त्या संध्याकाळी रोजच्यासारखाच मी रामण्णाच्या त्या खास कॅफे मध्ये बसलो होतो. माझ्या अत्यंत आवडत्या अशा कॉफीचा आस्वाद घेत. तशा महत्वाच्या पण फारशी वर्दळ नसलेल्या एका रस्त्याच्या कोपऱ्यावर रामण्णानी त्याचे ‘मद्रास कॅफे’ चालू केले होते. ऑफिस संपल की रामण्णाच्या ‘मद्रास’मध्ये यायचं, रोजचीच ती खिडकीतली जागा पकडायची, आणि बॅगतून पुस्तक काढून वाचत बसायचं. तितक्यात रामण्णा कॉफी घेऊन यायचा. त्या गरम वाफाळत्या कॉफीच्या वासानी दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. मगमधल्या कॉफीने तळ गाठेपर्यंत चांगला अर्धा पाउण तास सहज जायचा. कॉफी संपली की पुस्तक बंद आणि रामण्णाला धन्यवाद आणि पैसे देऊन मी घरच्या वाटेला लागायचो.
इथे नोकरीला आल्या दिवसापासून असलेले गेल्या चार वर्षांचं हे रोजचं वेळापत्रक त्या मंगळवारनंतर कोलमडणार आहे याची मला किंचितही कल्पना नव्हती. कॅफे मध्ये बसून नुकत्याच सुरु केलेल्या अगाथा ख्रिस्तीच्या नव्या पुस्तकात डोकं घातलेले असतानाच कोणीसे दार उघडून आत आले आणि वाऱ्यावर कुठूनसा जाईच्या फुलांचा वास आला. रामण्णाच्या ताज्या फिल्टर कॉफीच्या वासाला बाजूला करून माझ्या नाकापर्यंत तो सुगंध पोचला आणि क्षणभर का होईना मन एकदम प्रसन्न झालं. पुढल्या क्षणी कॅफेचे दार बंद झालं आणि कॅफे पुन्हा कॉफीच्या वासानी भरून गेला.
पुढला आठवडाभर संध्याकाळ फक्त कॉफी आणि पुस्तकांबरोबरच गेली पण पुन्हा एकदा मंगळवार संध्याकाळ आली ती तोच मंद जाईचा सुगंध घेऊन. वाऱ्यावर सुगंध येताच उघडल्या दाराकडे नजर टाकली आणि हातातला मग तसाच राहिला. जणू जाईची वेलच माणसाचे रूप घेऊन रामण्णाची कॉफी प्यायला आली असल्याचा भास झाला. दोन्ही हातात काही न काही समान असल्यानी डाव्या गालावर जरा जास्तच पुढे पुढे करणारी बट तिला मानेला झटका देऊनच मागे सरावी लागली. रिकामी जागा शोधण्यासाठी तिनी कॅफेभर भिरभिरती नजर टाकली आणि हातातलं व्हायोलिन आणि बॅग सावरत जाई माझ्या शेजारच्या टेबलावर येऊन बसली. ते व्हायोलिनच ह्या मंगळवारच कोडं सोडवत होत. कोपऱ्यावरच बुवांचा फक्त मंगळवारचा व्हायोलिनचा क्लास असतो.
तिच्या गोऱ्या रंगावर अंगातल्या कुर्त्याचा एक वेगळाच निळा रंग खूप खुलून दिसत होता. हात फायनली रिकामा झाल्यानी तिनी पुढे आलेली बट नीट कानामागे सरकवली. उंच मानेवर तिच्या कानातले नाजूक चंदेरी झुमके खूपच उठून दिसत होते. पहिल्यांदाच आल्यामुळे ती आजूबाजूला नजर टाकत कॅफे तिच्या टपोऱ्या बोलक्या डोळ्यात भरून घेत होती. कॅफे बघता बघता तिची नजर जेव्हा माझ्याकडे वळू लागली तेव्हा जरा नाइलजनीच मी पुन्हा पुस्तकात डोकं घातलं.
दोन मिनिटांनी जेव्हा तिनी रामण्णाला कॉफीची ऑर्डर दिली तेव्हा मी चमकून वर बघितलं. आणि बघितल्यावर बसलेला आश्चर्याचा धक्का हा ऑर्डर ऐक्ल्यावरच्या पेक्षा मोठा होता. आमची कॉफीची ऑर्डरच काय पण आम्ही उघडलेले पुस्तक पण एकच होतं. इतका धक्का पचवून तिची नजर पुन्हा माझ्याकडे वळू लागताच मला पुन्हा पुस्तकात डोकं खुपसणं खूप अवघड गेलं.
कदाचित तिनेही माझ्या हातातलं पुस्तक पाहिलं असावं, कारण मधेच कॉफीचा घोट घेऊन मग खाली ठेवताना आमची नजरानजर झाली आणि गरिबावर मोत्याचं चांदणं बरसलं. मी हलकेच मग उंचावत हसून तिला उत्तर दिले. पहिल्याच दिवशी इथपर्यंत मजल पोहोचवल्याबद्दल त्या अगाथालाच धन्यवाद द्यायला हवेत. कॉफी संपूनही जाई निघेपर्यंत थांबायची मी मनोमन तयारी केली होती. पण पुढच्या एका मिटिंगसाठी लावलेला अलार्म वाजला आणि मला भेटायला येणाऱ्या इसमावर चडफडत मी कॅफे सोडला आणि घराकडे चालू लागलो.
क्रमशः….
Leave a Reply