मानसी, कधीही वाटलं नव्हतं आपण भेटू, आणि एक दृढ मैत्री, एक भावा-बहिणीचं घट्ट नातं विणले जाईल. कधी भेटलो कसे भेटलो हा भाग आपल्यासाठीच ठेवू. वास्तविक तू छान गातेस, भरपूर वाचतेस इतकं माहित होतं. पण मला आत्ता सांगायची आहे ती आठवण खूप वेगळी आहे. मला अजून आठवतो तो तू लिहिलेला सुरेश भटांवरचा लेख. अगदी त्या क्षणापर्यंत मला माहित नव्हतं तू इतकं छान लिहितेस सुद्धा. आपल्या कॉलेजच वार्षिक प्रकाशित करायचं होतं. मी त्या वर्षीसाठी संपादक होतो. अगदी उत्साहात तू काही लिहून देऊ का म्हणून विचारलस.
दोनच दिवसात दोन फुलस्केप पाने माझ्या हातात ठेऊन तू मोकळी झालीस. हातात पडेल ते वाचायला लागणारा मी त्या वेळी मात्र दोन मिनिट त्या कागदांकडे बघत राहिलो; तुझं सुटसुटीत अन् सुंदर अक्षर बघून. तुझं लेख वाचून भटांशी माझी जास्त ओळख झाली. नाही तर मला फक्त “लाभले आम्हास भाग्य” आणि “रंग माझं वेगळा” इतकेच भट माहिती होते. नंतर कुठे काय माशी शिंकली देव जाणे. प्रकाशनाचे काम थांबले अन् पुढे बारगळलेच.
आज आठवण झाली त्याचं कारण म्हणजे “रंगुनी रंगात साऱ्या” च. खूप दिवसांनी गाणं कानावर पडलं आणि भूतकाळाचा पडदा हलला. पुन्हा दोन मिनिट तुझं टपोर अक्षर बघत थांबून मग लेख वाचायची इच्छा झाली. अजूनही जपून ठेवलाय लेख पण नेमका नाशिकला घरी आहे. का बंद केलंस लिहिणं? तुला पुन्हा लिहीतं झालेलं पहायचं आहे.