Adi's Journal

Pieces of my thourhgs

मुखवटे

मध्यंतरी असेच युट्यूब वर काही व्हिडीओ बघता बघता माईमींग च्या काही क्लिप्स बघितल्या. थोड्या विनोदी अंगानी मूकपणे अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्याची ही कला मनात घर करून गेली. पण ते मुखवटे माझ्या डोक्यात एक वेगळाच धागा सोडून गेले. खरंच आपलं मन कशावरून कशाचा विचार करेल हे सांगणं अगदी अशक्य आहे. इतक्या विनोदी गोष्टी बघतानापण मनात कुठेतरी खोल रोजच्या जीवनात आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या असंख्य मुखवट्यांचा विचार मनात घोळत होता. प्रत्येक जण आपल्या चेहेऱ्यावर कसला न कसला मुखवटा घालूनच सारीकडे वावरत असतो.

अगदी शाळा कॉलेजातल्या मुला मुलींपासून साठी-सत्तरीकडे झुकलेल्या वयस्कर लोकांपर्यंत सारेच आपापले मुखवटे सांभाळत लगबगीनी वावरत असतात. जाणते झाल्यापासूनच हा मुखवटा चेहेऱ्यावर ओढून फिरताना कसले मणामणाचं अदृश्य ओझंच खांद्यावरून वाहून नेत असतात. या मुखवट्यांमुळे समाजात निर्माण झालेल्या आपल्या प्रतिमेला सांभाळण्याचे ओझे. नं जाणो चुकून मुखवटा बाजूला झाला अन् आत लपवलेलं ते निरागस मुल खुद्कन हसून बाहेर आलं तर? नाही नकोच. कल्पनाच नको.

वयाची अमुक एक वर्ष झाली की तुम्ही कायम गंभीरच राहायला हवे. त्यातून जर तुम्ही फारच कर्तुत्ववान असाल तर विचारायचीच सोय नाही. जरा कुठे गालावर जास्त हसू उमटले तर गावभर होईल इतके मोठे झाले तरी चारचौघात दात काढून हसतात. नकोच, आपलं मुखवटा घालूनच फिरुयात न. मुखवट्याच्या आड आपण आपलेच असणार. असा विचार करून एकदा मुखवटा चढवला की त्याची इतकी सवय होऊन जाते की त्याच्या आड आपलं स्वतःचं असं काही रूप आहे, अस्तित्व आहे हेच माणूस विसरून जातो. समाजासाठी ओढलेला मुखवटा मग हळूहळू घरात पण येतो आणि ते निरागस मुल जणू त्या मुखवट्याआड कैद होऊन जातं.

जिथे मोकळेपणानी हसण्याचीच चोरी होते तिथे संगीत, वाचन, नाटक-सिनेमे शहरात लागलेली प्रदर्शनं यांचा आनंद घेणं वगैरे तर दुरचीच गोष्ट झाली. साधा रोजचा बाजार करतानासुद्धा चार पैश्याची घासाघीस करता येत नाही. खात्री असते, चार शब्द बोलले तर ५-१० रुपये कमी होतील देखील पण नाही. पण नाही. चुकून मुखवटा सरकला तर? त्यापेक्षा सांगतोय त्या किमतीला घ्या अन् मोकळे व्हा. अगदी घरात बायकामुलांबरोबर चहा पिताना देखील कितीही घाई असली तरी कपानीच प्यायचा. भले तोंड पोळलं तरी चालेल मुखवटा उतरता कामा नये. बशीत चहा ओतून फुर्र्कन पिण्यात पण एक मजा आहे हे सारेच विसरलेत.

चार क्षण तो मुखवटा द्यावा फेकून अन् या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद लुटावा असं कधीच वाटत नाही का यांना. छान कुठलं नाटक लागलेलं असतं थेटरात, कधी एखादी मैफिल असते, इच्छा पण असते हे सगळं सगळं करायची पण पुन्हा भीती तीच. खरंच द्या फेकून तो मुखवटा एकदा न मग बघा जगण्यात किती मजा आहे. विश्वास दाभोळकरच्या आयुष्यात आलेला “एक उनाड दिवस” तुमच्याही आयुष्यात येउदेत एकदा.

Image courtesy:  Living London Life

Related Posts

Leave a Reply