Your cart is currently empty!
“दिसामाजी काही तरी लिहावे” हे समर्थवचन लहानपणापासून माहिती आहे, पण माहिती असलेलेल्या किती तरी गोष्टी नुसत्या माहितीतच राहतात. त्यानुसार का कधीतरीच होतं. ‘बंधमुक्त’ लिहिलं त्याला आज २०-२५ दिवस झाले. मनात पक्की खूण बांधली होती की दर आठवड्याला या धाटणीचा किमान एक छोटा लेख लिहायचा. पण असं ठरवल्याबर हुकुम घडेल तर ती तुम्हा आम्हा सामान्य जनांची कहाणी कशी होईल?
आता तुम्ही लगेच म्हणाल, “आळशी आहेस, ठरवलं आणि मनापासून इच्छा असली की सर्व काही जमतं.” यावर आपलं अगदी एकमत आहे हो, पण काही न काही कारण होऊन या गोष्टी लिहिणं राहूनच जातं. दर आठवड्याला कुठलेसे सदर लिहिणारे लेखक, YouTubeवर नियमितपणे creative content तयार करणारे कलाकार या साऱ्यांचा मला या एकाच कारणामुळे हेवा वाटतो. पण त्याच बरोबर यांच्याकडून मला खूप प्रेरणा आणि प्रोत्साहन देखील मिळत असतं.
मागला आठवडाभर सर्वत्र olympic चे वारे वाहत आहेत. गेले दोन दिवस तर भारतीयांच्या आनंदाला सीमा उरल्या नाहीयेत. साक्षीच पाहिलं वहिलं कांस्य पदक आलं आणि या रिओ २०१६ मधला भारताचा भोपळा फुटला. पाठोपाठ सिंधूनी आपल्या खात्यात एक रजत जमा करून पदक तालिकेत भारतासाठी १० जागांची लांब उडी मिळवून दिली.अर्थातच दोघींवर कौतुकाचा वर्षाव आणि बक्षिसांची खैरात सुरु झाली. पण सारा देश त्या आधी भारताच्या पदरी आलेल्या शून्य पदकांवरून पार टोकाच्या भूमिका घेऊन मोकळा झाला होता. रामाजाच्या सर्व स्तरांतून निराशावादी सूर येत होता. सरकारच्या नाकर्तेपणापासून ते “फक्त सेल्फी काढायला गेलेत का?” इथपर्यंत कित्येक वेगवेगळे तर्क सुरु होते.
पण olympic मध्ये खेळण्यासाठी पात्र व्हायला या सर्व खेळाडूंनी कित्येक वर्ष जीवाचं रान केलं याकडे कोणलाच लक्ष द्यावेसे वाटत नव्हते. मनात आलं म्हणून गेलो olympic ला असा थोडंच आहे? आपल्या देशात एकूणच क्रीडा क्षेत्राबाद्द्ल अनास्था आहे यात वाद नाही. पण या साऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे सर्व खेळाडू आपल्या देशाच्या नावासाठी तिथे जीवाचं रान करत असतात. मैदानावर उतरताना दिवसाच्या शेवटी भारताचे राष्ट्रगान कसे वाजेल याचेच गणित, आणि त्यासाठी करायचे डावपेच प्रत्येकाच्याच मनात असणार यात तिळमात्र शंका नाही.
आपापल्या घरात टीव्ही समोर बसून त्यांचे यशापयश बघत आजूबाजूच्यांना फुकटचे सल्ले देणं खूप सोपं आहे. हे सर्व खेळाडू आपापल्या खेळांमध्ये भारतात अव्वल आहेत हे मात्र सर्व जण सोयीस्करपणे विसरलेले असतात. आज वयाच्या वीस बाविसाव्या वर्षी आपल्या देशाची मान अभिमानाने ताठ करण्यासाठी सर्व खेळाडू प्रयत्नशील आहेत. त्यांच्यावर टीका करताना किंवा हरले म्हणून आपल्याच घरात आणि सोशल मिडियावर आरडा ओरडा करतांना आपण त्या वयात काय करत होतो याकडे हळूच वळून पाहिलं तर फार बरं होईल. सर्वच गोष्टींची जबाबदारी सरकारवर ढकलण्यापेक्षा आपापल्या परीनी यात कसा बदल करता येईल याकडे जर सर्वांनी लक्ष दिलं तर भारत टोकियो २०२० मध्ये नक्कीच जास्त पदकांची आशा करू शकेल.
Discover more from Adi's Journal
Subscribe to get the latest posts sent to your email.
Leave a Reply