Category: Marathi

  • चलनी नोटेस…

    चलनी नोटेस…

    सये तुझ्याविण चालत नाही संसाराचे गाडे,
    तू नसतांना आमुचे सारे काम आज हे अडे.

    पाच दहा ते दोनहजारी, ल्याली सारी रूपे,
    कधी शंभरी सोबत घेऊन काम करी तू पुरे.

    वजन ठेवता कामावर तू, पाय त्यास हो फुटे,
    वजन वाढता अवजड होते, आम्हा उगीच वाटे.

    हात बदलशी सारखेच तू, शांत कधी ना बसे,
    नसता जवळी कधी कुणाच्या, त्याचे होई हसे.

    येई सत्ता, थोडी मत्ता, साथ तुझी जर असे,
    झिंग तुझी जर जादा होता, विवेके गेला दिसे.

    नतमस्तक मी होतो सखये, बघूनी लीला साऱ्या,
    या जगतावर तुझीच चाले, एकछत्री ही माया.

  • हुतात्मा – संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाथा

    हुतात्मा – संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाथा

    220px-Hutatma_Chowk.jpg१ मे, जगभरात साजरा होतो तो कामगार दिवस म्हणून पण इथे महाराष्ट्रात या १ मे ला विशेष धार मिळाली ती १९६० मध्ये मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा. माझा जन्म १९८८ सालचा त्यामुळे ना मी भारताच्या स्वतंत्राचा लढा पहिला ना संयुक्त महाराष्ट्र चळवळ अनुभवली. शालेय इतिहासातून सुद्धा स्वातंत्र्ययुद्धाची तुरळक माहिती मिळाली पण स्वातंत्र्योत्तर काळात भारत घडलेल्या घटना आमच्यापर्यंत दंतकथेसारख्याच येत राहिल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी संबंधित जी गोष्ट कानावर पडली ती शाहीर विठ्ठल उमप यांच्या आवाजातली अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली मुंबईची छक्कड. पण तो काळ डोळ्यासमोर उभा केला तो या महाराष्ट्र दिनाला Zee5 वर प्रदर्शित झालेल्या हुतात्मा या वेबसिरीजमधून. आता ZEE5 वर हुतात्मा ऑनलाइन पहा

    १९५६ च्या भाषावार प्रांतरचनेत ‘बॉम्बे स्टेट’ हे गुजराथी आणि मराठी भाषिकांचे द्विभाषिक राज्य बनले आणि विदर्भ आणि मराठवाडा हे मराठी भाषिकांचे भाग मराठी राज्यापासून वेगळे राहिले. या अन्यायाचा परिपाक म्हणून उभी राहिली ती संयुक्त महाराष्ट्र चळवळ. जिच्या नेतृत्वाची धुरा केशवराव जेधे, प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, कॉम्रेड डांगे, एस. एम. जोशी, शाहीर अमर शेख यांच्यासारख्या अनेक तालेवार मंडळींनी सांभाळली. शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांच्या दमदार पोवाडे, लावण्या आणि इतर लोकगीतांनी या चळवळीची नाळ लोकांशी जोडली गेली.

    54513714_2246019115454915_1465764964554916429_n

    हुतात्मा हि वेबसिरीज आपल्यासमोर उलगडते तीच मुळी १९५६ साली फ्लोरा फाउंटनवर झालेल्या नरसंहाराच्या दृश्यांनी. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या घोषणांच्या नादात चाललेल्या शांततापूर्ण मोर्च्यावर केलेल्या लाठीमार आणि अश्रुधुराच्या माऱ्यानंतर उसळलेल्या गोंधळाला आळा घालायला मोरारजी देसाईंनी गोळीबाराचा आदेश दिला आणि १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले. याच गोळीबारात जीव गमावलेल्या गिरणी कामगाराच्या मुलीच्या ‘विद्युलता सावंत म्हणजेच विद्युतच्या भोवती ही सारी कथा गुंफली आहे.

    त्या काळात महाराष्ट्रात असलेल्या वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांची अत्यंत योग्य अशी सांगड या वेबसिरीज मध्ये घातलेली दिसून येते. काँग्रेस, कम्युनिस्ट चळवळ, संयुक्त महाराष्ट्र समिती या साऱ्यांच्या राजकीय पटावर घडणाऱ्या घडामोडींचा मुंबईच्या स्थानिक मराठी माणसाच्या जीवनात काय प्रभाव पडत होता, तरुण मन वेगवेगळ्या विचारधारांकडे कोणत्या पद्धतीने आकृष्ट होत होते हे सारं काही मी आत्तापर्यंत पाहिलेल्या पहिल्या दोन भागातच इतकं समर्पक रीत्या मांडले गेले आहे की मला पुढचे भाग कधी एकदा पाहीन असे झाले आहे.

    सचिन खेडेकर, डॉ. मोहन आगाशे, विक्रम गोखले, जयंत सावरकर, रवींद्र मंकणी, लोकेश गुप्ते, आनंद इंगळे असली जबरदस्त उमदी फळी घेऊन रिंगणात उतरलेल्या या वेबसिरीज मध्ये नायिकेचं काम करणारी अंजली पाटील, पहिल्या दोन भागात भाव खाणारे काम करणारा वैभव तत्ववादी आणि अभय महाजन तितक्याच ताकदीने उभे आहेत. अभय महाजनचे ‘श्रीरंग पत्की’ या वार्ताहराचे पात्रसुद्धा अगदी योग्य वठले आहे. बातमीदाराने दिलेल्या बातमीवर आपल्या लेखणीने “ध चा मा” करण्याची ताकद ठेवणाऱ्या संपादकाच्या हाताखाली कराव्या लागणाऱ्या कामाबद्दलची खंत छान उठून येते.

    या शिवाय मला अगदी प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे संवादांच्या भाषेचा आणि पात्रांच्या पार्श्वभूमीनुसार केल्या गेलेल्या वेगवेगळ्या बोलींचा वापर. भीमाबाई नाईकांच्या भूमिकेत छाया कदमांनी वापरलेली कोकणी मराठी एक चरचरीत फोडणी देऊन जाते. किरकोळच हिंदी संवाद असलेल्या पात्रांच्या तोंडच हिंदी सुद्धा मस्त जमून आलं आहे. मालिकेचा कपडेपट सांभाळणाऱ्या पोर्णिमा ओक यांनी एकदम चोख काम करत १९५६ साल प्रेक्षकांसमोर उभे केले आहे. पण या साऱ्यांच्या चार पाऊले पुढे राहून पहिल्यांदा हे सारं काही मनाच्या पडद्यावर निर्माण करून मग आपल्यासाठी चित्रीकरण करून घेणाऱ्या जयप्रद देसाई यांच करावं तितकं कौतुक कमीच होईल. ऐतिहासिक कथानकाला हात घालतांना कित्येक गोष्टींचा दहादा विचार करावा लागतो हे काही चित्रपटांना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विरोधावरून आपल्या लक्षात येतेच. पण जयप्रद देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली ‘हुतात्मा’ अगदी उत्तम बनली आहे. उरलेले भाग बघण्याची उत्सुकता टिकवून ठेवण्याच्या जागांवर प्रत्येक भाग संपतो आहे. त्यामुळे लवकरच पुन्हा नवीन काय पहायचे हा प्रश्न प्रेक्षकांना पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • बटा

    बटा

    This quatrain is about the beauty of flowy hair of love interest.
    ~~~
    येती बटा भाळावरी
    लाटा जशा त्या सागरी
    खेचूनी मज ओढती
    नावेपरी त्या अंतरी
    ~~~
    हिंदी मतलब

    ये तेरी बिखरी लटे,
    जैसे सागर की लेहरे,
    खिच ले मुझे खुदमे,
    जैसे कश्ती छोटी कोई…
    ~~~

  • शब्दप्रभु बाकीबाब

    माझ्या गोव्याच्या भूमीत
    गड्या नारळ मधाचे….

    आपल्या मातृभूमीचे कौतुक सांगणाऱ्या या छान गेय ओव्यांनी शाळेत असताना बाकीबाब यांचा परिचय आम्हा शाळकरी पोरांना पहिल्यांदा करून दिला. पण “बोरकर” ही काय झिंग आणणारी नशा आहे फार नंतर कळलं.

    आज ३० नोव्हेंबर, बाकीबाब म्हणजेच बा भ बोरकर यांचा जन्मदिवस.

    बा भ बोरकर तथा बाकीबाब

    या गोवेकर मधुर रसाळ पद्मश्री शब्दप्रभूच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या सौंदर्याचा आस्वाद देणाऱ्या असंख्य मराठी, कोकणी कवितांपैकी एक

    समुद्र बिलोरी ऐना
    ~~~~
    समुद्र बिलोरी ऐना,
    सृष्टीला पाचवा म्हैना
    वाकले माडांचे माथे ,
    चांदणे पाण्यात न्हाते
    आकाशदिवे लावीत आली,
    कार्तिक नौमीची रैना
    कटीस अंजिरी नेसू ,
    गालात मिस्कील हसू
    मयूरपंखी मधुरडंखी,
    उडाली गोरटी मैना
    लावण्य जातसे उतू,
    वायाच चालला ऋतू
    अशाच वेळी गेलीस का तू,
    करून जीवाची दैना….
    ~~~~
    – बा भ बोरकर

  • सूर

    music-159868_1280कधीकधी आठवण येते त्या बंदीशींची,
    त्या सुरांची ज्यात माझं मन पार बुडून गेलेलं असायचं,
    त्याच्या डोळ्यातली चमक वाटायची एखादी सळसळत गेलेली तान तर त्या पापण्यांची उगाच होणारी फडफड ऐकवायची एखादी लकेर.
    त्याच्या कटाक्षात भासायचे मालकंसाचे आरोह अवरोह

    त्याच्या नुसत्या अस्तित्वानेच माझ्या मनात संगीत भरून जात असे.
    अन् माझ्या हृदयाची धडधड त्याच्या हृदयाच्या धडधडीच्या तालाशी जुळवून घेई. त्या नाजूक क्षणात सुद्धा ऐकू येई एखादी बनारसी ठुमरी जेव्हा आमची शरीरे बोलत होती.

    इतकंच कशाला त्याच्या निःशब्दतेत सुद्धा एक अनाहत नाद घुमत होता.

    या संगीताने माझ्यातली पोकळी भरून काढली आणि आमच्यातील द्वैत संपवलं. मेंदूतील कंपनांनी या सुरांशी जुळवून घेतलं आणि कानात हे सूर अखंड वाजत राहिले. त्याच्या संगीताची इतकी धुंदी होती की जणू त्या सुरांच्या बेड्याच पायी पडल्या.

    पण, पण या मैफिलीत सुरसंगत माझी होती, त्याच्या मागे बसून त्या सुरवटींचा पाठलाग करणं हेच जणू माझं प्राक्तन होतं. त्याच्या दुर्गम अशा लायकारीला शरण जाणं भागच होतं म्हणा.

    त्यानी उभ्या केलेल्या या ख्यालविश्वात माझे मंद्र आणि तयार सूर सुद्धा जागच्या जागी चपखल बसले होते, कारण, कारण हे विश्व आमचं होतं. ते सूर “आम्ही” होतो…
    ~~~
    मूळ इंग्रजी मुक्तछंद
    – आरुषी सिंघ

    भावानुवाद
    -आदित्य साठे

  • आस

    textgram_1538831900


    तुज पाहता दूरातही, ओठांवरी येइ हसे
    ना कळे मज अंतरी, काय हे होते असे

    ही पुन्हा संध्या उलटली, अन् पसरले चांदणे
    त्या दिल्या संकेतवेळी, तू नि मी जवळी असे

    का कळे ना आज माझे, मौनही बोलू म्हणे
    ऐकण्या ती मौनभाषा, बैस तू जवळी असे

    होताच त्या गोड स्पर्शी, शिरशिरी अंगी उठे,
    भावनांच्या तीव्र उर्मी, भारल्या कंठी असे

    ना हलावे कोणी इथोनी, काळही थांबो इथे,
    या क्षणाला मम मनी, आस एकच ही असे…


    Poem recited by Aditya Sathe


    Phonetics in Roman Script

    Tuja pāhatā dūrātahī, ōṭhānvarī yē'i hasē
    nā kaḷē maja antarī, kāya hē hōtē asē
    
    hī punhā sandhyā ulaṭalī, an pasaralē chāndaṇē
    tyā dilyā saṅkētavēḷī, tū ni mī javaḷī asē
    
    kā kaḷē nā āja mājhē, maunahī bōlū mhaṇē
    aikaṇyā tī maunabhāṣā, baisa tū javaḷī asē
    
    hōtācha tyā gōḍa sparśī, śiraśirī aṅgī uṭhē, 
    bhāvanān̄chyā tīvra urmī, bhāralyā kaṇṭhī asē
    
    nā halāvē kōṇī ithōnī, kāḷahī thāmbō ithē,
    yā kṣaṇālā mama manī, āsa ēkacha hī asē...

    Rough English Translation (non-poetic)

    A smile emerges on my lips even if I see you from far away, I have no clue what’s happening me these days?
    See the evening turned in the night and the stars are twinkling above us, you and I are together, at this time, as decided.
    I don’t know why, but my silence wants to speak up today, and I want you to sit close by to listen to this silent tongue.
    With our hands’ touch, the whole body is -ignited, and my mind is filled completely with a burst of emotions.
    No one should move now, even time should stop right now, at this moment, this is the only wish I have in my mind.