Your cart is currently empty!
सोबत
“सोबतीने चाललेला प्रवास अशा एका वळणावर येतो की वाटा वेगळ्या होतात. क्षणात सोबत सुटते, अंतर झपाट्याने वाढायला लागते. प्रत्येक क्षण एक हुरहुर लावतो. त्याचबरोबर ओढ वाटु लागते ती पुढच्या संकेताची. जाणारा प्रत्येक क्षण आपलं अस्तित्व जाणवून देतो. आणि मी वाट बघत बसतो पुढील भेटीच्या क्षणाची, तू सोबत असण्याची…” शमिकाला भेटून परतीच्या वाटेला लागलेल्या अमरनी झटकन मनातले विचार निसटू नये म्हणून मोबाईल मध्ये लिहून ठेवले. वास्तविक ही त्यांची पहिलीच भेट होती.
फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वरच्या गप्पा आणि प्रत्यक्ष भेट यातला फरक अमरला आज पहिल्यांदाच इतक्या प्रकर्षानी जाणवला होता. तासंतास मोबाईलच्या स्क्रीनवर बोटं आपटत दिवस रात्र चाललेल्या गप्पा त्याला या दोन तीन तासांच्या भेटीत फारच कमी वाटू लागल्या. शमिकाला तिच्या घराजवळ सोडून निघाल्यापासून अमर सारखा मोबाईलकडे बघत होता. पण तिला मेसेज पोचल्यापासून पुढे सरकणारा प्रत्येक क्षण अमरला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. जे विचार त्यानी घाईनी मोबाईल मध्ये टिपून ठेवले होते तेच त्यानी शमिकाला पाठवले होते आणि त्यावर ती काय उत्तर देते याकडे तो आतूरतेने डोळे लाऊन बसला होता.
अचानक हातातला मोबाईल थरथरला आणि हवाहवासा मेसेज एकदाचा आला. तितक्याच त्वरेने स्क्रीनवर बोटं फिरली आणि समोर फक्त 🙂 🙂 इतकाच उत्तर बघून अमर बिचारा गोंधळून गेला. पण लगेचच पुढचा मेसेज आला, ‘घरी पोचलास की निवांत बोलू. संध्याकाळ खूप मस्त गेली. :)’. घरी पोहोचेस्तोवर अमर मनाशी द्वंद्व करतच होता.
काहीसा अस्वस्थ असतानाच अमर घरी पोचला. कसेबसे आईच्या प्रश्नांना जुजबी उत्तर देत एकदाचे चार घास त्यानी पोटात ढकलले आणि चक्क टीव्ही कडे न वळता थेट आपल्या खोलीत गेला. डोक्याशी असलेल्या चाजर्र ला मोबाईल टोचला आणि पहिला मेसेज शमिकला पाठवला. दुसऱ्या क्षणाला तिचा मेसेज ‘कुठे होतास इतका वेळ?’ मेसेज वाचल्या क्षणी अमर ला लक्षात आले की आईच्या प्रश्नांना उत्तर देण्यात हिला पोचल्याचा मेसेज करायचाच राहिला. किमान आजच्या दिवशी तरी त्याला ही चूक व्हायला नको होती. कसेबसे शमिकाला समजावले पण ती अजूनही अमरनी संध्याकाळी पाठवालेल्या मेसेजचे हवे ते उत्तर देतच नव्हती. इकडे हा बिचारा अस्वस्थ. शेवटी न राहून त्यानी विचारलेच, ‘शमिका, एक सांगू?’
‘हेच सांगणारेस न, की तुला मी आवडले?’ आलेले हे उत्तर वाचून दोन मिनिट अमरला विश्वासच बसत नव्हता. पुनःपुन्हा वाचून पण त्याला अजूनही हे स्वप्नवत वाटत होते. ‘अरे बोल की, का नुसता फोनकडे बघत बसणार आहेस?’ शमिकाच्या पुढच्या मेसेजनी अमर भानावर आला. ‘अरे तुझ्या सांध्यकाळच्या मेसेजनीच सारं काही सांगितले अगदी स्पष्टपणे, पण मीच म्हटले देउयात की थोडासा त्रास, म्हणून इतका वेळ याबद्दल बोललेच नाही. ;)’ ‘पण का न असा त्रास द्यावा. किती अस्वस्थ होतो मी. अजुन पण बघ उत्तर दिलच नाहिएस प्रश्न माहिती असून पण’ अमरनी गाऱ्हाणं मांडल. ‘:p’ शमिकाच उत्तर. ही नक्कीच आपली फिरकी घेतेय, तिच्या मनातले उत्तर नक्की हो असणार, असा विचार येतो न येतो तोच थोडासा नकारात्मक विचार पण अमरच्या मनात येऊ पहात होता पण त्याने प्रयत्नपूर्वक त्याला बाजूला सारले.
‘शमिका सांग न उत्तर….’ अमरनी आर्जवी मेसेज पाठवून दिला. हातात आलेली नामी संधि सोडल ती शमिका कसली. मेसेज मागून मेसेज पाठवूनही ती अमरला दाद देत नव्हती आणि इकडे हा बिचरा अधिकच अस्वस्थ होत होता. ‘उद्या संध्याकाळी आजच्याच कॉफिशॉप मधे भेट’ शमिकाचा शेवटचा मेसेज हा आला तेव्हा कुठे अमर थोडासा सुखवला. पण त्याच्या मनाला उत्तर अजूनही स्पष्ट होत नव्हतं. सारे संकेत तर होकाराकडे होते पण जोवर तो कानांनी ऐकत नाही तोवर त्याचा विश्वास बसणे जरा अवघडच होते.
दुसऱ्या दिवशी दिवसभर अमरचे चित्त काही थाऱ्यावर नव्हते. असेल तरी कसे? कॉलेजमध्ये मित्रांना तो फक्त दिसत होता पण मनानी तो आत्ताच कॉफीडेटवर पोचला सुद्धा होता. आपल्यातच हरवलेल्या अमरला आज रमणला चिडवणे सुचत नव्हते न अनिताच्या खोड्या काढायची इच्छा होती. त्याला असा हरवलेला पाहून गँगनी भरपूर चिडवले, पण विचारात पार गुरफटून गेलेल्या अमरला जणू ते चिडवणं कानावर पडत होतं पण ऐकू येत नव्हतं. रोज कॉलेजची वेळ उलटून २ तास झाले तरी न येणारा अमर आज इतक्या लवकर घरी आलेला बघून आईला तसा धक्काच बसला पण ती काही बोलली नाही. चहा करू का या प्रश्नाला खोलीत जाताजाताच ‘नको’ इतकच उत्तर देऊन अमर आत गुडूप झाला.
त्याच्या या वागण्याचं कोडं ज्या वेळी तो झकासपैकी तयार होऊन खोलीतून बाहेर पडला तेव्हा आईला उलघडलं. आईला टाळून बाहेर सटकायच्या बेतात असलेल्या अमरला आईनी स्वयंपाकघरातून एक चिमटा काढलाच, “काय रे, शमिका का?” आईच्या या सिक्स्थ सेन्सच काय करावं? फक्त हम्म इतकच उत्तर आत्तापुरते देऊन अमर तिथून सटकला. बाईकवर टांग टाकून निघाला तोच मुळात हवेतून चालवतोय असा. नशीब इतकच की कोणाला ठोकलं नाही. घाई घाईत गाडी पार्किंग मध्ये लाऊन तो आत पळाला. कोणत्याही परिस्थितीत त्याला आज शमिकाच्या आधी पोचायचं होत.
त्याचं कालच कोपऱ्यातलं टेबल रिकामं आहे हे बघून अमरला आपल्या गाडी चालवण्याच्या स्कीलसाठी उगीचच कॉलर ताठ करावीशी वाटली. टेबल गाठून स्थिर स्थावर होतो तोच खांद्यावर थाप पडली, अर्थातच शमिका गालातल्या गालात गोड हासत त्याच्या बाजूला उभी होती. हसल्यावर तिच्या गालाला पडणारी खळी बघून अमरची कालही तिच्याचेहेऱ्यावरून नजर हालत नव्हती. आणि आजही तिला हेल्लो, हाय, बस वगैरे म्हणायची शुद्ध अमरला नव्हती. शेवटी शमिकानेच त्याच्या हाताला बारीकसा चिमटा काढून त्याला पुन्हा या जगात खेचून आणला.
“किती टक लाऊन बघशील अरे, पुढे रोजच पहायची वेळ आली तर काय करशील?” नकळत का होईना शमिकाच्या तोंडून तिचं उत्तर बाहेर पडून गेले आणि ती गाल लाल होईपर्यंत लाजली. पण अजूनही तिच्या स्मितहास्यात बुडालेल्या अमरच्या कानावर पडून पण त्याला उमजले मात्र नाही. अचानक भानावर येऊन अमरनी शमिकाला विचारले, “काय मग कसा होता दिवस?” खरं तर त्याला विचारायच्या प्रश्नाचा नंबर तो का फिरवत नव्हता हे त्यालाही कळत नव्हत. इकडल्या तिकडल्या गप्पा सुरु झाल्या, पण थोडा धीर करून तिच्या डोळ्यात बघत, अमरनी हात पुढे करत विचारलच, “शमिका, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर सोबत सुरु केलेला हा प्रवास हातात हात देऊन पुढे चालू ठेउयात, कुठल्याही वळणावर सोबत न सोडता, एकमेकांना सांभाळत, प्रत्येक चढ उताराचा आनंद घेत, अगदी शेवटच्या मुक्कामापर्यंत. येशील माझ्यासोबत?” उत्तरादाखल शमिकानी फक्त त्याच्या हातात हात देऊन घट्ट धरला.
त्या दिवशी पकडलेला हात अजूनही सुटलेला नाही, पण तेव्हा पहिल्याच वाक्यानंतर शमिका इतकी का लाजली हे अमरला अजूनही न उलघडलेलं कोडच आहे…
Discover more from Adi's Journal
Subscribe to get the latest posts sent to your email.
Leave a Reply