चंपा

शांत रम्य संध्याकाळ होती, गार वारा वाहत होता. मी असाच शेताच्या बांधावरून चालत होतो. सारंकाही कसं शांत आणि सुरळीत होता. आल्हाददायक. तरीही मन थाऱ्यावर नव्हतं सकाळचे रामाण्णाचे शब्द मनात घर करून होते. दिवसभर घाम गाळून सारं वावर नांगरलं तरी मन गढूळलं होतं ते काही शांत होत नव्हतं. वावरामागून वावर पार करत कधी घरी पोहोचलो ते कळलेच नाही. बैलांना दावणीला बांधून ओसरीवर हातपाय धुतले आणि तशी तुळशीला दिवा करायला म्हणून आमची आजी बाहेर आली. नव्वदी पार केली पण म्हातारी खमकी आहे. काठी टेकत टेकत का होई न तुळशीची पूजा करायचं व्रत काही सुटत नाही पाठीचा पार काटकोन झालाय बघा. मी दारात दिसताच आपलं बोळकं पसरत तोंडभर हसली तसं तीन्हीसांजेचा तिच्या पाया पडलो. मायेचा हात अंगाखांद्यावरून फिरला तरी मन काही शांत होत नव्हतं.

घरात गेलो तर आईदेखील गंभीरच होती. चुली जवळ रात्रीच्या जेवायचं रांधत बसलेली चिमणीच्या उजेडात. मला आलेला बघताच सचिंत नजर माझ्याकडे टाकून पुन्हा चुलीत तोंध घालून फुंकू लागली. बशी खाली झाकलेला चहा चुलीशेजारी होता म्हणून कोंबट राहिला होता. रोज उशीर झालं तर आई गरम करून देत

असे पण आज माझीही मागायची इच्छा नव्हती. तसाच कोंबट चहा घशाखाली उतरवून निमूटपणे तिथून उठलो आणि ओसरीत येऊन बसलो. दूर कोणाच्यातरी घरून रेडीओ वरच्या कामगारसभेतली गाणी ऐकू येत होती. सहज नजर वर केली तेव्हा शेवंता गोठ्यातून बाहेर येत होती. रोज मी आल्या आल्या हसत खिदळत येऊन कमरेला मिठी मारणारी शेवंता शांतपणे येऊन शेजारी बसली. खांद्यावर डोकं ठेऊन हळूच म्हणाली “दादा चंपा बरी होईल न रे?”

नांगरणी टाकून येणं शक्य नव्हतं म्हणून मन नसताना बैलांना दामटवत होतो पण मन मात्र घरी गोठ्यात अडकलं होतं. चंपा गाभण होती. इतके दिवस तब्येत अगदी उत्तम होती पण कालपासून गवताला तोंड लावले नाही पाणी प्यायली नाही. सकाळी उठलो तसं पहिला रामण्णाला गाठला. सुदैवानी अजून तालुक्याला गेला नव्हता. गावचाच असला तरी तालुक्याच्या दवाखान्यात गुरांचा डॉक्टर म्हणून काम करत होता. त्यानीही लगोलग येऊन चंपाला तपासलं. रामण्णा बोलला ते त्याचे कर्तव्य म्हणून. पण मनात चर्र झालं. चंपा अडली होती.

याच चिंतेत रात्रभर तळमळत पडलो होतो. घरात कोणालाच झोप लागली नव्हती पण कोणीच काही बोलत नव्हतं. सगळीकडेच एक निःशब्द चिंता होती. काळात नव्हतं काय होणारे. प्रत्येकाच्याच मनात ती अशुभ कल्पना एकदा का होईना डोकावली असणारच. फक्त कोणी बोललं नव्हतं. रामण्णानी दिलेली औषध कशी बशी चंपाला खाऊ घातली. उद्या सकाळीसच येतो म्हणून रामण्णा आज तालुक्याला गेला होता.

अखंड रात्र साऱ्या घरानीच तळमळत काढली. पहाटेच्या सुमारास नुकत कुठे डोळा लागत होता तोच कोंबडं आरवलं तशी खडबडून गोठ्याकडे धाव घेतली. निपचित पडून असलेली चंपा कष्टी होती. डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. अजूनही समोर टाकलेली गवताची पेंडी तशीच होती. पाणी मात्र तेवढं प्याली. पाठीवर हात फिरवून तसाच बाहेर आलो अन् ओसरीत बसून होतो. तास दोन तासात रामण्णा आला. चंपाला तपासली पण काहीच बोललं नाही. दोन मीन गप उभा होता. त्याला तसा उभा पाहून आईला तर रडूच फुटलं अन् शेवंता मला बिलगली. शेवटी रामण्णा म्हणालाच, भाऊ चमत्कार झालं तरच चंपा सुटल बघ, माझ्याच्यान झालं तेवढ केलं. थोडी औषध देऊन रामण्णा निघून गेला.

जसा रामण्णा बाहेर पडला तशी आई देवाशी बसली. बाळकृष्णाला पाण्यात घातला न डोळे मिटून बसली. मो ओसरीवरच भिंतीला टेकून बसून होतो शेजारी शेवंता मांडीवर निपचित पडली होती. कोणीच काही बोलायला तयार नव्हतं. तेवढ्यात शेजारली बालान्त्पानाला आलेली चान्द्रक्का धावत आली. चाम्पाचा लळा चंद्राक्कालाही लहानपणापासूनच होता. आमच्याबरोबरच वाढलेली अक्का, छातीशी पोर धरून आली. तशी तिच्या मागोमाग थांब थांब करत शकू मावशी पण पोचलीच. शकू मावशी अन् माझी माय, जणू बहिणीच.

चंपा अडलेली ऐकून एककाचा जीव राहिला नाही. काळ कसाबसा तिनी दम धरला पण आजची वार्ता ऐकून तिला राहवलं नाही. अंगणातून आत आली तशी माझ्याकडे बघितलं, तिच्या डोळ्यात मला सारी काळजी दिसत होती, एकच भीती होती, काही बरं – वाईट तर नाही नं झालं? माझी नकारार्थी हललेली मान पाहून तशीच अक्का गोठ्यात गेली. चंपा अजून धपापत होती. तिला पाहताच अक्का दारात थबकली. इतक्या लगबगीत अक्काचं तान्हुलं उठला न त्यांनी ट्या सूर लावला.

अक्काला कळेना काय करावे बाला कडे बघावे की चंपाकडे. पण तो रडण्याचा सूर ऐकून जणू जादू झाली चंपा आंगच सारं बाळ एकवटून हालली आणि जोरात हंबरडा फोडला. चंपाचा आवाज ऐकताच आई गोठ्यात धावली. आई पाणी गरम करे करे पर्यंत चंपानी शुभ्र पांढऱ्या वासराला जन्म दिला होता. अक्का अजूनही दाराशीच थक्क होऊन उभी होती, तान्हुलं शांत झालं होता आणि हो; चंपा मोकळी झाली.

Leave a Reply

%d bloggers like this: