Adi's Journal

Pieces of my thourhgs

जिव्हाळा: रुटीनचं प्रोटीन

4220418366_8831793983_b

कुठल्याशा रविवारची एक निवांत सकाळ, अंथरुणातून उठण्यापासून साऱ्यालाच एक निवांतपणाची किनार होती. सकाळच्या कॉफीबरोबर कुठलेसे पुस्तक वाचावे म्हणून मी माझ्या पुस्तकांच्या खाणांवर नजर फिरवत होतो. दोन तीन वेळा सारे खण धुंडाळून झाले आणि नजर स्थिरावली ती व. पुं. च्या ‘महोत्सव’ वर. व. पुं. चे कुठलेही पुस्तक घ्या, अगदी कुठलही पान उघडा आणि वाचायला लागा. बऱ्याच वेळा त्या पानावरच्या एखाद्या ओळीशी मन अडकत. अडकत ते कळलं नाही म्हणून नाही तर मन त्यावर विचार करत बसतं म्हणून. सारखं सारखं त्या वाक्याशीच येऊन थांबतं दोन दोन दिवस. रविवारचा निवांत दिवस, अन व पुंचे पुस्तक म्हटल्यावर आजचा दिवस या चिंतन वाक्याशिवाय कसा राहील? “जिव्हाळ्याचा स्पर्श झाला की रुटीन पण प्रोटीन होतं.” इतकं साधं सोपं वाक्य पण माझं मन गेले कित्येक तास या वाक्याशीच घुटमळतय.

अगदी लहानपणापासून आपलं आयुष्य एका ठराविक दिनक्रमाला बांधलेलं असतं. शाळेत असताना रोजची शाळा, त्या नंतर शिकवण्या, घरी आल्यावर गृहपाठ, हे सारं कमी असतं म्हणून की काय आजकाल वेगवेगळ्या छंदवर्गांच खूळ निघालंय. इतकं सारं केल्यावर दमला भागला जीव जेवून कधी झोपी जातो हे पण कळत नाही. शिक्षण आटोपून नोकरी लागली कि वेगळ्या दिनचर्येला सुरुवात. सकाळचे कामाला जा, ऑफिस मध्ये आपले तास भरेपर्यंत काम करा, संध्याकाळी कट्ट्यावर, नाक्यावर मित्रांसोबत टंगळमंगळ करा, घरी आले की थोडं फेसबुक ट्विटरवर सोशल व्हा, जेवा अन झोपा. संसारी लोकांचे तर वेगळेच तंत्र, त्यांना आपल्या अर्धांगासोबत करायच्या कामांची वेगळी यादी तयार असतेच. महिन्याची महिन्याला बिले भरा, वाणसमान भरा, एक न अनेक. आणि एकदा रुटीन म्हटलं की त्याला चिकटून कंटाळा हा आलाच पाहिजे.

पण याच रुटीनला जिव्हाळ्याचा स्पर्श झाला की सारं कसं एका क्षणात बदलून जातं. रोज त्याच वाटणाऱ्या कंटाळवाण्या गोष्टी पण कराव्याशा वाटतात. मग तो जिव्हाळ्याचा स्पर्ष आईच्या मायेचा असुदे, किंवा प्रेयसीच्या हास्याचा असुदे. एखाद्या छंदामागे पिसाटून लागणे पण काहींसाठी ह्या प्रोटीनच काम करतच. कानावर पडलेले छान संगीत किंवा अचानक पुन्हा वाचनात आलेले जुनेच पण आपले आवडते पुस्तक,    कित्येकदा आपल्या नकळत अशा प्रोटीनचं काम करत असतं. कुणासाठी हौसेने लावलेली गच्चीतील बाग तर कुणासाठी संध्याकाळचा नदी किनारा, दिवसभर काम करून शिणलेल्या एखाद्यासमोर प्रेमाने आलेला चहा कॉफीचा मग, किंवा ध्यानी मनी नसताना त्याने तिच्यासाठी आणलेला जुईचा गजरा अशा छोट्या छोट्या गोष्टी, दिवसेंदिवस त्याच गोष्टी करून आलेला कंटाळा, शिणवठा किती नकळत चुटकीसरशी पार दूर पळवून नेतात नाही?

अगदी एखादा दिवस जरी असं प्रोटीनयुक्त गेला तरी पुढे आठवडाभर आपण तोच रोजच्या त्याच कामाच्या ओझ्याला आपण अगदी आरामात ओढून नेतो. कांटाळवाण्या रुटीनला या प्रोटीनची चरचरीत फोडणी मिळाली की आयुष्य एकदम लज्जतदार होऊन जातं. माझं प्रोटीन मला या अक्षरांमध्ये सापडतं, तुमचं प्रोटीन कशात दडलंय?

Related Posts

Leave a Reply