शुभ्र भीती
~~~
मला ना, पांढऱ्या शुभ्र कागदाची फार भीती वाटते.
भीती वाटते त्यावर पेन टेकवून पहिला काळा ठिपका उमटवायची.
अनंत शक्यता उराशी घेऊन असते त्याची ती शुभ्रता, आणि त्यातल्या किती तरी शक्यतांचा एका अर्थाने मी खूनच करतो ज्या क्षणी त्यावर मी माझा पेन टेकवतो.
मनातून कविता पाझरत असते अगदी अवखळपणे, शब्दामागुन शब्द, ओळींमागुन ओळी.
पण मन मात्र धजत नाही त्या कागदावर उतरवून ठेवायला.
चुकून हातावर शाई आलीच लिहितांना, तर उगाच वाटत राहतं की माझा हात जणू त्या कागदाच्या रक्ताने माखलाय, कारण…
कारण, मी खून केलाय त्या अनंत शक्यतांचा माझ्या पेनाच्या एका ठीपक्यानी.
म्हणूनच मला पांढऱ्याशुभ्र कागदाची फार फार भीती वाटते.
~~~
आदित्य साठे

Leave a Reply