Adi's Journal

Pieces of my thourhgs

सूर

music-159868_1280कधीकधी आठवण येते त्या बंदीशींची,
त्या सुरांची ज्यात माझं मन पार बुडून गेलेलं असायचं,
त्याच्या डोळ्यातली चमक वाटायची एखादी सळसळत गेलेली तान तर त्या पापण्यांची उगाच होणारी फडफड ऐकवायची एखादी लकेर.
त्याच्या कटाक्षात भासायचे मालकंसाचे आरोह अवरोह

त्याच्या नुसत्या अस्तित्वानेच माझ्या मनात संगीत भरून जात असे.
अन् माझ्या हृदयाची धडधड त्याच्या हृदयाच्या धडधडीच्या तालाशी जुळवून घेई. त्या नाजूक क्षणात सुद्धा ऐकू येई एखादी बनारसी ठुमरी जेव्हा आमची शरीरे बोलत होती.

इतकंच कशाला त्याच्या निःशब्दतेत सुद्धा एक अनाहत नाद घुमत होता.

या संगीताने माझ्यातली पोकळी भरून काढली आणि आमच्यातील द्वैत संपवलं. मेंदूतील कंपनांनी या सुरांशी जुळवून घेतलं आणि कानात हे सूर अखंड वाजत राहिले. त्याच्या संगीताची इतकी धुंदी होती की जणू त्या सुरांच्या बेड्याच पायी पडल्या.

पण, पण या मैफिलीत सुरसंगत माझी होती, त्याच्या मागे बसून त्या सुरवटींचा पाठलाग करणं हेच जणू माझं प्राक्तन होतं. त्याच्या दुर्गम अशा लायकारीला शरण जाणं भागच होतं म्हणा.

त्यानी उभ्या केलेल्या या ख्यालविश्वात माझे मंद्र आणि तयार सूर सुद्धा जागच्या जागी चपखल बसले होते, कारण, कारण हे विश्व आमचं होतं. ते सूर “आम्ही” होतो…
~~~
मूळ इंग्रजी मुक्तछंद
– आरुषी सिंघ

भावानुवाद
-आदित्य साठे

Related Posts

Leave a Reply