Category: Marathi

  • हो, जग सुंदर आहे!

    हो, जग सुंदर आहे!

    पावलो पावली जाणीव होते, हो, जग सुंदर आहे!

    जग सुंदर आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि काही पक्षी तुमची गॅलरीमध्ये वाट बघत असतात.
    हे सुंदर जग शीतल होतं जेव्हा अचानक तळपत्या सूर्यासमोर आलेला एक कृष्णमेघ तुमच्या डोक्यावर सावली धरतो.
    कधी तरी दमून भागून घरी आलात की न मागता तुमच्यासमोर चहा/कॉफीचा वाफाळता कप येतो. किंवा अचानक पाणीपुरी पार्टी ठरते. तेव्हा जग खरंच सुंदर असते.
    अर्थात जग सुंदर होतेच जेव्हा तुमच्या जवळ तुमचा हक्काचा जिवलग असतो.
    आणि जवळ नसला तरी विरहाची सुंदरता फक्त तुम्हालाच जाणवते.

    सकाळच्या धावपळीच्या वेळेत ट्राफिकमध्ये नाही अडकलात तर! न आढेवेढे घेता कॅज्यूअल मंजूर झाली तर!
    आमच्या कोकणातल्या चाकरमान्यांना गणपतीमध्ये गाडीची तिकीटं आणि शिमग्याला सुट्टी मिळाली तर!
    अर्थातच जग सुंदर असतं!

    चित्तथरारक डिटेक्टिव्ह कथा सुंदर असते, मनाला भिडणारी कविता सुंदर असते.
    चुकून आलंच मित्राच पत्र तर तोच काय, पुढचे अनेक दिवस सुंदरच असतात!

    एकूण काय, तर  जग सुंदर आहेच, आपला चष्मा तेव्हढा स्वच्छ हवा..

    आदित्य साठे
    २५-०५-२०२४ 


    For my other posts, follow this trail

  • फाटलेले आभाळ

    फाटलेले आभाळ

    आषाढाच्या धारा आल्या कोसळल्या बरसून
    संगे आला त्यांच्या वारा फिरे पुरा भणाणून

    उघडीप जरा नाही, सारे मळभ भरून
    दाटे काळोख दिवसा येई पुरे अंधारून

    रस्ते सारे आज ओस, पाणी साचले राहून
    जरी आडोशाला होते, गेले पक्षीही भिजून

    हेच नेहमीचे झाले, नवा दिवस असून
    काटे घड्याळाचे जणू कसे थांबले थकून

    कधी डोकावेल सूर्य, काळ्या ढगांच्या अडून
    हीच एक आहे आस आता मनात दडून …

    PS: The post is a part of #BlogchatterBlogHop.www.theblogchatter.com

  • नदीसाठी नादखुळा असलेल्या एका नदीष्टाची गोष्ट

    नदीसाठी नादखुळा असलेल्या एका नदीष्टाची गोष्ट

    एखादं पुस्तक वाचण्यापुरते कोणाकडून उसने घ्यावे आणि वाचून झाल्यावर हे पुस्तक संग्रही असायलाच हवे असे फार फार दिवसांनी आज मनोज बोरगावकर यांचे नदीष्ट वाचताना झाले. तसे पाहिले तर हे पुस्तक वाचायला तसा ४ वर्ष उशीरच झाला. अगदी प्रकाशनच्या दिवशी विकत घेऊन वाचण्यासारखे हे पुस्तक आहे यात अजिबात शंका नाही. आमच्या नाशकाच्या वरच्या बाजूला उगम पावणारी नदी पुढे जात जात नांदेडच्या बोरगावकरांना इतकी माया लावते, हे वाचताना केवळ गोदेच्या पाण्यावर पोसलेला अजून एक पिंड म्हणून की काय माझे एक वेगळेच नाते या पुस्तकाशी जोडले गेले आहे.

    विनायक पाटील यांनी पुस्तकाला अभिप्राय देताना म्हटल तशीच पुस्तकाची शैली अगदीच वेगळी आहे. पण पुस्तक खाली ठेवावे वाटत नाही इतकी मनाची घट्ट पकड घेणारी आहे. निवडून काढावे आणि मधून मधून वाचत राहावे असे खूप सारे विचारधन या संपूर्ण पुस्तकात पानापानावर विखुरले आहे.

    मलपृष्ठावरून

    विषय चाकोरी बाहेरचा आहे. शैली पहिल्या धारेची आहे. थेट कोंडूरा किंवा बनगरवाडीची आठवण करून देणारे लिखाण आहे. ‘नदीष्ट’ ही मनोज बोरगावकर यांची केवळ कादंबरी नाही, तो आहे त्यांच्या प्रत्यक्षदर्शी आणि अनुभवसिद्ध घटनांचा कसदार ललित गद्य हुंकार. ‘नदीष्ट’ ही मराठी कादंबरीविश्वातील अकरावी दिशा आहे.

    विनायक पाटील, नाशिक

    पुस्तकाविषयी

    नांव: नदीष्ट
    लेखक: मनोज बोरगावकर
    पृष्ठ संख्या: १६८
    प्रकाशक: ग्रंथाली प्रकाशन
    आयएसबीएन-१०: 9357950702
    आयएसबीएन-१३: 978-9357950701

    माझे रेटिंग

    कथा: ५/५
    लेखनशैली: ५/५
    मुखपृष्ठ: ५/५

    एकूण रेटिंग: ५/५

    कुठे मिळेल?

    तुम्ही वाचायला हवे?

    आजवर जर तुम्ही ही कादंबरी वाचली नसेल तर मग पहिल्यांदा जवळच्या दुकानात जा, तुमची प्रत घेऊन या. आणि अगदीच घरबसल्या हवं असेल तर ऑनलाईन मागवा पण हे पुस्तक वाचायला विसरू नका, टाळू नका. वाचून झालं की नक्की सांगाल, अगदी उत्तम आहे म्हणून….


    माझ्या आवडीच्या पुस्तकांबद्दल अजून माहिती हवी असेल तर इथे क्लिक करा.

  • या तळ्याच्या खोल गर्भी

    या तळ्याच्या खोल गर्भी

    बऱ्याच वेळी आपल्या मनात खोलवर भावनांचे कल्लोळ सुरू असतात पण रोजच्या आयुष्यात सामोरे जावे लागणाऱ्या परिस्थितीमुळे आपण त्यांना खोलवरच दाबून ठेवत असतो. पण आत कुठे तरी हा सगळा ताण, राग, उद्वेग सारं काही खदखदत असते. पण चेहऱ्यावर आपण ओढलेला असतो तो शांत दिसणारा मुखवटा. अगदी या निश्चल तळ्यासारखा. याच भावनेतून सुचलेली ही कविता.


    या तळ्याच्या खोल गर्भी,
    गूढ काही दडवलेले.
    उसळूनी येइल झणी ते,
    शांत जरी ते भासताहे .

    थंडशा पाण्या मधेही,
    दाह तो ना शांत झाला.
    अजूनही फुलतोच आहे,
    धुमसणारा हा निखारा.

    भोवतीच्या या तळ्याची,
    वाफ होईल त्या क्षणाला.
    ज्या क्षणी लागेल बत्ती,
    अन् फुटे अंगार सारा…


    तळ्याच्या काठावरून

    नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीच्या मागच्या बाजूला असलेला हा पाझर तलाव. अतिशय शांत आणि हिरवागार असणारा हा परिसर नाशिकमधील एक छान जागा आहे. तळ्याच्या बाजूने जाणारा रस्ता तुम्हाला सातपूर MIDC मध्ये घेऊन जाईल. कधी गेलात नाशिकला तर एखादी चक्कर नक्की टाका. नाशिककरांच्या भाषेत सांगायचे तर एक पट्टा मारून या!

    माझ्या आणखी इतर कविता वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

  • गारूड देसाईंच्या “श्रीमान योगी”चं

    गारूड देसाईंच्या “श्रीमान योगी”चं

    तेव्हा मी चवथी पाचवीत असेन कदाचित. तोवर आजीच्या कपाटातली पुस्तकं कधी कधी ओझरतीच दिसायची. कधी कधी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातून आणलेले पुस्तक पण डोळ्यासमोर यायचे . पण कधी हातात घेऊन वाचायची इच्छा झाली नाही. बहुतेक, उन्हाळी सुट्टी होती. कधी नव्हे ते आजीच्या कपाटातील पुस्तकांचा खजिना धुंडाळत होतो. पुस्तकांच्या कडेला लिहिलेली पुस्तकाची आणि साहित्यिकांची नावे वाचता वाचता एका वेगळ्याच पुस्तकाशी माझी नजर थांबली.

    पुस्तक चांगल जाडजूड होतं. वेगळ्याच पिवळसर रंगाच्या कडक बांधणीच्या पुस्तकावर कोणतीच नोंद नव्हती. पुस्तकाचं नांव नाही, कोणी लिहिलं माहिती नाही. पण त्या रंगाने मला चांगलेच पकडुन ठेवले. आपसूक हात पुढे गेला आणि पुस्तक बाहेर काढले. त्या वेळी बरेच जड वाटले ते. हजार एक पाने सहज असतील असा विचार करत पुस्तकाचं मुखपृष्ठ उलटले आणि ठळक केशरी अक्षरे डोळ्यापुढे आली.

    “श्रीमान योगी”. अर्थ, अर्थातच कळला नाहीच. पण वाचायला सुरुवात केली आणि आयुष्यात पहिल्यांदा पुस्तक वाचण्यात काय मजा असते हे रणजित देसाई या माणसाच्या एका पुस्तकाने पहिल्या फटक्यात दाखवून दिले. रणजित देसाई किती थोर साहित्यिक आहेत याची जाणीव तेव्हा असण्याचे काहीच कारण नव्हते पण त्या पुस्तकातले शब्द जणू माझ्या मानगुटीवर बसले आणि चक्क ३ दिवसात मी त्या पुस्तकाचा फडशा पाडला…

    पुढे याची अनेक पारायणे झाली. देसाईंची अजून काही पुस्तके मधल्या काळात वाचली पण ती विस्मरणात गेली आहेत. आता नव्याने देसाईंची पुस्तके हाती घेतो आहे. “बाबुलमोरा” या कथासंग्रहापासून पुनश्च हरिओम…


    माझ्या वाचनात आलेल्या इतर पुस्तकांबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. प्रोज प्रकाशनाने प्रकाशित केलेला माझा ऑडिओ कविता संग्रह “चिमुकली स्वप्ने” तुम्हाला इथे ऐकता येईल.

  • एकटाच सागरतीरी: My experience of tranquility at the seashore

    एकटाच सागरतीरी: My experience of tranquility at the seashore

    हलकेच वाहतो वारा,
    त्या निरभ्र संध्याकाळी.
    मी निळाईत बघताना,
    खग माळ उडे अभाळी.

    माडाच्या आडोशाला,
    बसलो सागरतीरी.
    मौनास ऐकताना,
    मी एकटाच त्या वेळी.

    पायाशी येती लाटा,
    फेसळून त्या फुटती
    पण माघारी वळताना,
    नाजूक काढती नक्षी.

    In 2021, my good friend and Painter Snehal Ekbote and I decided to collaborate on her painting series which she had curated. We came up with an idea of desk calendar for the year 2022. It is available for sale for which you can contact me on my social media, or write to me at adisjournalpune@gmail.com.

    This poem is a part of that calendar where I have described how I experienced a tranquility at seashore in my recent visit in Konkan.


    This post is part of Blogchatter’s CauseAChatter. You can find my other entries to this campaign here.