स्वातंत्र्याच्या प्रयत्नांनाही त्यांनी हातभार लावला.

आयुष्यात ऐहिक गरजा भागावाण्यासाठीचे एक साधन म्हणूनच बहुदा त्यांनी नोकरी केली. आयुष्यातील पहिली नोकरी केली ती पुण्याच्या “इतिहास संशोधन मंडळा”त संदर्भांच्या नावानिशी याद्या करण्याची. त्यातही त्यांनी ऐतिहासिक संदर्भ मिळवणे हा आपला एक उद्देश सफल करून घेतलाच. किंबहुना त्याकरताच हि नोकरी पत्करली. पगार मिळवला तो अखंड रुपये ४. पुढे लग्न झाले आणि संसाराच्या वाढत्या गरजांपायी ते औंध संस्थानातून प्रकाशित होणाऱ्या पुरुषार्थ आणि वैदिक धर्म या मासिकांचे उपसंपादक म्हणून कार्यरत झाले. वैदिक साहित्यांचा गाढा अभ्यास असलेल्या पंडित सातवळेकरांच्या हाताखाली गो नि दां काम करत होते. त्यांच्याकडून खूप काही शिकत होते. कीर्तन कलेचा अभ्यास आणि सादरीकरण चालू होते. भूमिगत क्रांतीकारकांना मदत चालू होती या मुळेच पुढे त्यांना औंध सोडावे लागले.

गो नी दां कडे अनेकविध ऐतिहासिक गोष्टी होत्या, तसं बघीतलं निरुपयोगी, पण इतिहासाच्या वेडापायी अत्यंत मौल्यवान. तोफेचा तुटका गोळा, अनेक कागद पत्रे आणि बरेच काही. गो नी दां चे दुर्गप्रेम त्यांच्या लिखाणातून दिसून येते, त्यांच्या भ्रमंतीच्या आठवणी त्यांनी पुस्तकरूपात प्रसिद्ध केल्या आहेत. काही किल्ल्यांशी गो नी दां चा खास जिव्हाळा होता. रायगड, राजमाची, पुरंदर हि त्यातली ठळक नावं. राजमाचीवर त्यांच विशेष प्रेम. तिथेच त्यांना शितू दिसली, पावनेकाठ्चा धोंडी सापडला, जैत – रे – जैत ची सगळी पात्र त्यांच्या डोळ्यासमोर आली. गो नी एकतर किल्ल्यावर सापडायचे नाहीतर काही लिहित असलेलेल दिसायचे. औंध सोडल्यावर लिखाण हेच त्यांनी उपजीविकेचे साधन म्हणून निवडले. अनेक नियतकालिकांमधून लेख लिहिले ज्यांचे संग्रह पुढे प्रसिद्ध झाले आणि तरुणांना दुर्गभ्रमणासाठी मार्गदर्शक झाले. दुर्ग भ्रमणगाथा, दुर्ग दर्शन, किल्ले, महाराष्ट्राची धारातीर्थे, दक्षिण वारा या त्यांच्या भटकंतीवृत्तांना काही तोड नाही.

गो नी दां च्या कादंबऱ्या अत्यंत रसाळ आणि खिळवून ठेवणाऱ्या. पावनेकाठ्चा धोंडी, शितू, माचीवारचा बुधा, झुंजार माची, छत्रपती शिवारायांवराची पाच भागात लिहिलेली कादंबरी, तांबडफुटी, अशा अनेक रसाळ कादंबऱ्या लिहून त्यांनी साहित्य सेवा केली आहे. संत चरित्रात्मक लेखनातून त्या आदरणीय संतांना जणू त्यांनी वंदनच केला आहे. दास डोंगरी राहतो, आनंदवन भुवनी, ही समर्थांवर, मोगरा फुलाला हे संत ज्ञानेश्वरांचे, तुका आकाश एवढा हे तुकाराम महाराजांचे तर देवकीनंदन गोपाळा हे गाडगे महाराजांचे. सारीच चरित्रे अत्यंत मधाळ, गोड. अर्थात संतांचीच ती गोड असणारच पण गो नी दां नी लिहिली आहेत म्हणून त्या कार्याला गोडी तशी अधिकच आली आहे. त्यांच्या जैत रे जैत वर पुढे जब्बार पटेलांचा अत्यंत गाजलेला चित्रपट आला.

स्मरण गाथा, आपल्या आयुष्यातील साऱ्या कडू गोड स्मरणांनी समृद्ध असलेले आत्मचरित्र गो नी दांनी सिद्ध केले ते आपल्याकडील अनुभवाची शिदोरी पुढच्या पिढीला देण्यासाठीच. या त्यांच्या अनुभवांसाठी त्यांना १९७६ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९८१ सालच्या अकोल्याच्या साहित्य संमेलनाचे गो नी दां अध्यक्ष होते. १९९२ सालच्या डिसेम्बर मध्ये पुणे विद्यापिठानी त्यांना मानद डी. लीट्. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.

१ जून १९९८ रोजी जणू आता भूतलावरील किल्ले मनसोक्त भटकून झाले, आता स्वर्गातील दुर्ग भ्रमंती करावी हा विचार करून गो नी दां हे जग सोडून गेले. आज २०११ पर्यंत त्यांनी तिथलेही सारेच दुर्ग पादाक्रांत केले असतील. त्यांच्या साहित्यांनी त्यांच्या भ्रमण गाथांनी सबंध महाराष्ट्राला भटकण्याची एक नवीन दृष्टी दिली हे नश्चितच. त्या वृत्तीच्या रूपांनी गो नी दां आपल्या सगळ्यांबरोबर पुनःपुन्हा लाडक्या किल्ल्यांना भेटी देण्यासाठी येताच असतात आणि येत राहतील…

Leave a Reply

Proudly powered by WordPress | Theme: Baskerville 2 by Anders Noren.

Up ↑

Privacy Preference Center

Necessary

Advertising

Analytics

Other

%d bloggers like this: