सुषमा स्वराज: एक मायाळू करारी दीपस्तंभ

देशाच्या संसदेत ऐतिहासिक निर्णय घेतले जात असतांना देशाच्या असामान्य भूतपूर्व परराष्ट्रमंत्री अचानक अशी exit घेतील याची पुसटशी शंकादेखील कधी मनात आली नसती. ६ ऑगस्ट च्या संध्याकाळी “आयुष्यात याच दिवसाची वाट पाहत होते” असे उद्गार काढणाऱ्या सुषमा स्वराजजींना अखेरची चाहूल लागली होती का काय अशीही शंका मनात येते.
आज ज्या भावना या बातमीनंतर मनात दाटून येत आहेत त्या भावना आजच्या जगात कोणत्या राजकीय नेत्यासाठी येतील असे मला व्यक्तीशः वाटत नाही. सुष्मजींची राजकीय कारकीर्द जवळून पहिली म्हणणेच काय पण गेल्या सरकारच्या काळात त्यांच्या परराष्ट्र मंत्रीपदाची कारकिर्दही खूप अभ्यासली असेही मी म्हणणे धडधडीत खोटे ठरेल . पण ज्या काही थोड्याफार वेळेला या महान स्त्रीच्या ओघवत्या वाणीचा आस्वाद घेतला त्यावेळी मन भरून आलं यात शंका नाही मग ती भाषा कोणतीही असो. हिंदी, इंग्रजी इतकेच काय, मध्यंतरी युट्युबवर त्यांचे एक संस्कृत बद्दलचे भाषणही ऐकले होते तेही तितकेच ओजस्वी होते. त्यांचे लोकसभेतील वाक्पटूत्व पाहतांना जाणवणारी मुद्देसूदता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा संयुक्त राष्ट्र संघात बोलतांना दिसून येणारी मुरब्बी मुत्सद्देगिरी खूप प्रेरक आणि आकर्षक होती. स्वच्छ पोशाख, कायम प्रसन्न हास्य असलेला चेहरा, यासह सुषमाजींचे दर्शन झाले की त्यांच्याभोवती कायम एक वलय असल्यासारखे वाटायचे. आजही त्यांच्या फोटोकडे पाहिलं की एक ममत्व जाणवत, वाटतं कधीही एक आश्वासक हात पुढे येईल. पण ते आश्वासक हास्य आता भारतीयांपासून दूर गेलं.
आजवर इतक्या उशिरा रात्री मी कोणतीही पोस्ट कोणत्याही सोशल मीडियावर केलेली नाही पण आजच्या भावनांना वाट मोकळी करून देण्याशिवाय झोप लागणार नाही याची मला खात्री आहे. या दीपस्तंभाला दिशादर्शक म्हणून ठेवून ध्येयाकडे मार्गक्रमण करणे हीच त्यांना योग्य आदरांजली ठरेल….