पत्रोत्तर..

प्रिय,

परवा तुझं पत्र आलं आणि मन एका क्षणात १५ वर्ष मागे गेलं. तुझी माझी मैत्री आपल्या मॅट्रिकच्या वर्गातली. त्या दिवशी माझ्या बाजूला बसणाऱ्या मुलीचं शाळेत न येणं आणि त्याच दिवशी तुझा शाळेचा पहिला दिवस असणं. अगदी योगायोग. सातारच्या कुठल्याशा शाळेतून बदलून आमच्या शाळेत आलीस. आणि जणू वर्षानुवर्षांची ओळख असल्या सारख्या आपल्या गप्पा रंगल्या. नशीब इतकच की आपली बडबड बघून बाईंनी आपल्याला वेगवेगळ नाही बसवलं. त्या दिवसापासून स्नेह जुळले ते कायमचेच. हा आत्ता मध्ये काही वर्षांचा खंड पडला खरा. पण त्यालाही बऱ्याचप्रमाणात मीच जबाबदार आहे. त्याबद्दल कान पकडून माफी, आणि तू पुण्यात आलीस की तुला तुझ्या आवडीच्या पाणीपुरीची मोठ्ठी पार्टी.

शाळेपासून जोडलेले धागे पुढे कॉलेज मध्ये वेगळे विषय निवडले म्हणून कधी विरळ झाले नाहीत हे मात्र नक्की. आधीपासूनच वाचनाची आवड असलेल्या तू शाळेतच हळूच थोडं थोडं लिहायला सुरु केलं होतंस. त्यावरून मी बांधलेल्या अंदाजाप्रमाणे तू मराठी विषयात B. A. करायचं ठरवलं आणि मी आपला धोपटमार्ग बरा म्हणून B.Com. ला प्रवेश घेऊन मोकळी झाले. पण सुदैवानी कॉलेज एक असल्यानी वरचेवर भेटी गाठी होत होत्या. हा, अगदी शाळेतल्या सारख्या रोज तासनतास गप्पा परत क्वचितच रंगल्या. पण भेटल्यावर तुझ्या नवीन कविता ऐकवल्याशिवाय मी तुला कधी सोडलं नाही.

पुढे आपली लग्न झाली, ती नशिबानी एका दिवशी झाली नाहीत इतकंच. लग्न करून तू मुंबईकर झालीस आणि मी इथे पुण्यात संसार थाटला. पण आपल्यातलं हे १०० मैलांचं अंतर हा पत्रसंवाद दर आठवड्याला नाहीसं करत होताच. मी आपली साधी बँकेत नोकरी धरली आणि तुझी साहित्यसेवा सुरु झाली. पुढे मागे नक्की मोठी लेखिका होणार याची खात्री असल्यानी तुझ्या पत्रांची सर्व बाडं जपून ठेवली आहेत बरं का! ‘जी एंची पत्रे’ सारखं काही तरी मस्त करता येईल त्यांचे. अर्थात तुला आवडले तर.

सारं काही मस्त चालू होते आणि अचानक ह्यांना परदेशवारीची संधी चालून आली. हातची संधी कोण सोडतं थोडच. आम्हीही चांगली ४ वर्ष ब्रिटनमध्ये मुक्काम ठोकला. सुरवातीची पत्रापत्री झाली पण नंतर माझ्या आळशीपणानी आपला पत्रसंवाद तुटला आणि आपली पांगापांग झाली ती पण तब्बल तीन साडे-तीन वर्षांसाठी. गेल्याचं महिन्यात ब्रिटनमधला गाशा आम्ही गुंडाळला आणि पुन्हा भारतभूच्या चरणी येऊन थांबलो. हा पण आपला संपर्क नसला तरी गेल्या चार वर्षातली तुझी सारी पुस्तकं वाचून झालिएत बरं. इथे नवीन प्रकाशन झालं कि आई लगेच पाठवून द्यायची. एक से बढकर एक. क्या बात है.

अन काय ग, माझ्या वाटेकडेच डोळे लाऊन बसलेलीस का काय? पुण्यात परत येऊन स्थिरस्थावर होत नाही तो तुझं पत्र. माझ्यावर इतकं प्रेम नको बाई, मुंबईत उगीच कोणी तरी हेवा करेल माझा. पण खरंच खूप खूप बरं वाटलं तुझं पत्र वाचून. आता लवकर पुण्यात ये, ब्रिटन गाथा ऐकवीन तुला. तेव्हढंच तुझं पण माहेरपण 😉

बाकी भेटलो की निवांत गप्पा होतीलच.

वाट बघते.

तुझी,

ता. क.: अजून किमान ६ महिने पुन्हा नोकरी धरणे नाही तेव्हा मुक्काम माझ्याकडे केलास तरी चालेल. काकूंना मी पटवते.

Photo Credit: Evolution of an Aristocrat


Discover more from Adi's Journal

Subscribe to get the latest posts sent to your email.


Comments

Leave a Reply