Adi's Journal

Pieces of my thourhgs

ब्लॅक अँड व्हाइट

सोशल मिडिया म्हणजे नं वेगवेगळ्या तऱ्हेवाईक खुळांच शेतच आहे. दर आठ पंधरा दिवसांनी काही न काही नवीन खूळ निघतं. मग ते तुमचं प्रोफाईल पिक्चर कुठल्याशा विशिष्ट रंगात रंगवणे असेल किंवा आवडता Music video टाकणे असेल. कित्येकांना बऱ्याच वेळा या वेगवेगळ्या फिल्टरमागचे कारण माहितीही नसते हे त्या LGBTEQ+ च्या इंद्रधनुष्याला आपल्या फोटोंवर रंगवताना कित्येकांनी नकळत उघड केले.

कधी कधी चॅलेंजेसचं पेव फुटतं. मग काय ice bucket challenge पासून love your partner challange पर्यंत अखंड मालिका सुरु असते. याच मालिकेत दीड दोन महिन्यांपूर्वी ब्लॅक अँड व्हाइट चॅलेंज फिरत होतं. मुळात मला या प्रकारात काही चॅलेंजिंग आहे हेच वाटत नव्हतं. आपला स्वतःचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो लावायचा यात कसलं आलंय चॅलेंज?

हा आता जर त्या फोटोत तुम्ही माकडचेष्टा करा असं सांगितलं तर कदाचित काही लोकांना ते जरा चॅलेंजिंग झालं असतं. कल्पना करा न, मोठ्या मोठ्या कंपन्यांचे CEO, chairman आपापल्या सोशल मिडियावर वाकोल्या दाखवणारे ब्लॅक अँड व्हाइट फोटो मिरवत आहेत. इतकंच काय तर सदा गंभीर चेहेऱ्याने वावरणारे राजकारणी संसद सोडून इथेपण लहान मुलांसारखे एकमेकांना फोटोतून वाकोल्या दाखवतायत. पण लहान पोराटोरांची आणि मनात लहान पोर जपलेल्या लोकांची या अटीमुळे एकदम धमाल चालू आहे. कोण किती कल्पकतेने माकडचेष्टा करू शकतं याची जणू स्पर्धाच लागली आहे.

पण मला स्वतःला हा कृष्णधवल प्रकार फार आवडतो. एक हौशी छायाचित्रकार म्हणून कित्येकवेळा मी या रंगसंगतीमध्ये फोटो काढतो. केवळ काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या विविध छटांतून फोटोतले बारकावे बघायला इतकं छान वाटतं. पण हे मात्र खरं आहे की ब्लॅक अँड व्हाइट मध्ये काम करताना सारं कसब पणाला लागतं. जरा इकडे तिकडे झालं की फोटो एक तर पांढरा होतो नाही तर एकदम अंधारा. कित्येक वेळा तर १०-१५ प्रयत्न करावे लागतात. पण आजकाल फोटोंना फिल्टर लावणे मोबाईल मधल्या कित्येक फोटो एडिटिंग अॅप्समुळे इतकं सोप्प झालं आहे त्यामुळे या ब्लॅक अँड व्हाइट फोटोग्राफीमधली सारी मजाच निघून जाते.

रंगीत फोटोमध्ये रंगांची मजा येते पण कृष्णधवल फोटोंमध्ये जो प्रकाशाचा खेळ दिसतो त्यातली मजा काही औरच आहे. हा लेख लिहितांना मला हे प्रकर्षानी जाणवतंय की खूप महिन्यांत मी माझा कॅमेरा हातात घेतला नाहीये. मोबाईल कॅमेरा चांगला असल्याने जरा आळशी झालोय. पण आता नक्कीच कॅमेरा उचलून कुठेसे जायची वेळ आली आहे. चला, येताय माझ्याबरोबर? जाऊया भटकंतीला. नाही तर मी येईनच तुमच्यासाठी फोटो घेऊन. आणि नक्कीच त्यातले बरेच फोटो ब्लॅक अँड व्हाइट असतील.

Related Posts

Leave a Reply