पार
गांव चिमुकला एक चांगला, घरटी टुमदार,
बाजाराच्या रस्त्यावरती आंब्याचा पार.
दिवस कोणता वेळ कोणती नाही चुकणार,
पारावरती सदा दिसावी टाळकी ही चार.
कोठून आले कुठे गेले, सांगा मज सारं,
चारांपैकी एखादा तरी तुम्हा पुसणार.
कोणा संगे कोण जोडी अन् भांडण कोणात,
गावावरती नजर बारकी यांची असणार.
एके दिवशी काय घडावे वेगळेच पार,
पारावरती तीनच डोकी, सारे गपगार.
गांवकरी मग झाडून सगळे पडले कोड्यात,
चौकडीतली एक कडी ही कोठे असणार.
साऱ्यांमध्ये चर्चा झाले काय हो असणार,
पारावराती निरोप आला, गडबड हो फार.
गांवामधूनी वणव्या जैसी ही पसरे बात,
आज पहाटे त्याने केला भवसागर पार…