अज्ञातसफर
तांबडं फटफटायच्याही आधी, मी निघालो आहे,
पायाखालची वाट सोडून, सरावाचा रस्ता मोडून.
धुक्याची चादर ओढलेल्या किंचित अंधाऱ्या गल्ल्या,
ओढतायत मला, हाक मारतायत खुणावून.
माझीही पावलं आपोआपच वळली, उत्सुकतेने,
मनातल्या साऱ्या शंका खोडून.
नुकतीच उगवतीला केशरी किनार आली,
अन आभाळभर पसरली, अंधाराला चिरून.
अज्ञाताचे पडदे बाजूला सारत त्या गल्ल्या फिरत होतो,
बहुदा, मुळ मानवी स्वभावाला धरून.
माझ्या हिस्स्याचे धुके मनसोक्त पीत होतो,
जोवर मन जात नाही भरून.
उन्हं तापू लागली तशी धुक्याची मखमली चादरही विरली,
गावालाही जाग आली आळोखे पिळोखे देऊन.
अज्ञातातली समाधी भंगली, एकांत संपवला
हे अज्ञात जग ज्ञात असलेल्यांनी धक्का देऊन.
परतीचा प्रवास अन ओळखीच्या खुणांचा शोध सुरु झाला,
उद्याच्या अज्ञातसफरीचा निश्चय करून…
Discover more from Adi's Journal
Subscribe to get the latest posts sent to your email.