झुळुक
सायंकाळी आली दुरुनी,
झुळुक हवेची मखमाली,
केसांमधुनी वाट काढता,
शब्द काहीसे गुणगुणली.
दूर राहते तुझ्याहून जरी.
आठवणी त्या मज छळती.
रात्रंदिन मी वाट पाहते,
तुझ्या वाटेला विचार की.
न राहोनी आज या क्षणी
सांगितले या वाऱ्याला,
घेऊन जा तू हा सांगावा,
ये भेटाया सख्या मला.
इतुके बोलून झुळुक हवेची,
क्षण एकच तो घुटमळली,
निमिष संपता मागे फिरुनी
उत्तर माझे घेऊन गेली.