Category: Marathi

  • अज्ञातसफर

    तांबडं फटफटायच्याही आधी, मी निघालो आहे,
    पायाखालची वाट सोडून, सरावाचा रस्ता मोडून.

    धुक्याची चादर ओढलेल्या किंचित अंधाऱ्या गल्ल्या,
    ओढतायत मला, हाक मारतायत खुणावून.

    माझीही पावलं आपोआपच वळली, उत्सुकतेने,
    मनातल्या साऱ्या शंका खोडून.

    नुकतीच उगवतीला केशरी किनार आली,
    अन आभाळभर पसरली, अंधाराला चिरून.

    अज्ञाताचे पडदे बाजूला सारत त्या गल्ल्या फिरत होतो,
    बहुदा, मुळ मानवी स्वभावाला धरून.

    माझ्या हिस्स्याचे धुके मनसोक्त पीत होतो,
    जोवर मन जात नाही भरून.

    उन्हं तापू लागली तशी धुक्याची मखमली चादरही विरली,
    गावालाही जाग आली आळोखे पिळोखे देऊन.

    अज्ञातातली समाधी भंगली, एकांत संपवला
    हे अज्ञात जग ज्ञात असलेल्यांनी धक्का देऊन.

    परतीचा प्रवास अन ओळखीच्या खुणांचा शोध सुरु झाला,
    उद्याच्या अज्ञातसफरीचा निश्चय करून…

  • क्षण सोनेरी

    हातात घेऊनी हात, तव मिठीत मी विरघळले,
    तू ओठ चुंबीले तेव्हा, प्रीतिस धुमारे फुटले.

    प्रेमाच्या गर्द वनांत, मी तुझ्यासवे भरकटले,
    तव स्नेहचांदण्याच्या, वर्षावी चिंब मी झाले.

    मी तुझ्यासवे जे जगले, ते क्षण सोनेरी झाले,
    विरहाचे महिने जगण्या, पुन्हा सिद्ध मी झाले.

  • शिंपण

    शिंपण

    उन्हं कलली तसे आम्ही सारे शिरप्याच्या मागोमाग परतीच्या वाटेला लागलो. आमच्या कळपाचा आधार असलेला वाघ्या पुढे जाऊन रस्ता सुरक्षित असल्याची खात्री करून पुन्हा शिरप्याच्या पायात पायात चालायला लागला. शिरप्या खांद्यावर काठी आडवी टाकून पुढ्यात चालत होता. त्याला लावलेल्या नाजूक घुंगरांच्या मंजुळ आवाजावर ताल धरून आम्ही मेंढरं त्या जोडगोळीच्या मागे मागे चालत होतो. गुमान मान खाली घालून पालाच्या वाटेवर चाललेल्या मला आज शिरप्या जरा जास्त चिंतेत वाटला. ‘बहुदा उद्या पालं हलवावं लागणार, आज चारा-पाणी शोधत शोधत आज फारच लांब गेलो की.’ हेच विचार त्याच्या मनात विचार चालू असावे. दिवे लागणीच्या आत पाल्यावर पोचायची घाई शिराप्याला झपाझप पावलं उचलायला लावत होती. तसा आजून तासभर होता, सूर्य नुकता कुठे डोंगरमाथ्याला टेकला होता. त्या तिरप्या उन्हात माझं काळं अंग चमकत होतं. वाघ्या कधी कधी पळत पुढे जाऊन यायचा तर कधी आमच्या मागून चालत कोणी भरकटत नाही न याची काळजी घेत होता. सारे दमलेले होते, नाईलाजाने पाय ओढत ओढत मागे मागे चालत होते.

    सूर्य डोंगराआड गेला आणि उन्हाची काहिली कमी झाली. आम्हाला अजून अर्धी मजल मारायची होती. पण आज शिरप्याच्या चेहेऱ्यावर वेळेवर पोहोचण्याच्या काळजी पेक्षा उद्या पालं मोडून कोणत्या दिशेला निघावं याचीच चिंता जास्त होती. गेले तीन महिने किती गावांच्या बाहेर मुक्काम केला असेल याची मोजणी ठेवणं त्याने केव्हाच सोडून दिलं होतं. इथे तंबू ठोकून जेमतेम आठवडा झाला होता पण आजुबाजूचा सारा चारा पार वाळून गेला. औषधाला सुद्धा हिरवा रंग सापडत नव्हता. इतकंच काय पण बोरी बाभळीवरसुद्धा फक्त काटे उरले होते. लहानपणापासून बाबाच्या मागोमाग आमच्याबरोबर फिरतांना पाहून घेतलेले सगळे ओढे, नाले, तलाव आता कोरडे झाले होते. गेल्या दोन वर्षात पाउस कुठे दडी मारून बसला होता ते परमेश्वरालाच ठावूक.

    सूर्य आता डोंगराआड गेला होता त्यामुळे काहिली कमी झाली होती. पण हवेत गरमी अजूनही होतीच. आभाळभर सुंदर अशी केशरी छटा पसरली होती. अन अचानक कुठूनसे वारे वाहू लागले. आजूबाजूला पसरलेल्या उघड्या माळरानावर बारक्याश्या वावटळी उठू लागल्या. पाचोळा आणि धूळ हवेत उडून रानमळ धूसर झाला होता. अचानक क्षितिजावर काळोख पसरला, हा हा म्हणता वाऱ्याने जोर धरला आणि क्षितिजावर जमा झालेले ढग साऱ्या आसमंतात पसरले. गेल्या दोन वर्षात ढग आणि वाऱ्याने बऱ्याच वेळा असं गुंगारा दिला होता त्यामुळे शिरप्याच्या पावलांची गती काही मंदावली नाही. त्याच्या मागून जाताना आम्हाला मात्र उगीचच आस लागली होती आणि आमच्या नजरा सारख्या आकाशाकडे जात होत्या. अचानक रोरावणारा वारा पडला, आणि कडाडकन ढगांचा गडगडात झाला. क्षणभर सारं काही स्तब्द झालं आणि पुढल्या क्षणाला पहिला टपोरा थेंब या जमीनवर आला, तब्बल दोन वर्षांनी. त्यापाठोपाठ दुसरा, मग तिसरा. उन्हातान्हात तापलेल्या मातीवर पहिला सडा शिंपडला आणि आसमंत मातीच्या सुवासाने दरवळून निघाला. एरवी पाऊस आला की कारवादणारा शिरप्या आज मनोमन आनंदला, आणि बरसू लागलेल्या पावसात चिंब भिजत पुढची वाट चालू लागला. आम्हीही त्याच्या मागून भिजल्या अंगानी त्याच्या मागून उड्या मारत मारत चालत होतो ते उद्या होणाऱ्या हिरव्यागार धरणीमातेची कल्पना करत.

  • बीता वक़्त…

    sand-hourglass-black-and-white-450x300

    जो वक़्त बीत गया..
    वो गुज़र क्यूँ नहीं जाता … ! 

    हे शब्द नक्की कोणाच्या डोक्यातून आले हे मला माहिती नाही पण आज सकाळी सकाळी मैत्रिणीच्या फेसबुक वॉलवर हे वाचलं तेव्हापासून माझ्या मनात घोळत राहिलं आहे. तिनी परवा “सुखन” मध्ये ऐकलं तेव्हा पासून तिच्या डोक्यात काय भुंगा फिरतोय माहिती नाही पण मला मात्र यावर लिहिल्याशिवाय राहवत नाहीये. आपण म्हणतो की गेलेला वेळ परत येत नाही. पण एका अर्थानी मला हे खूप चुकीचं वाटतं. एकदा वेळ हातून निसटला कि पुन्हा तो क्षण जागून जे वागलो ते बदलता येत नाही मान्य. आपण क्षण जगला की त्याच्या आठवणी होतात हेदेखील तितकंच सत्य आहे.

    अशाच ओळी कित्येक वेळा ऐकल्या आहेत; अवधूत गुप्तेच्या “आना दोबारा” च्या सुरुवातीला – “बीता हुवा पल, कभी गुजरता नाही. वोह सेहमा हुवासा बैठा रेहता ही, रास्तेके किसी पिछले मोडपर” इतक्यावेळा ऐकून पण हे विचार तेव्हा कधी आले नाही मनात पण आज या दोन ओळी वाचल्या, आणि जणू बांध फोडून विचार वाहायला लागले आहेत. गंमत आहे न? हातून निसटतं पण आहे आणि नाही पण. सारे मनाचे खेळ. काही काही सोडायला तयार नसतो बापडा. पुन्हा जगता येणार नाही म्हणून रेकॉर्ड करून ठेवतो सगळं. मग पाऊस आला, एखादा जुनं ओळखीचं गाणं लागलं, कुठलासा वास आला, एखादी ओळखीची तारीख असली, की हे महाराज जाणार आणि या गोष्टींशी जुळलेल्या आठवणी काढून बसतो. एखादी आजी जशी नातवांचे फोटो बघत बसेल न ती परदेशी स्थायिक झाली की, अगदी तसाच. त्यांचे पार तान्हेपणापासूनचे फोटो बघताना येतील नं, तेच भाव असतील बहुदा त्याच्या चेहेऱ्यावर. शेवटी तेही तुमचं आमचं मानवी मनच ना, हेही हवं तेही हवं करता करता काही तरी सुटतंच की. तसेच काही क्षण सुटून जातात. “वो अभागे पल तो बीतते भी है और उसी वक़्त गुजरते भी है”

    काही आठवणी असतात अत्तराच्या कुपीत जपलेल्या. या सुगंधी आठवणी मनाच्या फार फार जवळच्या बरं सारखं उघडून अत्तर शिल्लक आहे की नाही बघत बसलेला असतो हा. पण काही आठवणी मात्र तापावरच्या कडू औषधाच्या बाटलीत बंद करून ठेवलेल्या असतात. कडू औषध नको असतं कधी आपणहून पण हटकून घ्यावच लागतं न कधी आलाच ताप तर. अर्थात सगळ्याच बाटल्या काही कायम राहत नाहीत. प्रत्येक गोष्टींना expiry date असतेच न. तशा या आठवणी पण काळानुसार मनाच्या हातून पण निसटून जातात. आणि मगच खऱ्या अर्थानी “बीता हुवा वक्त गुजरभी जाता है”

    फोटो: इंटरनेट वरून साभार…

  • जिव्हाळा: रुटीनचं प्रोटीन

    4220418366_8831793983_b

    कुठल्याशा रविवारची एक निवांत सकाळ, अंथरुणातून उठण्यापासून साऱ्यालाच एक निवांतपणाची किनार होती. सकाळच्या कॉफीबरोबर कुठलेसे पुस्तक वाचावे म्हणून मी माझ्या पुस्तकांच्या खाणांवर नजर फिरवत होतो. दोन तीन वेळा सारे खण धुंडाळून झाले आणि नजर स्थिरावली ती व. पुं. च्या ‘महोत्सव’ वर. व. पुं. चे कुठलेही पुस्तक घ्या, अगदी कुठलही पान उघडा आणि वाचायला लागा. बऱ्याच वेळा त्या पानावरच्या एखाद्या ओळीशी मन अडकत. अडकत ते कळलं नाही म्हणून नाही तर मन त्यावर विचार करत बसतं म्हणून. सारखं सारखं त्या वाक्याशीच येऊन थांबतं दोन दोन दिवस. रविवारचा निवांत दिवस, अन व पुंचे पुस्तक म्हटल्यावर आजचा दिवस या चिंतन वाक्याशिवाय कसा राहील? “जिव्हाळ्याचा स्पर्श झाला की रुटीन पण प्रोटीन होतं.” इतकं साधं सोपं वाक्य पण माझं मन गेले कित्येक तास या वाक्याशीच घुटमळतय.

    अगदी लहानपणापासून आपलं आयुष्य एका ठराविक दिनक्रमाला बांधलेलं असतं. शाळेत असताना रोजची शाळा, त्या नंतर शिकवण्या, घरी आल्यावर गृहपाठ, हे सारं कमी असतं म्हणून की काय आजकाल वेगवेगळ्या छंदवर्गांच खूळ निघालंय. इतकं सारं केल्यावर दमला भागला जीव जेवून कधी झोपी जातो हे पण कळत नाही. शिक्षण आटोपून नोकरी लागली कि वेगळ्या दिनचर्येला सुरुवात. सकाळचे कामाला जा, ऑफिस मध्ये आपले तास भरेपर्यंत काम करा, संध्याकाळी कट्ट्यावर, नाक्यावर मित्रांसोबत टंगळमंगळ करा, घरी आले की थोडं फेसबुक ट्विटरवर सोशल व्हा, जेवा अन झोपा. संसारी लोकांचे तर वेगळेच तंत्र, त्यांना आपल्या अर्धांगासोबत करायच्या कामांची वेगळी यादी तयार असतेच. महिन्याची महिन्याला बिले भरा, वाणसमान भरा, एक न अनेक. आणि एकदा रुटीन म्हटलं की त्याला चिकटून कंटाळा हा आलाच पाहिजे.

    पण याच रुटीनला जिव्हाळ्याचा स्पर्श झाला की सारं कसं एका क्षणात बदलून जातं. रोज त्याच वाटणाऱ्या कंटाळवाण्या गोष्टी पण कराव्याशा वाटतात. मग तो जिव्हाळ्याचा स्पर्ष आईच्या मायेचा असुदे, किंवा प्रेयसीच्या हास्याचा असुदे. एखाद्या छंदामागे पिसाटून लागणे पण काहींसाठी ह्या प्रोटीनच काम करतच. कानावर पडलेले छान संगीत किंवा अचानक पुन्हा वाचनात आलेले जुनेच पण आपले आवडते पुस्तक,    कित्येकदा आपल्या नकळत अशा प्रोटीनचं काम करत असतं. कुणासाठी हौसेने लावलेली गच्चीतील बाग तर कुणासाठी संध्याकाळचा नदी किनारा, दिवसभर काम करून शिणलेल्या एखाद्यासमोर प्रेमाने आलेला चहा कॉफीचा मग, किंवा ध्यानी मनी नसताना त्याने तिच्यासाठी आणलेला जुईचा गजरा अशा छोट्या छोट्या गोष्टी, दिवसेंदिवस त्याच गोष्टी करून आलेला कंटाळा, शिणवठा किती नकळत चुटकीसरशी पार दूर पळवून नेतात नाही?

    अगदी एखादा दिवस जरी असं प्रोटीनयुक्त गेला तरी पुढे आठवडाभर आपण तोच रोजच्या त्याच कामाच्या ओझ्याला आपण अगदी आरामात ओढून नेतो. कांटाळवाण्या रुटीनला या प्रोटीनची चरचरीत फोडणी मिळाली की आयुष्य एकदम लज्जतदार होऊन जातं. माझं प्रोटीन मला या अक्षरांमध्ये सापडतं, तुमचं प्रोटीन कशात दडलंय?

  • मुखवटा

    मुखवटा

    लपवले जे आहे मनाच्या तळाशी,
    कितीदा उफाळून येई किनारी,
    आंदोलती वादळे जरी अतरंगी,
    चेहेऱ्यावरी स्तब्धतेचा मुखवटा….

    दिसामागुनी दिवस जाती निघूनी,
    तरी वादळे नाही शमली जराही,
    अचानक अशी ती येता समोरी,
    तत्क्षणी गळाला मुखीचा मुखवटा….

    Image credit : Suvarna Sohoni