शांता शेळके – मराठीतली साहित्यागंगा….

आज सकाळी सकाळी बाहेर फिरत असताना वाऱ्याच्या झोताबरोबर एक कागद उडत आला आणि अंगावर पडला. काय आहे ते बघावं तरी म्हणून सहज कागद हातात धरला आणि पावलं थबकली. जुना कागाद होता. आणि त्यावर काही ओळी छापलेल्या होत्या. कविता वाटत होती म्हणून थांबून नीट वाचली. ते जुन्या बालभारतीच्या पुस्तकाचा पान होतं, आणि कविता होती “लाडकी बाहुली” कवयित्री शांता ज. शेळके. तिथेच बाजूला बाकावर बसून ती कविता मन लावून वाचली. किती तरी वर्षांनी ती कविता वाचायला मिळाली. ती पण अगदी अनपेक्षितपणे. कविता वाचता वाचताच मनात शांताबाईंच्या अनेक कविता येऊ लागल्या. गाणी उमटू लागली. जणू त्यांच्या गाण्यांचा आणि कवितांचा कार्यक्रमच मनाच्या थिएटरमध्ये चालू आहे. त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत घेत घरी आलो आणि हे लिहायला बसलोय.

मला आठवतंय शांता शेळके या नावाशी ओळख झाली ती बालभारतीच्या पुस्तकांतून. शाळेत रुक्ष करून शिकवल्या जाणाऱ्या कवितांमधून खोल मनाचा ठाव घेणाऱ्या त्या मोजक्या कवितांमध्ये शांताबाईंच्या कविता निश्चितच आढळ स्थान मिळवून आहेत. वास्तविक शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आज्जी. नातवंडांसाठी अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणाऱ्या. पण घरातही असं होतंच नं की आपले बाबा, काका, आत्या; आज्जी-आजोबांना ज्या नावानी हक मारतात त्याच नावानी आपण मारतो, तसाच आम्ही पण या शांत आज्जीला; शांताबाई शेळके असंच ओळखू लागलो. वास्तविक बालभारातीतून आम्हाला भेटायच्या आधीच शांताबाई आम्हा मुलांना छान छान गाण्यातून भेटल्या होत्या, पण तेव्हा कुठे काही कळत होतं? किलबिल किलबिल पक्षी बोलती, विहीणबाई विहीणबाई, अशी आमची अनेक आवडती बालगीत शांताबाईंनी लिहिली हे फार नंतर कळले. सांगण्याचा मुद्दा असा की अगदी औपचारिकपणे म्हणजे नेमून दिले म्हणून अभ्यास करा अशा वातावरणात शांत शेळके या नावाशी ओळख झाली, आणि त्यांच्या शब्दांतून जणू आज्जी आमचे लाड करतेय अशीच जाणीव झाली. मधुर शब्दांमुळेच त्या रुक्ष नावडत्या कविता विभागातून शांत शेळके या नावाशी मनाचा एक घट्ट नातं तयार झालं.

वय वाढत गेलं, तसे मराठी हा विषय अभ्यासातून मागे पडत गेला आणि नेमून दिलेली कवितादेखील आयुष्यातून बाहेर पडली. पण त्या नेमलेल्या कवितांमधून ज्या शब्दांनी मनात जागा निर्माण केली ते पुनःपुन्हा वाचनात येत राहिले, ते कवी काव्यसंग्रहातून भेटत गेले. शांता शेळके तर फारच जवळच्या. त्यांचे वर्षा, रुपसी इत्यादी काव्यसंग्रह मनात ठसलेले आहेत. कधीतरी आकाशवाणीवर एखादं गाणं लागतं, आवडीचं म्हणून आपण मन लावून ऐकतो. गाणं संपतं, आणि नंतर होणारी उद्घोषणा त्याचा आनंद द्विगुणीत करते. तेव्हा कुठे कळत की हे तर शांतबाईंच गाणं आहे. तरुण वयात आपलीशी वाटणारी अनेक प्रेमगीतं त्यांनी लिहिली. कोळीगीतं लिहिली, “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली. पं. जितेंद्र अभिषेकींच्या दोन नाटकांसाठी पदे देखील केली. “काटा रुते कुणाला” हे गझलच्या आकृतीबंधातले पद तर रसिकांच्या मनात अमर पदावर बसले आहे. इतकेच नाही तर “रेशमाच्या रेघांनी”, “नाव सांग सांग सांग नाव सांग”, अशा एकाहून एक ठसकेबाज लावण्या पण त्यांनी रसिकांसाठी दिल्या आहेत. “बांबूच्या वनात” सारखं पायांना हलवणार गाणं तर तरुणांनी डोक्यावर घेतलंय. “शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय.

त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारे आहे. वाचायला घेतले की सोडवत नाही पुस्तक. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपनाबद्दलच्या त्यातील आठवणी तर आपल्याला हेवा करायला लावतात. तसेच “पावसाआधीचा पाऊस”, “आनंदाचे झाड”, “वडीलधारी माणसे” हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच बोलके आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीनी फक्त अर्थार्जनाचे साधन नव्हते तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारेपण होते. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकुंचे. जपान मधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे “पाण्यावरच्या पाकळ्या” नावानी ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात. तसेच त्यांनी ल्युइसा मे आल्कॉट्ट च्या “लीट्टील वूमन” या कादंबरीचा “चौघीजणी” नावानी अनुवाद करून १९६८ साली प्रसिद्ध झालेल्या त्या इंग्रजी कादंबरीतील चार बहिणींचे परस्परांवरील प्रेम, अशा-आकांक्षा, भविष्याबाबतची स्वप्नं, सारे सारे अस्सल मराठीतून आपल्यासमोर मांडले. या भाषांतराला तर फार प्रसिद्धी आणि प्रतिसाद मिळाला. शिवाय त्यांनी कालिदासाचे आजराअमर काव्य मेघदूत मराठी रसिकांसाठी मराठीत आणले.

शांताबाईंना त्यांच्या साहित्यासेवेबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. त्यातील उल्लेखनीय म्हणजे, १९९६ सालचा ग दि मा पुरस्कार. शिवाय त्यांना भुजंग या चित्रपटासाठी भारत सरकारचा गीतलेखनाचा पुरस्कार मिळाला तर “मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश” या गाण्यासाठी सूर सिंगार पुरस्कार मिळाला. तसेच २००१ साली त्यांना यशवंतराव चावण प्रतिष्ठान कडून त्यांच्या साहित्यासेवेसाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शांताबाईंची साहित्यसेवा इतकी अथांग आहे की त्यांना साहित्यागंगा म्हटलेले वावगे ठरणार नाही. फार पूर्वी भगीरथाने स्वर्गस्थ गंगा मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर आणली. पण जणू स्वर्गात साहित्यागंगेची अत्यंत निकडीची आवश्यकता भासली असावी म्हणून कोणी स्वर्गस्थ भगीरथ कॅन्सर च्या रुपात येऊन दिनांक ६ जून २००२ साली ही साहित्यागंगा स्वर्गी घेऊन गेला. तेव्हा पासून शांताबाई आपल्यात त्यांच्या साहित्यारुपाने वावरत आहेत आणि कायमच वावरतील.

 

3 Comments

Leave a Reply