जात

जात म्हणजे जात म्हणजे जात असते,
तुमच्या आमच्या मनातनं ती कधीच जात नसते.
कारण, जात म्हणजे जात म्हणजे जात असते.

मुल जन्मल्याबरोबरच त्याला जात येते,
त्याच्या कपाळीचा शिक्का होऊन बसते,
खरं तर त्याला काहीच कळत नसते,
पण, जात म्हणजे जात म्हणजे जात असते.

काळाबरोबर त्याचं वय वाढत जाते,
जातीची त्याला नेहमीच सोबत असते,
शिक्षणासाठी तर जाताच पहिली लागते,
कारण, जात म्हणजे जात म्हणजे जात असते.

शिक्षण संपवून पुढे त्यांनी नोकरी धरली,
तिथेही जातीनेच आपली वर्णी लावली,
सोयरीकीला तर वाढू जातीचीच लागते,
कारण, जात म्हणजे जात म्हणजे जात असते,

नोकरी सोडून पुढे तो राजकारणात पडतो,
जातीमुळेच तिथेही तो पटापट वर चढतो,
जातीमुळे कोणीच त्याला नाडत नसते,
कारण, जात म्हणजे जात म्हणजे जात असते,

हळू हळू वयाबरोबर शरीर थकून जाते,
जात मात्र त्याला घट्ट चिकटून असते,
अखेर त्याच्याबरोबरच तीही मातीत जाते,
कारण, जात म्हणजे जात म्हणजे जात असते,
एकदा चिकटली की ती मेल्यावरच जाते.

2 thoughts on “जात

Leave a Reply

%d bloggers like this: