रिक्त मी

आज बरोबर वर्ष झालं नाही? अशाच एका धुंवाधार कोसळणाऱ्या पावसात मला सोडून तू परत फिरलास. सवयीप्रमाणे तू गल्लीच्या कोपर्‍यावर दिसेनासा होईपर्यंत मी तशीच दारात उभी होते. तू कोपऱ्यावर वळलास पण मी मात्र तिथेच उभी होते. किती वेळ, माहित नाही. गेले दोन तास तू जो शब्दांचा समुद्र माझ्यासमोर रिता केलास तो आत्ता कुठे माझ्या डोक्यात शिरत होता. खरं तर पहिल्या दोन वाक्यातच माझं डोकं पूर्ण बधीर झालं होतं. अगदी एखाद्या चित्रपटात दाखवतात न तसं. आजूबाजूला एक विचित्र शांतता, डोळ्याच्या समोर धूसर होत चाललेल्या आजूबाजूच्या निशब्द हालचाली. सुन्न मन आणि निर्विकार चेहेरा. खरंच निर्विकार होता का रे? कदाचित अविश्वास डोकावत असेल कुठून तरी. अर्थात तुझ्या लक्षातही आलं नसेल म्हणा. मनानी तू केव्हाच पुढे निघून गेला होतास. मुक्त होतास. ‘आपले’पणाचे बंध कधी तुटले ते मला कळलेच नाही. तुटले, की तू तोडलेस? विचारीन म्हणते कधी भेटलास तर.

गेले वर्षभर वाटत होतं, गेला आहेस मला सोडून. एका खूप खोल पोकळीमध्ये ढकलून. इतकं खोल की दिवसाचा प्रखर सूर्य पण एखाद्या दूरच्या ताऱ्यासारखा वाटायचा. आणि रात्र तर काळीकभिन्न, म्हटलं तर एकाकी अन् म्हटलं तर आपण जोडीनी जपलेल्या आठवांनी भरलेली. त्या आठवणींतून पण तू कुठेसा निघून जात होतास. त्या दिवशी पावसात धूसर होत गेलास ना, अगदी तसाच. भर पावसात निघून गेलास मला घराशी सोडून. किंचितही मागे वळून न पाहता. अर्थात तुझा तो स्वभाव नव्हताच कधी. तुझ्या मनानी तू एकदा पुढे गेलास की मागे जगबुडी झाली तरी तू उलटा फिरायचा नाहीस. त्या दिवशी दारात थिजवल्यासारखी भिजत उभी असलेली मी खरं तर ढसाढसा रडत होते. तेव्हा पावसानी अश्रू लपवले, आणि गेलं वर्षभर रोज दिवसभर आतल्या आत, मनाला भिजवणारे अश्रू रात्रीच्या काळोखात उशीला अभिषेक घालत होते.

आजची सकाळपण पुन्हा एकदा गालांवरचे अश्रू मनात दडवूनच सुरु झाली. पण मनात भरून आलेल्या आठवणी जणू काही त्या आकाशानी पण साठवून ठेवल्या होत्या की काय. असे काही भरून आले होते, जणू सूर्योदय न होता सुर्यास्तच झाला आहे. आणि मग सबंध दिवस थैमान, बाहेर पावसाचे आणि माझ्या आत विचारांचे. पण आता सारं सारं शांत झालंय. अगदी स्तब्ध. दिवसभर झालेल्या थैमानानी, सारं मळभ दूर झालंय. मी आणि आभाळ दोन्हीही पूर्णपणे रिक्त. होय, रिक्त आणि मुक्त सुद्धा.

Leave a Reply

%d bloggers like this: