गारूड देसाईंच्या “श्रीमान योगी”चं

तेव्हा मी चवथी पाचवीत असेन कदाचित. तोवर आजीच्या कपाटातली पुस्तकं कधी कधी ओझरतीच दिसायची. कधी कधी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातून आणलेले पुस्तक पण डोळ्यासमोर यायचे . पण कधी हातात घेऊन वाचायची इच्छा झाली नाही. बहुतेक, उन्हाळी सुट्टी होती. कधी नव्हे ते आजीच्या कपाटातील पुस्तकांचा खजिना धुंडाळत होतो. पुस्तकांच्या कडेला लिहिलेली पुस्तकाची आणि साहित्यिकांची नावे वाचता वाचता एका वेगळ्याच पुस्तकाशी माझी नजर थांबली.
पुस्तक चांगल जाडजूड होतं. वेगळ्याच पिवळसर रंगाच्या कडक बांधणीच्या पुस्तकावर कोणतीच नोंद नव्हती. पुस्तकाचं नांव नाही, कोणी लिहिलं माहिती नाही. पण त्या रंगाने मला चांगलेच पकडुन ठेवले. आपसूक हात पुढे गेला आणि पुस्तक बाहेर काढले. त्या वेळी बरेच जड वाटले ते. हजार एक पाने सहज असतील असा विचार करत पुस्तकाचं मुखपृष्ठ उलटले आणि ठळक केशरी अक्षरे डोळ्यापुढे आली.



“श्रीमान योगी”. अर्थ, अर्थातच कळला नाहीच. पण वाचायला सुरुवात केली आणि आयुष्यात पहिल्यांदा पुस्तक वाचण्यात काय मजा असते हे रणजित देसाई या माणसाच्या एका पुस्तकाने पहिल्या फटक्यात दाखवून दिले. रणजित देसाई किती थोर साहित्यिक आहेत याची जाणीव तेव्हा असण्याचे काहीच कारण नव्हते पण त्या पुस्तकातले शब्द जणू माझ्या मानगुटीवर बसले आणि चक्क ३ दिवसात मी त्या पुस्तकाचा फडशा पाडला…
पुढे याची अनेक पारायणे झाली. देसाईंची अजून काही पुस्तके मधल्या काळात वाचली पण ती विस्मरणात गेली आहेत. आता नव्याने देसाईंची पुस्तके हाती घेतो आहे. “बाबुलमोरा” या कथासंग्रहापासून पुनश्च हरिओम…
माझ्या वाचनात आलेल्या इतर पुस्तकांबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. प्रोज प्रकाशनाने प्रकाशित केलेला माझा ऑडिओ कविता संग्रह “चिमुकली स्वप्ने” तुम्हाला इथे ऐकता येईल.
वाचनाची आवड लागण्यासाठी कारणीभूत असलेल्या पुस्तकांपैकी एक…