“मनातल्या मनात खरं तर किती वेळा याची प्रॅक्टिस केली होती. पण आयत्या वेळी घोळ व्हायचा तो झालाच. ऐन वेळी मनाची पाटी साफ कोरी कशी होते कळत नाही. नेमक्या वेळी बरोब्बर दगा कसा द्यायचा या मनाकडून शिकावं. बेटा नको तेव्हा विसरतो. अन् मला कळत नाही फक्त ती समोर असतांनाच? श्या काही खरं नाही.” दिग्याचे प्रियाला भेटून येतानाचे विचार. अर्थात ही काही पहिलीच वेळ नव्हती असे विचार येण्याची. वास्तविक चांगले ५ – ६ वर्षांपासून एकमेकांबरोबरच असतात कायम. कॉलेजमध्ये, बाहेर भटकायला गेल्यावर, कधी कोणत्या व्याख्यानाला तर कधी एखाद्या छानशा गाण्याच्या मैफिलीला कुठेही गेले तरी ही जोडगोळी बरोबरच. मग त्यांच्या कंपूतली मंडळी सोडणार आहेत होय. तसं चिडवणं पहिल्या वर्षातच सुरु झाला होता. पण आजकाल कॉलेज संपल्यामुळे नेहमीसारख्या भेटीगाठी होत नव्हत्या.
दिग्या मनात ठरवून गेला होता आज भेटायला. त्यासाठी चक्क बाकी लोकांना टांग देऊन दोघंच भेटली होती पण नेहमीसारखे मुग गिळून महाराज परतले होते. “दिग्या, दिग्या कसं होणार रे तुझं. लेका धड प्रपोज करता येत नाही तुला? मारे इतरांना शिकवत असतोस असं कर अन् तसं कर. आता कुठे गेले तुझे सगळे फंडे? कळलं ना आता कशी तंतरते ती समोर आल्यावर. किमान आता तरी बढाया मारत जाऊ नकोस, अन् फुकट सल्ले तर आजिबात देऊ नकोस लोकांना.” दिग्याच स्वतःलाच उपदेश देणं चालूच होतं; अर्थातच मनात.
“लेका संधी एकदाच येते रे. घालवलीस न वाया. ठरवलंच तिच लग्न तिच्या परम्पुज्यांनी कोणाशी तर? आयुष्यभर रडत का बसणारेस? उगीच भीतोस नाही म्हणेल म्हणून. तिला असं वाटतच नसतं तर बाकीच्यांना टांग देऊन तुझ्याबरोबर एकटीच कॉफी पीत बसली असती का? काय तरीच तुझं आपलं.” दिग्याच मन त्याची शाळा घेतं. “तू तर काही बोलूच नकोस. ऐन वेळी घोळ घालणारा तूच आहेस. सगळं विसरायला कोणी सांगितलेलं? अर्थात माझाही गाढवपणा आहेच. या गोष्टी पाठ करून थोड्याच बोलता येतात. पण तू जा रे तुझा जाम राग आलाय मला. मी पाठांतर करायचा गाढवपणा केला तो केला, तुला विसरायला कोणी सांगितलेलं?” दिग्या आपलं उगीच मनाशी वाद घालत बसलेला.
तेवढ्यात मोबाईल वाजला. प्रियाचाच मेसेज…………
“दिग्या काय बोलायचय? काही नाही म्हणू नकोस मार खाशील. गेली ६ वर्ष खूप जवळून ओळखते तुला. तुला बोलायचा होतं खास पण बोलला नाहीस.” “आईचा घो…. हिला कसं कळलं.” “दिग्या लेका मगापासून सांगतोय तुला, वाट बघण्यात वेळ घालवू नकोस” “तू गप् रे साल्या. हिला काय उत्तर देऊ त्याचा विचार करू दे आधी.” मनाचे आणि दिग्याचे संवाद चालूच होते. ‘उद्या भेट मग सांगतो’ दिग्यानी वेळ मारायला म्हणून मेसेज करून टाकला. दुसऱ्या मिनटाला उलट मेसेज. ‘ठीके उद्या दुपारी ५ ला आपलं निहेमीच कॅफे.’
हुश्श. आजचं टेन्शन टळलं म्हणत दिग्या एकदाचा घरी पोचला. पण मनातला द्वंद काही संपेना. अगदी रंगीला मधलं गाणंच सारख मनात वाजत होतं. ‘क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्कील हाय, कोई तो बता दे इसका हल तो मेरे भाय.’ रात्रभर असाच एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत उद्या काय बोलायचं याचा विचार करत. “गधड्या परत ठरवून जातोयस?” मनानी पुन्हा एकदा त्याला डिवचले. दिग्यानी उत्तर द्यायचं टाळलं.
दिवसभर हुरहूर मनात घेऊन दिग्या संध्याकाळची वाट पाहत होता. एकदाचा चारचा ठोका पडला आणि दिग्या ऑफिस मधून सटकला. कधी एकदा कॅफेला पोचतोय असं झालेलं. आज काही केल्या प्रियाला सांगितलंच पाहिजे असं मनाशी ठरवून तो निघाला होता. घरी आपलं ऑफिस बॅग टाकायला आणि जरा चांगले कपडे घालायला म्हणून टेकला की पुन्हा बाहेर. धीर धरवत नव्हता लेकाला. बरोबर ५ ला दिग्या कॅफेवर पोहोचला. नेहमीसारखाच प्रियाचा पत्ता नव्हता पण आज दिग्याची चीडचीड झाली नाही.
तिथेच कोपऱ्यातल टेबल पकडून दिग्या बसला खरा पण नजर कायम रस्त्यावर. पायांची अस्वस्थ हालचाल. घड्याळ जसे जसे पुढे सरकत होते तसे दिग्याचे पाय बसल्याजागीच जास्त नाचू लागले. त्याचं मन संधी सोडतय होय. “काय दिग्या, आज बाजी मारणार का?” दिग्या वैतागून उत्तर देणार तोच नजर रस्त्यावर गेली आणि जणू दिग्यासाठी सारी दुनिया स्तब्ध झाली. मनात कुठे तरी सॅक्सोफोन वाजू लागला. आजूबाजूला अंधार पडला आणि एक शुभ्र स्पॉटलाईट प्रियावर स्थिरावला. आजूबाजूच्या स्तब्ध गर्दीतून सफाईनी वाट काढत येणाऱ्या प्रियापुढे त्याला मार्लीन मेन्रो देखील कमी वाटत होती.
प्रिया पार टेबलाजवळ येऊन पोचली तरी दिग्याची समाधी संपेना. प्रियानी नेहमीसारखा त्याच्या डोक्यावर हात फिरवून त्याचा भांग विस्कटला अन् वाजणारे सॅक्सोफोन क्षणात थांबले, आजूबाजूला लक्ख उजेड होता. आणि प्रिया त्याच्या समोर उभी होती. दिग्या गडबडून भानावर आला. “हॅलो…. प्रिया….” दिग्या अडखळत बोलला.
आजही दिग्याच्या डोक्यात तोच ब्लॅक आउट. एक टक बघत बसला होता तिच्याकडे. शेवटी प्रियानीच बोलायला सुरवात केली. नेहमीसारखी तिची बडबड चालू. रोज तिच्या गप्पांमध्ये रस घेणारा दिग्या आज आतून बधीर होता. तिचा बोलणं कानावर पडत तर होता पण झेपत काहीच नव्हतं. “आउच…..” शेवटी प्रियानी त्याचं कान पिळून त्याला भानावर आणले. ही पण तिचीच खास स्टाईल. अन् दिग्या तिच्या याच बिनधास्तपणावर फिदा होता.
महाराज भानावर आले खरे पण मनातले भाव काही केल्या ओठावर येईना. उगीच इकडच्या तिकडच्या निरर्थक गप्पा चालत राहिल्या. एक गोष्ट बोलताना मधेच अचानक विषय बदलून टाकायचा. पण काही केल्या त्याला हवा तो विषय काढता येत नव्हता. शेवटी हिम्मत करून बोलता बोलताच प्रियाचा हात हातात घेतला. अन् टेबलवर क्षणात शांतता पसरली.
क्षणात दोघांचे अंग मोहरून गेले. कॅफेमध्ये जणू आता ते दोघेच उरले होते. मगाचेच जॅझचे सूर आता दोघांसाठी वाजू लागले. प्रकाश मंद झाला. दिग्या हळूच उठला आणि प्रियाचा हात धरून तिला मोकळ्या जागेत घेऊन गेला. हळूच कमरेत हात घालून तिला जवळ ओढले आणि सॅक्सोफोनच्या सुरावर दोघे आपोआप झोके घेऊ लागले. सुरावट संपली तसे दोघे भानावर आले. त्याच टेबलवर बसलेले होते, लख्ख प्रकाश होता, आजूबाजूला बसलेले ग्रुप्स आणि कपल्सदेखील तसेच होते.
प्रियाचा हात अजूनही त्याच्या हातातच होता, अन् तिची नजर खाली झुकली होती. ओठावर आलेल्या मंद स्मितामुळे गालांवर नाजूक खळी पडली होती. तिला हसलेली पाहून दिग्याचा जीव भांड्यात पडला. हिम्मत एकवटून त्यांनी हातातला हात हळूच दाबला तशी प्रियाच्या गालांवर लाली उमटली. दिग्याच्या मनातील गुज अगदी निःशब्दपणेच प्रियाच्या मनाला जाऊन भिडले.
अप्रतिम ..