हुतात्मा – संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाथा
१ मे, जगभरात साजरा होतो तो कामगार दिवस म्हणून पण इथे महाराष्ट्रात या १ मे ला विशेष धार मिळाली ती १९६० मध्ये मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा. माझा जन्म १९८८ सालचा त्यामुळे ना मी भारताच्या स्वतंत्राचा लढा पहिला ना संयुक्त महाराष्ट्र चळवळ अनुभवली. शालेय इतिहासातून सुद्धा स्वातंत्र्ययुद्धाची तुरळक माहिती मिळाली पण स्वातंत्र्योत्तर काळात भारत घडलेल्या घटना आमच्यापर्यंत दंतकथेसारख्याच येत राहिल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी संबंधित जी गोष्ट कानावर पडली ती शाहीर विठ्ठल उमप यांच्या आवाजातली अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली मुंबईची छक्कड. पण तो काळ डोळ्यासमोर उभा केला तो या महाराष्ट्र दिनाला Zee5 वर प्रदर्शित झालेल्या हुतात्मा या वेबसिरीजमधून. आता ZEE5 वर हुतात्मा ऑनलाइन पहा
१९५६ च्या भाषावार प्रांतरचनेत ‘बॉम्बे स्टेट’ हे गुजराथी आणि मराठी भाषिकांचे द्विभाषिक राज्य बनले आणि विदर्भ आणि मराठवाडा हे मराठी भाषिकांचे भाग मराठी राज्यापासून वेगळे राहिले. या अन्यायाचा परिपाक म्हणून उभी राहिली ती संयुक्त महाराष्ट्र चळवळ. जिच्या नेतृत्वाची धुरा केशवराव जेधे, प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, कॉम्रेड डांगे, एस. एम. जोशी, शाहीर अमर शेख यांच्यासारख्या अनेक तालेवार मंडळींनी सांभाळली. शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांच्या दमदार पोवाडे, लावण्या आणि इतर लोकगीतांनी या चळवळीची नाळ लोकांशी जोडली गेली.
हुतात्मा हि वेबसिरीज आपल्यासमोर उलगडते तीच मुळी १९५६ साली फ्लोरा फाउंटनवर झालेल्या नरसंहाराच्या दृश्यांनी. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या घोषणांच्या नादात चाललेल्या शांततापूर्ण मोर्च्यावर केलेल्या लाठीमार आणि अश्रुधुराच्या माऱ्यानंतर उसळलेल्या गोंधळाला आळा घालायला मोरारजी देसाईंनी गोळीबाराचा आदेश दिला आणि १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले. याच गोळीबारात जीव गमावलेल्या गिरणी कामगाराच्या मुलीच्या ‘विद्युलता सावंत’ म्हणजेच विद्युतच्या भोवती ही सारी कथा गुंफली आहे.
त्या काळात महाराष्ट्रात असलेल्या वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांची अत्यंत योग्य अशी सांगड या वेबसिरीज मध्ये घातलेली दिसून येते. काँग्रेस, कम्युनिस्ट चळवळ, संयुक्त महाराष्ट्र समिती या साऱ्यांच्या राजकीय पटावर घडणाऱ्या घडामोडींचा मुंबईच्या स्थानिक मराठी माणसाच्या जीवनात काय प्रभाव पडत होता, तरुण मन वेगवेगळ्या विचारधारांकडे कोणत्या पद्धतीने आकृष्ट होत होते हे सारं काही मी आत्तापर्यंत पाहिलेल्या पहिल्या दोन भागातच इतकं समर्पक रीत्या मांडले गेले आहे की मला पुढचे भाग कधी एकदा पाहीन असे झाले आहे.
सचिन खेडेकर, डॉ. मोहन आगाशे, विक्रम गोखले, जयंत सावरकर, रवींद्र मंकणी, लोकेश गुप्ते, आनंद इंगळे असली जबरदस्त उमदी फळी घेऊन रिंगणात उतरलेल्या या वेबसिरीज मध्ये नायिकेचं काम करणारी अंजली पाटील, पहिल्या दोन भागात भाव खाणारे काम करणारा वैभव तत्ववादी आणि अभय महाजन तितक्याच ताकदीने उभे आहेत. अभय महाजनचे ‘श्रीरंग पत्की’ या वार्ताहराचे पात्रसुद्धा अगदी योग्य वठले आहे. बातमीदाराने दिलेल्या बातमीवर आपल्या लेखणीने “ध चा मा” करण्याची ताकद ठेवणाऱ्या संपादकाच्या हाताखाली कराव्या लागणाऱ्या कामाबद्दलची खंत छान उठून येते.
या शिवाय मला अगदी प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे संवादांच्या भाषेचा आणि पात्रांच्या पार्श्वभूमीनुसार केल्या गेलेल्या वेगवेगळ्या बोलींचा वापर. भीमाबाई नाईकांच्या भूमिकेत छाया कदमांनी वापरलेली कोकणी मराठी एक चरचरीत फोडणी देऊन जाते. किरकोळच हिंदी संवाद असलेल्या पात्रांच्या तोंडच हिंदी सुद्धा मस्त जमून आलं आहे. मालिकेचा कपडेपट सांभाळणाऱ्या पोर्णिमा ओक यांनी एकदम चोख काम करत १९५६ साल प्रेक्षकांसमोर उभे केले आहे. पण या साऱ्यांच्या चार पाऊले पुढे राहून पहिल्यांदा हे सारं काही मनाच्या पडद्यावर निर्माण करून मग आपल्यासाठी चित्रीकरण करून घेणाऱ्या जयप्रद देसाई यांच करावं तितकं कौतुक कमीच होईल. ऐतिहासिक कथानकाला हात घालतांना कित्येक गोष्टींचा दहादा विचार करावा लागतो हे काही चित्रपटांना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विरोधावरून आपल्या लक्षात येतेच. पण जयप्रद देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली ‘हुतात्मा’ अगदी उत्तम बनली आहे. उरलेले भाग बघण्याची उत्सुकता टिकवून ठेवण्याच्या जागांवर प्रत्येक भाग संपतो आहे. त्यामुळे लवकरच पुन्हा नवीन काय पहायचे हा प्रश्न प्रेक्षकांना पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Discover more from Adi's Journal
Subscribe to get the latest posts sent to your email.
One thought on “हुतात्मा – संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाथा”