शिंपण
उन्हं कलली तसे आम्ही सारे शिरप्याच्या मागोमाग परतीच्या वाटेला लागलो. आमच्या कळपाचा आधार असलेला वाघ्या पुढे जाऊन रस्ता सुरक्षित असल्याची खात्री करून पुन्हा शिरप्याच्या पायात पायात चालायला लागला. शिरप्या खांद्यावर काठी आडवी टाकून पुढ्यात चालत होता. त्याला लावलेल्या नाजूक घुंगरांच्या मंजुळ आवाजावर ताल धरून आम्ही मेंढरं त्या जोडगोळीच्या मागे मागे चालत होतो. गुमान मान खाली घालून पालाच्या वाटेवर चाललेल्या मला आज शिरप्या जरा जास्त चिंतेत वाटला. ‘बहुदा उद्या पालं हलवावं लागणार, आज चारा-पाणी शोधत शोधत आज फारच लांब गेलो की.’ हेच विचार त्याच्या मनात विचार चालू असावे. दिवे लागणीच्या आत पाल्यावर पोचायची घाई शिराप्याला झपाझप पावलं उचलायला लावत होती. तसा आजून तासभर होता, सूर्य नुकता कुठे डोंगरमाथ्याला टेकला होता. त्या तिरप्या उन्हात माझं काळं अंग चमकत होतं. वाघ्या कधी कधी पळत पुढे जाऊन यायचा तर कधी आमच्या मागून चालत कोणी भरकटत नाही न याची काळजी घेत होता. सारे दमलेले होते, नाईलाजाने पाय ओढत ओढत मागे मागे चालत होते.
सूर्य डोंगराआड गेला आणि उन्हाची काहिली कमी झाली. आम्हाला अजून अर्धी मजल मारायची होती. पण आज शिरप्याच्या चेहेऱ्यावर वेळेवर पोहोचण्याच्या काळजी पेक्षा उद्या पालं मोडून कोणत्या दिशेला निघावं याचीच चिंता जास्त होती. गेले तीन महिने किती गावांच्या बाहेर मुक्काम केला असेल याची मोजणी ठेवणं त्याने केव्हाच सोडून दिलं होतं. इथे तंबू ठोकून जेमतेम आठवडा झाला होता पण आजुबाजूचा सारा चारा पार वाळून गेला. औषधाला सुद्धा हिरवा रंग सापडत नव्हता. इतकंच काय पण बोरी बाभळीवरसुद्धा फक्त काटे उरले होते. लहानपणापासून बाबाच्या मागोमाग आमच्याबरोबर फिरतांना पाहून घेतलेले सगळे ओढे, नाले, तलाव आता कोरडे झाले होते. गेल्या दोन वर्षात पाउस कुठे दडी मारून बसला होता ते परमेश्वरालाच ठावूक.
सूर्य आता डोंगराआड गेला होता त्यामुळे काहिली कमी झाली होती. पण हवेत गरमी अजूनही होतीच. आभाळभर सुंदर अशी केशरी छटा पसरली होती. अन अचानक कुठूनसे वारे वाहू लागले. आजूबाजूला पसरलेल्या उघड्या माळरानावर बारक्याश्या वावटळी उठू लागल्या. पाचोळा आणि धूळ हवेत उडून रानमळ धूसर झाला होता. अचानक क्षितिजावर काळोख पसरला, हा हा म्हणता वाऱ्याने जोर धरला आणि क्षितिजावर जमा झालेले ढग साऱ्या आसमंतात पसरले. गेल्या दोन वर्षात ढग आणि वाऱ्याने बऱ्याच वेळा असं गुंगारा दिला होता त्यामुळे शिरप्याच्या पावलांची गती काही मंदावली नाही. त्याच्या मागून जाताना आम्हाला मात्र उगीचच आस लागली होती आणि आमच्या नजरा सारख्या आकाशाकडे जात होत्या. अचानक रोरावणारा वारा पडला, आणि कडाडकन ढगांचा गडगडात झाला. क्षणभर सारं काही स्तब्द झालं आणि पुढल्या क्षणाला पहिला टपोरा थेंब या जमीनवर आला, तब्बल दोन वर्षांनी. त्यापाठोपाठ दुसरा, मग तिसरा. उन्हातान्हात तापलेल्या मातीवर पहिला सडा शिंपडला आणि आसमंत मातीच्या सुवासाने दरवळून निघाला. एरवी पाऊस आला की कारवादणारा शिरप्या आज मनोमन आनंदला, आणि बरसू लागलेल्या पावसात चिंब भिजत पुढची वाट चालू लागला. आम्हीही त्याच्या मागून भिजल्या अंगानी त्याच्या मागून उड्या मारत मारत चालत होतो ते उद्या होणाऱ्या हिरव्यागार धरणीमातेची कल्पना करत.