Adi's Journal

Pieces of my thourhgs

दुर्गे दुर्दशा भारी

नैमित्यिक कारणांनी आपल्या सगळ्यांचीच दुर्ग भ्रमंती चालू असते. इच्छा असते ती रोजच्या जीवनातून कुठे लांब जाऊन काही वेगळा अनुभव घेण्याची. दोन-चार डोकी गोळा होतात, गाड्या निघतात, पाठीवर १-२ दिवसांचं समान, कॅमरा इत्यादी साहित्य लादलं जातं आणि प्रवास सुरु होतो तो एका अनामिक ओढिनी. काही नवीन अनुभव गाठीशी घेण्याच्या इच्छेनी, गणरायाचे नाव घेऊन शिवाजीमहाराजांना मुजरा करून गडाच्या पायथ्याला पाय लागतो आणि पुढच्या पावली अडखळतो. मनातले उदात्त भव्य इतिहासाचे चित्र खळकन पडून फुटते आणि समोर उभे राहते ते दुर्लक्षित, उपेक्षित, अस्वच्छ ऐतिहासिक स्मारक. ज्यांनी कोणे एके काळी महाराजांची पायधूळ आपल्या मस्तकी धरली, स्वराज्यातील प्रत्येक बऱ्या वाईट घटना बघितल्या, ते वैभव अनुभवलं, लढायांचा थरार अनुभवला, शत्रूच्या रक्ताने न्हाऊन निघालेल्या रणचंडीची पूजा आपल्या पदारातील काही समिधा वाहून केली, आपल्या कोटा बुरुजांवर असंख्य वार झेलत स्वराज्यासाठी झुंजणाऱ्या महाराष्ट्र वीरांचा रक्षण केलं; त्याच गडकोटांची ही अवस्था पावला-पावलाला मनाला असंख्य ठेचा देत जाते. मनात कुठे तरी आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. कुठे चुकलं आमचं? आमच्या दिपस्तंभांची ही अशी अवस्था?

प्रातःस्मरणीय आणि वंदनीय अशा लोकांनी रक्ताचं पाणी करून प्रसंगी जीवावर उदार होऊन निर्माण केलेल्या या अमूल्य ठेव्याला असं कणाकणांनी लुबाडण्याचा काय अधिकार आहे आम्हाला? जिथे जातो तिथे स्वतःचा ठसा उमटवण्याची आमची धडपड हे ही लक्षात घेत नाही कि अरे ज्यांनी हे उभारलं त्यांनी कधी स्वतःचे नाव यावर कोरले नाही, आणि आपण खुशाल गावांसकट नामावली प्रसिद्ध करून मोकळे झालो. कशाबद्दल? कुठला पराक्रम जाहीर करायचाय? शत्रूच्या अस्त्र शास्त्रांचे घाव या दगडांना फुलासारखे वाटले असतील पण आपल्यावर कोरली जाणारी ही नवे त्यांना वाज्राघाताचे दुःख देत असतील. आज जर हे दगड सजीव झाले तर म्हणतील अरे जगातल्या सगळ्या तीर्थांत अंघोळी केल्या तरी आमच्यावर लागलेले हे डाग आम्ही कसे धुतले जाणार?
दैव दुर्विलासाची एक एक पायरी आम्ही चढतोच आहोत. स्वतःची घरे अगदी ४-४ वेळा स्वच्छ करणारे आपण, या ठिकाणी गेलो की मात्र कोणी बघत नाही आणि मी टाकला कचरा तर काय फरक पडतोय असा विचार करून जिथे खातो तिथेच घाण, प्लास्टिक चा कचरा टाकून चालू लागतो. मुंबईची घाण साचून साचून शेवटी त्या मिठी नदीनी तांडव घातलेच. तिथे आपण राहतो म्हणून जाणवले तरी पण या स्मराकांवर घातलेले निसर्गाचे तांडव आपल्या कोडग्या नजरांना आणि बधीर मनाला कधी जाणवेल? परकीय राष्ट्रांचे बघा, त्यांची ऐतिहासिक स्मारके हजारो वर्षे जपून ठेवत आहेत. काही पडझड झालीच तर पुन्हा मूळ स्वरुपात आणण्यासाठी आकाश पातळ एक करत आहेत. मग आपल्याकडेच ही अनास्था का? रायगडाच्या पवित्र स्थानी या नतद्रष्टांची दारू पिऊन बाटल्या फेकायची हिम्मत होतेच कशी? आणि ते हि थेट सिंहासनाच्या जागेवर!!!!! लाज वाटली पाहिजे आपल्याला की आपण स्वतःला मराठी म्हणवून घेतो, शिवजयंतीला वर्षातून एकदा नव्हे तर दोनदा चौकाचौकात लाउडस्पीकरच्या भिंतींमधून पोवाडे वाजवतो. काय उपयोग आपल्या या शिवभक्तीचा आव आणण्याचा? अरे महाराजांचे आदर्श कधी बघितले नाहीत, तर आचाराने पाळणे दूरची गोष्ट, त्यांच्या जयंतीवरून वाद घालणारी माणसं आपण. काय फरक पडतो जर ती हिंदू पंचांगानुसार साजरी केली तर? कशाला हवी युरोपियन तारीख?

मागे मित्रांनी एक गमतीदार किस्सा सांगितला, स्थळ आपल्या परिचयाचेच, किल्ले सिंहगड, कोणतासा शनिवार अथवा रविवार, किल्ल्यावर जोडप्यांची गर्दी. मित्राला कुठून बुद्धी / दुर्बिद्धी झाली देव जाने पण तो तिथे उपटला आणि जे काही वाक्य कानांवर पडले ते ऐकून वेडा झाला. एका जोडप्यात संवाद चालू होता. तो बिचारा आपल्या मोडक्या तोडक्या मातृभाषेत, मराठीत, तिला सिंहगडाची गोष्ट सामावण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. “you know , महाराजांना किल्ला घेणं तसं अवघड पडायला लागलं आणि मग त्यांनी तानाजीला बोलावलं” मित्र म्हणाला मी पुढचा ऐकू शकलो नाही. जेव्हा किस्सा मी प्रथम ऐकला तेवा मी पण हसत बसलो, पण थोड्याच वेळात मनात विचार आला, त्या बिचाऱ्याचा तरी त्यात काय दोष? त्यानी वयाच्या ५ व्या वर्षापासून हाच इतिहास ऐकला, आहे वाचला आहे. दुर्दैव आहे भारताचा कि आपल्या इतिहासाची गळचेपी जी ब्रिटिशांनी केली ती आजही चालूच आहे. अरे का नाही शिकवत आम्हाला तो दैदिप्यमान इतिहास, जो छत्रपती शिवरायांनी इथे महाराष्ट्रात घडवला, महाराणा प्रतापांनी भिल्लांच्या साथीत मेवाडच्या वाळवंटात उभारला. राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब, तात्या तोप्यांनी १८५७ साली घडवला, सुभाषबाबूंनी जपान मधून उद्घोशीला, भगतसिंग इत्यादी प्रभृतींनी पंजाबात धगधगत ठेवला, स्वातंत्र्यवीरांनी शत्रूच्या घरातून सोनिरी अक्षरात कोरला.

कुठे आहे आमचा इतिहास? आजच्या इतिहासाच्या पुस्तकांतून दिसतात ती फक्त इटालियन, रशियन, फ्रेंच राज्यक्रांतीची थोडकी वर्णने, महाय्द्धांचे प्रसंग, औद्योगिक क्रांती, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अहिंसात्मक निदर्शने, का नाही शिकवला जात आम्हाला बाकीचा पण इतिहास? एकदा प्रयोग करून बघाच. आमचं हा जाज्वल्य इतिहास शिकवाच. मग बघा अवघ्या हिंदुस्थानातील ऐतिहासिक स्मारके पुन्हा जिवंत होतील आणि गतकाळच्या वैभवानी ओउन्हा झळकू लागतील.

Related Posts

Leave a Reply