बरंय भक्त मंडळींनो, दहा दिवस कसे गेले कळलंच नाही न? हे दहा दिवस मी तुमच्याबरोबर खूप मजेत घालवतो दर वर्षी. नेहमी वाटत; तुम्हाला सोडून जाऊ नये. पण काय करणार? येतानाच नवा मोबाईल घेतलाय नं. मिस कॉल्सचा पाऊस पडेल हो लगेच त्यावर. इथे काय किंवा स्वर्गात काय, घरची मंडळी सगळी सारखीच!!!
तुम्हा अबालवृद्धांचा उत्साह पहिला की खूप बरं वाटत. जाणवतं, आहे; या भौतिक जगात अजून थोडी अध्यात्मिकता आहे. या दहा दिवसांत काय काय मजा करता ते तुम्ही, आणि मी मात्र आपला एका जागी बासून असतो. कधी कधी पार कंटाळून जातो, पण काय करणार? “आलीय भोगासी असावे सादर….” इथे बसल्या बसल्याच एन्जोय करतो आपला. एकटाच…..
मी असं ऐकलय की तुम्ही महिनाभर आधीपासून कामाला लागता? ते पण दिवसरात्र एक करून आणि स्वतःचे नोकरी-धंदे सांभाळून. दमत नाही का तुम्ही लोकं? कधी कधी थोडे दिवस आधीच यावंसं वाटतं; तुमच्या बरोबर कामं करायला. पण काय करू? हाय कमांड सुट्ट्याच देत नाही नं, रेशनिंग आहे सुट्ट्यांच!!!! सुट्टी मोजून दहा दिवस. असो… हे दहा दिवस तरी मिळतात यातच समाधान..
सध्याच्या दिवसात तुम्ही माझ्या निमित्तानी का होईना, चार चांगली कामं करता ते बघून फार बरं वाटत. कुणी अनाथांना, अंध-अपंगांना मदत करतं, तर कुणी निसर्गानी झोडपलेल्यांना. खरंच लोकमान्न्यांना धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत. काही नाठाळ मंडळी असतातच, गर्दीचा फायदा घेणारी, लोकांना लुबाडणारी. फार राग येतो तेव्हा, पण शिक्षा करता येत नाही नं. शस्त्र सगळी घरीच असतात. आपल्या माणसांत हवीत कशाला शस्त्र? म्हणून घरीच ठेवतो. हातावर हात ठेवून बघत बसावं लागतं. मग आम्हीपण आमच्या ऑर्गनाईझर मध्ये नोंदून ठेवतो शिक्षांची यादी, घरी गेल्यावर उरकायची कामे म्हणून.
काही गोष्टी मात्र नाही आवडत हं तुमच्या आजीबात मला. केवढा थर्माकोल अन प्लास्टिक वापरता तुम्ही लोकं आरास करायला! अहो तुम्हालाच त्रास होणारे त्याचा. अहो तो थर्माकोल तयार करताना तुमचा ओझोन खराब होतो नं. भोकं पडतात त्याला. आणि काय तो टेप अन चा आवाज, बापरे; अजून काही दिवस राहिलो तर नक्कीच ठार बहिरा होईन. तुम्हाला नाहीका त्रास होत? अहो आणि तुमच्या आजूबाजूला सगळेच ठणठणीत नसतात. आजारी लोकांना त्रास होतो इतक्या मोठ्या आवाजाचा. जरा काळजी घ्या त्यांची सुद्धा. तेवा या गोष्टींवरचा खर्च कमी करून आसपासच्या लोकांसाठी काही स्पर्धा ठेवा. स्थानिक कलाकारांना वाव द्या. त्यासाठी मी कमी प्रकाशात राहीन. कमी गाणी ऐकीन, मला चालेल. चालेल कसलं पळेल. मलाही त्रास होतोच की आवाजाचा. आणि असेही तुम्ही लावता ती गाणी मला आजीबात आवडत नाहीत… अरे काही अर्थातरी असतो का त्यांना?
यावर लेक्चर देत बसलो तर उशीर होईल. निघायला हवे आता. परत एक मिस कॉल आला बघा घरून. फक्त शेवटी सांगितलं ते लक्ष ठेवा हं. मग काय भेटूच पुढच्या वर्षित. पुन्हा तीच धमाल, तीच मजा. तोपर्यंत..
राम राम…..