Undelivered letters – पुस्तक परिचय

“साठेsss….” अशी लांबलचक आरोळी देऊन दारावरल्या टपालपेटीत पत्र टाकणारा पोस्टमन मला आजही आठवतो. पण वीस वर्षांपूर्वी पोचवायला हवी असलेली पत्र जेव्हा एखाद्या पोस्टमनला अचानक अनपेक्षितपणे सापडत असतील तेव्हा काय होत असेल? दोन दशकांच्या काळात पत्र ज्यांच्यापर्यंत पोहोचायला हवी होती त्यांचं पुढे काय झालं असेल? आणि आत्ता त्यांना ही पत्र पोहोचवली तर त्यांना काय वाटेल? हे सारे प्रश्न तुम्हाला पडलेत ना?

PicsArt_08-12-10.51.59मग जे. आल्कम ( J. Alchem) यांनी लिहिलेलं Undelivered letters हे छोटसं पुस्तक तुम्हाला नक्की खिळवून ठेवेल. पोस्टमन अरॉन आणि त्याची पत्नी सारा यांना अचानक ही न पोहीचवलेली पत्रे सापडतात आणि सुरू होतो एक नवं द्वंद्व समोर उभं ठाकतं. पत्र पोहोचवावी की न पोहोचवावी. ज्यांच्या नावांनी ही पत्र आहेत ते काय म्हणतील? त्यांना काय वाटेल? आपल्या हलगर्जीपणाने झालेल्या या दोन दशकांच्या उशिरामुळे काही भयंकर तर नसेल घडले? या साऱ्या प्रश्नांच्या गदारोळात अडकलेल्या अरॉनची ही गोष्ट आहे छोटीशीच पण थेट मनाला जाऊन भिडते.

दोन दशकांच्या वेगवेगळ्या काळपट्टयावर चालणारी ह्या पत्रांची गोष्ट आपल्याला ज्यांची ही पत्रे असतात त्या वेगवेगळ्या पात्रांनाही भेटवते. एक वेगळ्याच पद्धतीने गुंफलेल्या या वेगवेगळ्या पात्रकथा, ‘न पोहोचवलेल्या’ पत्रांच्या धाग्याने छान घट्ट विणलेली आहे. एखाद्या निवांत सुट्टीच्या दिवशी हे पुस्तक हाती घेतलं तर एक बैठकीतच तुम्ही संपवूनच खाली ठेवाल. अगदी छोटेखानी असलेलं पुस्तक आपल्या अगदी साध्या मुखपृष्ठानी तुम्हाला नक्की खुणावून घेईल यात शंका नाही.

पु ल देशपांडे म्हटले होते की “पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली तुमची मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल”. जणू हीच भावना मनात ठेवून जे आल्कमनी प्रत्येक व्यक्तिरेखेला कोणती न कोणती कला दिली आहे. चित्रकला, लेखन, संगीत अशा अनेक कला आणि त्या जोपासणारे कलाकार निरनिराळ्या व्यक्तिरेखांच्या रुपात आल्कमनि अप्रतिम गुंफल्या आहेत. आल्कमची साधी सोपी भाषा दोन वेगवेगळ्या काळपट्ट्यांची गुंफण या पुस्तकाला एक वेगळाच रंग देतं.

अरॉन त्याला सापडलेली पत्र पोहोचवतो का? पत्र मिळाल्यावर लोकांची काय प्रतिक्रिया असते? सारा ज्या पत्राची वाट आतुरतेने कित्येक वर्ष पाहत असते ते तिला मिळते का? या साऱ्याची उत्तरं या पुस्तकात दडली आहेत. तेव्हा नक्कीच तुम्ही हे पुस्तक मिळवा आणि जरूर वाचा.

My rating: 4/5

Kindle version
Publisher: Westland Publications Ltd.
Language: English

Leave a Reply

Privacy Preference Center

Necessary

Advertising

Analytics

Other

%d bloggers like this: