Adi's Journal

Pieces of my thourhgs

सापडले….

लहान मुल, निरागस, मनमोकळ, हसणारं, इकडे तिकडे मनसोक्त भटकत आनंदी आयुष्य जगणारे. काळाबरोबर मोठे होऊ लागते आणि ते चेहेर्यावरचा हसू कुठे तरी न सांगता निघून जाते. शांतपणे. मग अचानक कधीतरी निवांत क्षणी मागील आठवणी दाटून येतात आणि मग अचानक लक्षात येतं किती काळ लोटलाय आपण मनमोकळे हसलोच नाहीये. अधिकाराच्या बुरख्याखाली कुठे तरी आपण स्वतःची ओळख विसरून गेलोय. स्वतःच्या घरात बायकोच्या हातचा जेवताना, मुलांच्या यशाकडे प्रगतीकडे बघताना, आई वडिलांची सेवा करताना देखील तो अधिकारी नावाचा बुरखा अंगावरून उतरत नाही. जणू घट्ट गोंद लावून चिकटवून टाकला आहे. कुठे एखादा चांगला विनोद ऐकला तरी चेहेऱ्यावरची माशी उडत नाही. चांगलं गाणं ऐकलं तर मनमोकळी दाद देता येत नाही. जणू कोणताही आनंद उपभोगणच जणू आपण विसरून गेलोय. एकाच विचार मनात येतो आपण असा वागलो तर लोक काय म्हणतील. या अवाजवी लोकलाजेस्तव आपल्याला कळतच नाही की आपण किती आनंदाचे अनमोल क्षण वाया घालवले.

मग अचानक कधीतरी जुने फोटो सापडतात, एखाद्या जुन्या गाण्याच्या ओळी कानी येतात आणि त्या सगळ्याशी जोडल्या गेलेल्या असंख्य हसऱ्या आठवणी आपल्या भोवती गलका करतात. आपण नको म्हणत असताही हात घालून तो साहेबी अंगरखा टरटरा फाडून टाकतात. आणि हाताला धरून जवळजवळ ओढतच घेऊन जातात आपल्याबरोबर. बराच काळ भटकत बसतो आपण. वेळकाळाचं भान विसरून आपणही त्यांच्याबरोबर हुंदडतो. यथावकाश भटकून झालं कि आठवणीच आपल्याला पुन्हा आणून सोडतात घरी. सोबत देतात एक नवी उमेद. एक अनामिक उर्जा आणि पुन्हा साहेबी मुखवटा न घालण्याची ताकीद….

Related Posts

3 thoughts on “सापडले….

Leave a Reply