शब्दप्रभु बाकीबाब
माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे….
आपल्या मातृभूमीचे कौतुक सांगणाऱ्या या छान गेय ओव्यांनी शाळेत असताना बाकीबाब यांचा परिचय आम्हा शाळकरी पोरांना पहिल्यांदा करून दिला. पण “बोरकर” ही काय झिंग आणणारी नशा आहे फार नंतर कळलं.
आज ३० नोव्हेंबर, बाकीबाब म्हणजेच बा भ बोरकर यांचा जन्मदिवस.
या गोवेकर मधुर रसाळ पद्मश्री शब्दप्रभूच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या सौंदर्याचा आस्वाद देणाऱ्या असंख्य मराठी, कोकणी कवितांपैकी एक
समुद्र बिलोरी ऐना
~~~~
समुद्र बिलोरी ऐना,
सृष्टीला पाचवा म्हैना
वाकले माडांचे माथे ,
चांदणे पाण्यात न्हाते
आकाशदिवे लावीत आली,
कार्तिक नौमीची रैना
कटीस अंजिरी नेसू ,
गालात मिस्कील हसू
मयूरपंखी मधुरडंखी,
उडाली गोरटी मैना
लावण्य जातसे उतू,
वायाच चालला ऋतू
अशाच वेळी गेलीस का तू,
करून जीवाची दैना….
~~~~
– बा भ बोरकर