Category: कविता

  • “राजकारण”? नव्हे हे तर राज का रण….

    • राजकारणात सगळेच भ्रष्ट म्हणत म्हणत,

    त्यांना सतत शिव्या घालतो,

    सिग्नल तोडून पळताना पकडल्यावर,

    हळूच एक नोट सरकवतो….

    • सगळे हिशोब चालतात इथे

    कोणाचा किती टक्का यावर,

    सत्यमूर्ती गांधीजी आपले,

    निमूट हसतात नोटेवर…

    • आघाडीबरोबर पळता पळता,

    कधी राज, कधी रण,

    सामान्य मात्र भोगतोय,

    आश्वासनांच “राजकारण”

    • एकाच जागी बसून जरा

    आला बघा कंटाळा,

    राग पक्षांतर गाऊन जरा

    आजमावावा म्हणतो गळा…..

  • उसने क्षण..

    भोवताली घोंगावतो सारा उदास एकांत,
     
    तुझ्या गावाच्या दिशेने माझी नजर अखंड,
     
    तुझ्याविना कोरडा सारा श्रावण महिना,
     
    दोन क्षण उसने दे तुझ्या कुशीत साजणा….
  • हाक…

    कधीतरी पसारा आवरताना लागते हाती एक गाडी,
    तुझा हट्ट पुरवताना मी मात्र झाले होती वेडी.
    तुझं वाढतं वय घेऊन गेलं तुझा हट्ट,
    अजूनपण वाटतं येऊन तुला मिठीत घ्यावं घट्ट.

    नोकरी संसारात गुरफटून गेलायस खूप लांब,
    कधीतरी परत येऊन मला तुझ्या गमती सांग.
    पळत दारात येऊन “आई भूक….” म्हण.
    बघ तुझ्या आठवांच्या झोपाळ्यावर झोके घेतं वेडं मन.

  • एक गोंधळ…….

    माणसाला आयुष्यात हवा असतो एक गोंधळ,
    कायम आपल्याभोवतीच घातला जाणारा..
    अगदी जन्माला आल्यापासूनच हट्ट असतो,
    सतत गोंधळ मागण्याचा.
    अगदी लहान असतो नं तेव्हाच या गोंधळाची होते सुरुवात,
    सुरवातीलाच मंजुळ आवाजाचा मजा देणारा एक गोंधळ घेऊन खेळणी येतात.
    या खेळण्यांचा तो गोड गोंधळ हळूच मागे सोडतो,
    आणि आपण आपसूक बागीचातल्या गोंधळात रमतो.
    मागोमाग येतोच शाळेचा धमाल मस्तीचा गोंधळ,
    बागेतल्याला सोबत नको का कुणाची?
    शाळेतला धिंगाणा आठवणीत ठेवून मग येतो एका मोठ्ठ्या गलक्यात,
    महाविद्यालयाच्या हो..
    तिथेच भेट होते ती एका नाजूक जिव्हाळ्याच्या
    अगदी हवाश्या गोंधळाची जो थेट आपल्या मनाचाच ताबा घेतो.
    पुढे हा चोरून लपून दोघांनी घातलेला गोंधळ घरचा होतो,
    अगदी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने.
    एका आवडीच्या गलक्याला सुरवात होते.
    जोडीनी चालवायच्या गाडीचा आनंदासकट,
    एक कुटुंब समाधानानी गप्पाष्टकांचा गोंधळ मांडत.
    हळूच एक बारीक नवजात आवाज येतो,
    आणि सगळा गोंधळ स्वतःभोवतीच जमा करतो.
    या सगळ्या गोंधळ गालाक्याची मजा घेत जगत असतो आपण,
    हळूच कधीतरी येते त्या शांततेची चाहूल.
    मन सुन्न करणारी ती शांतता, कधीही नं अनुभवलेली,
    कधीच नको असलेली…..
    ती शांतता मागे टाकून जोर एकवटून आपण झेप घेतो,
    झेलायला तो असतोच हजर, हो तोच तो… लाडका गोंधळ…
    आपल्या साऱ्या सख्या सोबत्यांबरोबर.
    मग की खूप जास्त गोंधळ, गडबड, धिंगाणा,
    मजा आणि असतो आपल्या आवडीचा गलकादेखील.
    सगळी मजा करताना अगदीच अचानकपणे;
    आपण निघून जातो….
    खूप खूप दूर कायमचे,
    एका अखंड शांततेच्या प्रवासाला.
    काही आठवणींचा आवाज कुणाच्या तरी ओंजळीत टाकून,
    त्याचा कधी तरी प्रचंड गोंधळ होईल या वेड्या आशेवर…….

  • मातृवंदना…..

    आज फेसबुक वर भटकत असताना एक कविता वाचनात आली.

    वाचून मन पार हेलावून गेलं. आजपर्यंत मला मानवी मनाचं एक कोडं काही उलगडलेलं नाही. मी की बोलतोय ते तुम्हाला हि कविता वाचूनच समजेल. कल्पि जोशींची क्षमा मागून त्यांची कविता मी इथे पुन्हा प्रकाशित करतोय त्यांच्या नावासकट.
    नशिबाचा दोष नाही
    जानकीला सोस नाही.
    स्त्री जन्माचे नाव आहे
    जीवन आभास नाही.
    ज्या कळा तू भोगिल्या
    अजून संपल्याच नाही.
    बेगडी नजरा प्रजेच्या
    आजही श्रमल्याच नाही.
    असो द्रौपदी वा जानकी
    नशिबी वनवास आहे.
    जन्म झाले लाख तुझे
    गळ्यात का फास आहे
    तू आता तुझीच नाही
    तुला कुठे ग मन आहे.
    जीवनात आजही तुझ्या
    अग्निदिव्याचे क्षण आहे.
    कल्पि जोशी.
    ११/०४/२०११
    आता आपल्याला कळलाच असेल मी मनाच्या कोणत्या कोड्याबद्दल बोलतोय ते. या मनाला नं एक विचित्र सवय असते. सतत दुःख उगाळत बसण्याची. कितीही चांगली घटना घडली तरी हे लेकाचे रडत राहणार. अरे आपल्याला यातून हे मिळालाच नाही, हे तर आपला राहूनच गेलं. जे मिळालं त्याचा आनंद व्यक्त करणं याला कधी येतंच नाही. या कवितेत देखील जे या स्त्रियांनी भोगलं त्याची आठवण काढून स्वतःलाच कमी लेखत एका कोशात घेऊन जातंय हे मन आपल्याला. त्यांनी जे भोगलं ते निश्चितच असमर्थनीय आहे. हे कोणाही स्त्रीच्या वाट्याला येऊ नये हीच प्रार्थना आहे. पण स्त्री म्हटलं की का आठवत देवी दुर्गा, जिच्या केवळ नामोच्चारानी अधर्मी राक्षसांना मरणाचे भय वाटे? आठवत नाहीत आपल्यला गार्गी मैत्रेयी सारख्या सुक्तद्रष्ट्या विदुषी, का नाही आठवत आपल्याला राजमाता जिजाऊ साहेब ज्यांनी ३०० वर्ष गुलामीत खितपत पडलेल्या जनतेला स्वराज्याचा सोनेरी किरण दिला. का नाही आठवत आपल्याला अहिल्याबाई होळकर, ज्यांनी समाजाला वळण लावले. का नाही आठवत इंग्रजांवर तडफेने समशेर चालवणारी राणी लक्ष्मी. का नाही आठवत आपल्याला क्रांतिवीर प्रीतीलता वड्डेदार, कल्पना दत्ता, ज्यांनी चितगाव शस्त्रागारावर हल्ला केला. का आठवत नाहीत मादाम कामा ज्यांनी स्वतंत्र हिंदुस्तानचा पहिला ध्वज आंतरराष्ट्रीय परिषदेत जगासमोर मांडला. कधीच आठवत नाही आपल्याला आनंदी गोपाल ज्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. आठवत नाहीत किरण बेदी, मीरा बोरवणकर, स्वाती साठे. आठवत नाही कल्पना चावला. आज असे एकही क्षेत्र उरले नाही जे महिलांनी गाजवला नाही. याची आठवण आपल्याला फक्त आणि फक्त महिला दिनाच्या दिवशीच यावी? इतर वेळी का येत नाही. येते ती फक्त सीतेच्या अग्निदिव्याची, द्रौपदीच्या खेचल्या गेलेल्या वस्त्राची. का?? अरे वंदनीय पुजनिय ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाट चालावी अशा कितीतरी स्त्रिया आपल्याकडे आहेत. आदर्श आहेत. मग का सदैव आपण असे निराश हताश बोलतो?
    अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या स्त्रीला उच्च स्थानी नेतात. त्या गोष्टींबद्दलचा अभिमान जगवा. या सर्व उत्तुंग शिखरे घाठ्लेल्या देवींचे आदर्श मनावर कोरून घ्या. त्यांच्यासारखे थोडे जरी वागलो तरी आयुष्य धन्य होईल. वर उल्लेखित आणि माझ्या अज्ञानापायी अनुल्लेखीत राहिलेल्या सर्व वंदनीय देवींना, त्यांच्यातील स्त्री तत्वाला, माझे वंदन.
    स्त्री तू माता दुर्गा, तू जगाची गं जननी,
    प्रणाम सादर  तुला, हे मस्तक नमवूनी

    ती विद्वान गार्गी तू, द्रष्टी त्या सुक्तांची.
    राणी झाशी वाली तू , राणी तू मुक्तांची.

    ती जिजाऊ आई तू, शिल्पकार राजाची.
    ती अहिल्या भोपाळीची, मूर्ती सुधारणांची.

    माते तुजविण होतच नाही, कल्पनाही विश्वाची.
    तू तर देवी आधाराची, मुळे या जगताची.

    आदित्य साठे
    १२-०४-२०११

  • गाणे जीवनाचे………

    जीवनाचे या एकच गाणे,
    न थांबता सदा चालत राहणे.

    सोबत कधी असेल कोणी,
    तेवढीच वाट वाटेल जुनी.

    एकट्याचाच असतो कधी प्रवास,
    खडतर वाटेचाच होतो आभास.

    कधी तरी सोबत करतो वारा,
    आकाशाचाच काय तो निवारा.

    उन पावसाची धावती सोबत,
    घसरून पडल्यास बघ्यांना गम्मत.

    लांबलचक ही एकच वाट,
    सरली म्हणता सरत नाही.

    जीवनाचे हे एकच गाणे,
    गाणं काही थांबत नाही.