धावपळ पडद्यामागची
स्नेहसंमेलन म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो जल्लोष, उत्साह, बेभान होऊन काम करणारे हौशी कलाकार आणि बऱ्याचदा त्यांची टर उडवणारे प्रेक्षक. काय वाटेल ते करतात काय विचारू नका. खुर्च्यांवर उभे राहून जा जा असे हातवारे करणं, ग्रुप मध्ये उठून कवायती करणं. एकाच वेळी सगळ्यांनी मागेच काय बघायला लागणं. काही विचारू नका. या सगळ्या गोंधळात खरा कस लागतो तो पडद्यामागील कलाकारांचा. अन् त्यातही सगळ्या सादरीकरणांना सांधून एकसंध कार्यक्रम देणाऱ्या निवेदकांचा.
अभियांत्रिकीतील स्नेहसंमेल खास वाटतं ते याच धावपळीसाठी. वास्तविक माझं पहिलच. त्या अगोदर रंगमंचावर उभं राहिलेलो ते पहिली दुसरीत असेन. प्रत्येकाला वेळ दिलेला असून पडद्यामागे प्रचंड गोंधळ. अभियांत्रिकी करणारे तसे सगळे कलाकारच. परीक्षा पास होण्याकरता अनेक कला दाखवतात. पण स्टेज वर जायची पाळी आली की कुठे दडून बसतात देव जाणे. ५० वेळा ओरडल्यावर उगवणार. तर काही जण सारखं येऊन आम्ही कधी स्टेजवर जाणार असा विचारात बसणार. कोणाला वेळा बदलून हव्या असतात. एक ना अनेक गोष्टी.
या सगळ्या आघाड्यांवर तोंड देत बाजीप्रभू सारखी लढणारी सुप्रिया आजही डोळ्यासमोर आहे. कार्यक्रमात बदल झाले की त्यासाठी त्या त्या निवेदकांचा शोध. ते तरी कसले स्टेज मागे थांबणार? धुडगूस घालायची संधी कोणी सोडणारे होय. एखादा सापडलाच नाही तर आयत्या वेळी कोणाला स्टेजवर ढकलायचा, कोणाला कधी थांबवायचा. या सगळ्याची नोंद करत करत हातातला मूळ क्रम लावलेला कागद पार कला पडलेला.
प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आयत्यावेळी उभी केलेली मामाची मामी मात्र या सगळ्या धावपळीचा कळस होता. मामा त्या वर्षीचा स्टार होता. मामा ही काय वल्ली होती ती पुढे कधीतरी सविस्तर सांगीनच. पण या मामाला हुडकला तो सुप्रियानीच. पण त्याचं काम बघायला काही तिला बघायला मिळालं नाही. खायची प्यायची शुद्ध नसलेल्या सुप्रिया दिवसाखेरी सुटकेचा निश्वास टाकायची.
कार्यक्रम संपला तरी आमची अख्खी टीम चहा पीत गप्पा ठोकत बसायची. या मॅडम तिथे असायच्या, हसायच्या देखील पण मनात चाललेलं उद्याच नियोजन न त्याच येणारं थोडसं टेन्शन तिच्या त्या हसण्यातून पण डोकवायचं. जणू काही एखादा बाळंतपण केलं असं समाधान तिच्या चेहेऱ्यावर शेवटच्या दिवशी होतं. एका अर्थी हे बाळंतपणच होतं मामाच्या भूमिकेचं, आयत्यावेळी शोधलेल्या मामीचं, माझ्यातल्या निवेदकाचं.
कॉलेज संपल तशी सगळ्यांची पांगापांग झाली. पण मनात या आठवणी तशाच घर करून होत्या; आहेत. सुप्रिया पण अमेरिकेत पुढे शिकतेय. पुढची वाटचाल पण ती त्याच जिद्दीनी आणि आत्मविश्वासानी नक्की करेल यात शंका नाही. खूप शुभेच्छा.