आहिस्ता आहिस्ता…

वास्तविक ठरलेली वेळ साडे-सहाचीच, पण नेमकं आज ऑफिसमधलं काम लवकर आटोपलं आणि विराज कॅफेमध्ये चांगला पाउण तास अगोदर पोचला. रीना वेळेआधी पोचण्याचा काही स्कोपच नव्हतं. झालाच तर उशीरच होईल. तसं पाहिलं तर दोनच दिवस आधी त्यांची भेट झाली होती. पण अगदीच थोडा वेळ. आणि कित्येक महिन्यांनी भेटणाऱ्या दोन खास मित्र-मैत्रिणीला तो कसा काय पुरेसा वाटेल. त्यामुळे खूप काही बोलायचं राहून गेलं होतं. शेवटी आज पुन्हा भेटू असं ठरलं, आणि सुदैवानी दोघांनाही ऑफिसला विशेष काम नव्हतं.

पण हा पाउण तास कसा काढायचा याचा मोठ्ठा प्रश्न विराजसमोर होता. विराज पुण्यात येऊन चांगली ५ वर्ष झाली होती. एव्हाना त्यांनी बऱ्याच जागा पालथ्या घालुन त्याच्या खास अशा टॉप १० ची एक यादी बनवलेली. त्यातलंच कॅफे त्यांनी आज भेटायला निवडलेलं. दोघांनाही सोयीचं असं. एका उंच पामट्री भोवती केलेली सुंदर सिटींग अरेंजमेंट आजूबाजूच्या कुंड्यांमुळे गार्डन फील असला तरीही योग्य ती प्रायवसी होती. हा गार्डन फीलच विराज चा वीक पॉईंट होता.

इतकं आवडतं कॅफे असूनही नुसत आजूबाजूच्या झाडांकडे बघत पाउण तास घालवणं आज विराजला शक्य नव्हतं. सानिका बाहेर गेलेली शॉपिंगसाठी त्यामुळे तिला फोन किंवा मेसेज करणे म्हणजे निव्वळ निष्फळ प्रयत्न. कारण एकदा शॉपिंगच भूत डोक्यावर बसलंकी सानिकाला शेजारी उभं राहून बोललं तरी ऐकू येणार नाही यावर विराजचा ठाम विश्वास होता. त्यामुळे त्या बाजूलाही शांतता होती.

शेवटी न राहून विराजनी कानात हेडफोन सरकवले. आणि अगदी त्याच्यासाठी म्हणून खास मेहेंदी हसन गझल गाऊ लागले. विराजला तसं म्हणजे या हेडफोनच विशेष कौतुक आहे. म्हणजे त्याच्या हेडफोनच असं नाही, एकूणच या सोयीचं. आपल्याला हवा तो गायक हवं ते गाणं हव्या त्या वेळेला गाऊ शकतो, अगदी फक्त आपल्यासाठी. गाण्याचे हे वेडच सानिका आणि त्याला एकत्र घेऊन आले होते. पण आजची त्याची भेट खास होती कारण हे दोन बेस्ट फ्रेंड्स आज कित्येक महिन्यांनी निवांत भेटणार होते. नोकऱ्या चालू झाल्यापासून दोघही रुटीनमध्ये पार अडकून गेली होती.

इतकं सारं मनात धावत होता, कानात आता गुलाम अली गात होते. इतर लोकांनी मागवलेल्या कॉफीचे वास नाकात शिरत त्याच्या मनातल्या विचारांना अजूनच वेगात धावायला मदत करत होते. पण लेकाचं घड्याळ काही केल्या वेळ पटापट कापत नव्हतं. अगदी जगजीतजींच्या गझल सारखं ‘आहिस्ता, आहिस्ता’. जगात योगायोग की काय म्हणतात तो हाच. आहिस्ता आहिस्ता संपत नाही तोच रीना दारातून शिरतांना विराजच्या डोळ्यांना दिसली. इतका वेळ वाट पाहायला लागल्याचं बोअरडम एका क्षणात कुठल्या कुठे निघून गेलं.

Leave a Reply

%d bloggers like this: