Adi's Journal

Pieces of my thourhgs

प्रतिसाद की प्रतिक्रिया

माझ्या अमेरिकेत राहणाऱ्या एका चुलत बहिणीनी Humans of NewYork चा एक फोटो फेसबुकवर टाकला. फोटो तसा सामान्यच पण खरं लक्ष वेधलं ते त्या खाली लिहिलेल्या मजकुरानी. आजूबाजूला घडणाऱ्या कुठल्याही घटनेवर व्यक्त होणे हा मानवी स्वभाव आहे. मग ते देशाचे राजकारण असो की घरातला काही प्रश्न असो. तुमच्या कुटुंबियांशी झालेला वाद असो किंवा कामावर सहकाऱ्यांबरोबर निर्माण झालेले तणाव असोत. गल्लीतलं असो वा दिल्लीतलं, अरे चुकलच, गल्लीतलं असो की अमेरिकेतलं, आपलं व्यक्त होणं अगदी स्वाभाविक आहे. पण तुमच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीवर त्याचा परिणाम अवलंबून असतो.

बऱ्याचदा घटना घडल्या-घडल्या आपसूकच आपल्याकडून बाहेर पडते ती प्रतिक्रिया. अर्थातच त्यात सारासार विचारापेक्षा भावनेचाच आवेग जास्त आणि साहजिकच तितकाच तीव्र. उदाहरणच द्यायचं झालं तर प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याची बाब आहे तो आपल्या देशाचा मुकुटमणी असलेला काश्मीर, त्यावर थोडा जरी आघात झाला की कित्येकदा आपला साऱ्यांच्या शाब्दिक का होईना पण समशेरी उपसल्या जातात. अगदी स्वाभाविकपणे वाटतं की या क्षणी पाकिस्तानवर शंभर एक बॉम्ब टाकून कायमचा धडा शिकवावा. पण कित्येकदा अशा प्रतिक्रिया बाहेर पडल्यावरच आपण विचार करायला लागतो.

हेच बघा नं घरातला किरकोळ प्रश्न असतो. एखादी नावडती गोष्ट आपल्याला करायला लागणार असते. त्याचवेळी दुखावलेल्या मनात आधीचे साचलेले राग, अपमान वगैरे त्या प्रतिक्रियेला अजूनच धार चढवतात. कुटुंबातल्या ज्या सदस्यावर हे वार होतात त्याचे घाव आपल्याला कधीच दिसत नाहीत. आपला विरोध नोंदवला गेला न, मग झालं तर. पण कित्येकदा दिलेली प्रतिक्रिया इतकी तीव्र असते की नंतर कितीतरी वेळ आपलच मन आपल्याला खात राहते.

आणि या अपराधीभावातुनच घडलेल्या गोष्टीवर विचार होऊ लागतो. मग लक्षात येत, अरे जरा सबुरीने घ्यायला हवं होतं कि. समोरच्याचं म्हणणं तरी ऐकून घ्यायला हवे होते. त्यावर शांतपणे विचार करायला हवा होता. बाकी कुटुंबियांबरोबर बोलायला हवं होतं. आणि मग आपले मत व्यक्त करायला हवे होते. इतकं सगळ लक्षात आलेलं असते पण मोठ्ठा झालेला ‘अहम्’ हे धड कबूलही करू देत नाही.

पण तो ‘मी’ बाजूला ठेऊन असा काही विवेकबुद्धीने विचार करून तर्कसंगत असलेले मत व्यक्त केले तर त्या व्यक्त होण्याला आपण प्रतिसाद दिला असं म्हणू शकतो. ज्यात भावना आहेतच पण त्यांना तर्क आणि विवेकाची जोड पण आहे. जितक्या जास्त वेळा प्रतिक्रियेऐवजी आपण प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करू तितके ताण तणाव, भांडण तंटे कमी होणार हे नक्कीच. शिवाय समोरच्यालाही नकार स्वीकारायला जड जाणार नाही.

तसं बघितलं तर आपण साऱ्याच घटनांवर व्यक्त होतो. वास्तविक त्यातल्या कित्येक तुमच्या आमच्या जीवनाशी तीळमात्रानेही संबंधित नसतात. जगाच्यापाठीवर इतक्या घटना होत असतात, अमुक देशाच्या राजानी स्वतःसाठी इतकी दारू मागवली, मागवे ना का. यावर आपले व्यक्त होणे चालू. दारू किती वाईट, इतके पैसे त्यानी देशावर खर्च करायला हवे होते, माज आलाय या श्रीमंत देशांना वगैरे वगैरे भाषणं ठोकणे चालू. अरे जर त्या राजानी घेतलेल्या दारूचा एक घोटही तो तुम्हाला देणार नाहीये, ना त्या दारूचे पैसे तुमच्या महिन्याच्या पगारातून हप्त्या-हप्त्यांनी कापून घेणार आहेत. तो राजा, त्याच्या राणी अथवा राण्या, त्याच्या देशाची जनता घेईल की बघून.

खरच तुमच्या आमच्या प्रतिक्रियांनी कोणाला काही फरक पडत नाही. उलट आपलीच चिडचिड होते. या उलट जर या प्रतीक्रीयेतल्या भावनेला विवेकाची जोड देऊन प्रतिसाद दिला तर आजूबाजूला थोडातरी बदल होईल अशी आशा तरी असते. थोडा विचार करूया, प्रतीक्रीयेऐवजी प्रतिसाद देऊया…

Related Posts

Leave a Reply