Category: Marathi

  • शुभ्र भीती

    शुभ्र भीती

    शुभ्र भीती
    ~~~
    मला ना, पांढऱ्या शुभ्र कागदाची फार भीती वाटते.
    भीती वाटते त्यावर पेन टेकवून पहिला काळा ठिपका उमटवायची.
    अनंत शक्यता उराशी घेऊन असते त्याची ती शुभ्रता, आणि त्यातल्या किती तरी शक्यतांचा एका अर्थाने मी खूनच करतो ज्या क्षणी त्यावर मी माझा पेन टेकवतो.
    मनातून कविता पाझरत असते अगदी अवखळपणे, शब्दामागुन शब्द, ओळींमागुन ओळी.
    पण मन मात्र धजत नाही त्या कागदावर उतरवून ठेवायला.
    चुकून हातावर शाई आलीच लिहितांना, तर उगाच वाटत राहतं की माझा हात जणू त्या कागदाच्या रक्ताने माखलाय, कारण…
    कारण, मी खून केलाय त्या अनंत शक्यतांचा माझ्या पेनाच्या एका ठीपक्यानी.
    म्हणूनच मला पांढऱ्याशुभ्र कागदाची फार फार भीती वाटते.
    ~~~
    आदित्य साठे

  • प्रवास – A Journey

    प्रवास – A Journey

    अखंड चालणारा प्रवास हे आयुष्याचे एकप्रकारे स्थायी सत्य आहे. आलेला प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यात बदल घडवून जातो. मग तो बदल ढोबळ नजरेला दिसणारा असो अगर सूक्ष्म. जन्माला आल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत चाललेला हा प्रवास, मृत्यूच्या भीतीने खंगत करण्यापेक्षा आहे तो क्षण पुरेपूर जगवा हा विचार आणि मी माझ्या या कवितेतून मांडायचा प्रयत्न केला आहे.

    Non-stop journey is the only permanent truth about our life. Every passing moment changes our life. That change may be insignificant and minute which goes unregistered or it is massive which shifts our entire perspective. Journey started from the time of birth continues till the last breath. It’s wise to live every moment fully without getting bogged down under the fear of death. This thought gave birth to this poem.

  • गजांची खिडकी

    गजांची खिडकी

    PicsArt_05-13-11.33.48.jpg
    Painting by Snehal Ekbote

    या बंद कोठडीला आहे एकच खिडकी,
    वर उंच, आणि गजांनी बंद असलेली.
    दिसत नाही काहीच मला त्यातून, पण…
    ऐकू येतात मला आवाज अनेक.
    दिवस सुरू होता होता कोठडीतील अंधार पालटायच्या आधी
    मला जाग येते ती किलबिलाटानी,
    बहुदा कोपऱ्यावर एक डेरेदार वृक्ष असावा
    ज्यावर असावीत बांधली घरटी असंख्य पक्षांनी.
    थोड्याच वेळात किलबिलाटाची जागा घेतात ते मोटारींचे आणि दुचक्यांचे आवाज नि कर्कश भोंगे.
    मग इथलाही दिवस सुरू होतो आणि
    जणू आकाशवाणीचे सभा संपावी तशी या रेडिओ पासून आमची ताटातूट होते, ती पुन्हा संध्याकाळच्या सभेत भेट होण्यासाठी.
    वाहनांचे आवाज कमी कमी होत जातात आमची जेवणं उरकून दिवे मालवले जाई पर्यंत.
    आणि उरतात माझ्या सोबतीला रातकिड्यांचे, दूर भुंकणाऱ्या कुत्र्याचे आणि वटवाघळांच्या फडफडण्याचे आवाज.
    आणि आलीच तर चंद्रप्रकाशाची एखादी तिरीप.
    कारण, माझ्या बंद कोठडीला आहे एकच खिडकी,
    वर उंच, आणि गजांनी बंद असलेली.
    ज्यातून दिसत काहीच नाही, पण ऐकू येतं, बाहेरचं सारं जग…
    ~~~
    आदित्य साठे
    १३-०५-२०२०


    गजांची खिडकी, Adi’s Journal च्या YouTube Channel वर

     

     


    ही कविता मला सुचली ती स्स्नेनेहल एकबोटे या माझ्या चित्रकार मैत्रिणीच्या या चित्रावरून. स्नेहल एक उत्तम छायाचित्रकार देखील आहे. तिची चित्रे व छायाचित्रे तुम्ही तिच्या instagram handle वर जाऊन बघू शकता…

  • ठरलेच होते…

    ठरलेच होते…

    PicsArt_03-27-12.05.27.jpg

    वेगळे हे चालणे ठरलेच होते
    आपले हे वागणे ठरलेच होते

    केवढी ही शांतता दोघांमध्ये या
    अंतराचे वाढणे ठरलेच होते

    जाहली लाही किती ही अंग अंगी
    रात सारी जागणे ठरलेच होते

    काय सांगू मी कहाणी आज माझी
    शेवटी मी हारणे ठरलेच होते

    चालली होती विजांची तानबाजी
    ती समेवर थांबणे ठरलेच होते

    ठेवला विश्वास मी बोलांवरी त्या
    तो मला मग टाळणे ठरलेच होते

  • Undelivered letters – पुस्तक परिचय

    Undelivered letters – पुस्तक परिचय

    “साठेsss….” अशी लांबलचक आरोळी देऊन दारावरल्या टपालपेटीत पत्र टाकणारा पोस्टमन मला आजही आठवतो. पण वीस वर्षांपूर्वी पोचवायला हवी असलेली पत्र जेव्हा एखाद्या पोस्टमनला अचानक अनपेक्षितपणे सापडत असतील तेव्हा काय होत असेल? दोन दशकांच्या काळात पत्र ज्यांच्यापर्यंत पोहोचायला हवी होती त्यांचं पुढे काय झालं असेल? आणि आत्ता त्यांना ही पत्र पोहोचवली तर त्यांना काय वाटेल? हे सारे प्रश्न तुम्हाला पडलेत ना?

    PicsArt_08-12-10.51.59मग जे. आल्कम ( J. Alchem) यांनी लिहिलेलं Undelivered letters हे छोटसं पुस्तक तुम्हाला नक्की खिळवून ठेवेल. पोस्टमन अरॉन आणि त्याची पत्नी सारा यांना अचानक ही न पोहीचवलेली पत्रे सापडतात आणि सुरू होतो एक नवं द्वंद्व समोर उभं ठाकतं. पत्र पोहोचवावी की न पोहोचवावी. ज्यांच्या नावांनी ही पत्र आहेत ते काय म्हणतील? त्यांना काय वाटेल? आपल्या हलगर्जीपणाने झालेल्या या दोन दशकांच्या उशिरामुळे काही भयंकर तर नसेल घडले? या साऱ्या प्रश्नांच्या गदारोळात अडकलेल्या अरॉनची ही गोष्ट आहे छोटीशीच पण थेट मनाला जाऊन भिडते.

    दोन दशकांच्या वेगवेगळ्या काळपट्टयावर चालणारी ह्या पत्रांची गोष्ट आपल्याला ज्यांची ही पत्रे असतात त्या वेगवेगळ्या पात्रांनाही भेटवते. एक वेगळ्याच पद्धतीने गुंफलेल्या या वेगवेगळ्या पात्रकथा, ‘न पोहोचवलेल्या’ पत्रांच्या धाग्याने छान घट्ट विणलेली आहे. एखाद्या निवांत सुट्टीच्या दिवशी हे पुस्तक हाती घेतलं तर एक बैठकीतच तुम्ही संपवूनच खाली ठेवाल. अगदी छोटेखानी असलेलं पुस्तक आपल्या अगदी साध्या मुखपृष्ठानी तुम्हाला नक्की खुणावून घेईल यात शंका नाही.

    पु ल देशपांडे म्हटले होते की “पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली तुमची मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल”. जणू हीच भावना मनात ठेवून जे आल्कमनी प्रत्येक व्यक्तिरेखेला कोणती न कोणती कला दिली आहे. चित्रकला, लेखन, संगीत अशा अनेक कला आणि त्या जोपासणारे कलाकार निरनिराळ्या व्यक्तिरेखांच्या रुपात आल्कमनि अप्रतिम गुंफल्या आहेत. आल्कमची साधी सोपी भाषा दोन वेगवेगळ्या काळपट्ट्यांची गुंफण या पुस्तकाला एक वेगळाच रंग देतं.

    अरॉन त्याला सापडलेली पत्र पोहोचवतो का? पत्र मिळाल्यावर लोकांची काय प्रतिक्रिया असते? सारा ज्या पत्राची वाट आतुरतेने कित्येक वर्ष पाहत असते ते तिला मिळते का? या साऱ्याची उत्तरं या पुस्तकात दडली आहेत. तेव्हा नक्कीच तुम्ही हे पुस्तक मिळवा आणि जरूर वाचा.

    My rating: 4/5

    Kindle version
    Publisher: Westland Publications Ltd.
    Language: English

  • सुषमा स्वराज: एक मायाळू करारी दीपस्तंभ

    सुषमा स्वराज: एक मायाळू करारी दीपस्तंभ

    देशाच्या संसदेत ऐतिहासिक निर्णय घेतले जात असतांना देशाच्या असामान्य भूतपूर्व परराष्ट्रमंत्री अचानक अशी exit घेतील याची पुसटशी शंकादेखील कधी मनात आली नसती. ६ ऑगस्ट च्या संध्याकाळी “आयुष्यात याच दिवसाची वाट पाहत होते” असे उद्गार काढणाऱ्या सुषमा स्वराजजींना अखेरची चाहूल लागली होती का काय अशीही शंका मनात येते.

    आज ज्या भावना या बातमीनंतर मनात दाटून येत आहेत त्या भावना आजच्या जगात कोणत्या राजकीय नेत्यासाठी येतील असे मला व्यक्तीशः वाटत नाही. सुष्मजींची राजकीय कारकीर्द जवळून पहिली म्हणणेच काय पण गेल्या सरकारच्या काळात त्यांच्या परराष्ट्र मंत्रीपदाची कारकिर्दही खूप अभ्यासली असेही मी म्हणणे धडधडीत खोटे ठरेल . पण ज्या काही थोड्याफार वेळेला या महान स्त्रीच्या ओघवत्या वाणीचा आस्वाद घेतला त्यावेळी मन भरून आलं यात शंका नाही मग ती भाषा कोणतीही असो. हिंदी, इंग्रजी इतकेच काय, मध्यंतरी युट्युबवर त्यांचे एक संस्कृत बद्दलचे भाषणही ऐकले होते तेही तितकेच ओजस्वी होते. त्यांचे लोकसभेतील वाक्पटूत्व पाहतांना जाणवणारी मुद्देसूदता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा संयुक्त राष्ट्र संघात बोलतांना दिसून येणारी मुरब्बी मुत्सद्देगिरी खूप प्रेरक आणि आकर्षक होती. स्वच्छ पोशाख, कायम प्रसन्न हास्य असलेला चेहरा, यासह सुषमाजींचे दर्शन झाले की त्यांच्याभोवती कायम एक वलय असल्यासारखे वाटायचे. आजही त्यांच्या फोटोकडे पाहिलं की एक ममत्व जाणवत, वाटतं कधीही एक आश्वासक हात पुढे येईल. पण ते आश्वासक हास्य आता भारतीयांपासून दूर गेलं.

    आजवर इतक्या उशिरा रात्री मी कोणतीही पोस्ट कोणत्याही सोशल मीडियावर केलेली नाही पण आजच्या भावनांना वाट मोकळी करून देण्याशिवाय झोप लागणार नाही याची मला खात्री आहे. या दीपस्तंभाला दिशादर्शक म्हणून ठेवून ध्येयाकडे मार्गक्रमण करणे हीच त्यांना योग्य आदरांजली ठरेल….