Category: Marathi

  • सगळेच वेडे…

    या जगात सगळेच वेडे

    शहाणे नाही औषधा थोडे

    प्रत्येकाला स्वतःचं एक वेड

    कुणाचं फ्री कुणाचं पेड.

     

    पैशासाठी वेडे कोणी

    कुणा असे सत्तेचे वेड

    लोकांच्या कल्याणाचेही

    आहे कुणाला अजब वेड

     

    गरिबी हटवण्या कधी कुणी

    कष्टाचेही घेतो वेड

    दुःख पुसुनी हसू लिहिण्या

    जोकर होणे कुणाचे वेड.

     

    झाडांपायी वेडे कोणी,

    दऱ्या कुणा लावती वेड.

    कोलंबसाचे वंशज कोणी

    गर्वे घेती दर्याचे वेड.

     

    छंदाच्या त्या वेडापायी

    न कळे किती करतो पेड,

    दुसऱ्यांचे जे भंगार

    ते जमवणे त्यांचे वेड.

     

    खरच जागी या सगळे वेडे

    नाहीतच शहाणे अगदी थोडे

    नाहीत शहाणे हेच बरंय….

    लावले असते त्यांनाही वेड.

  • लोकशाहीतली दडपशाही………

          नमस्कार….

          सध्या दर आठवड्यात नवीन बातमी येते… अमुक चित्रपटाचे प्रदर्शन तमुक पक्षानी रोखले… तमुक चित्रपटाला अमक्या अमक्या नेत्याचा आक्षेप.. आज ह्या संघटनेनी चित्रपटातील या भागावर आक्षेप घेतला.. अरे काय चाललाय काय??? भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कि नाही??? चित्रपटात जर काही वाईट असेल तर त्याबद्दल निर्णय घेण्यासाठी सेन्सोर बोर्ड बसवला आहे नं??? मग ह्यांना कशाबद्दल तक्रार आहे??? अगदीच काही आक्षेपार्ह आहे जसे राष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारी काही दृश्य आहेत, अथवा सामाजिक नितीमत्तेला अडथळा ठरतील असे काही आहे. तर ठीक आहे कि.. पण तसे नसतांना हे  आक्षेप घेतले जातात. नाही घेतले तर त्यांच्याच अस्मितेला धक्का बसेल ना… अहो चित्रपटाच्या नावात एक सर्वसामान्य माणसाच्या तोंडी अगदी एखाद्या नेहमीच्या शब्दासारखी असलेली शिवी आलीच; जिला लोकांचा काहीच आक्षेप नाही हा; उगीच एखादी संघटना उठते आणि विरोध करते. इतकीच शिवराळ भाषेबद्दल तिडीक असेल तर त्यांनी किमान १ महिना तर सोडा पण १ आठवडा एक पण शिवी तोंडातून ना काढता राहून दाखवावं. अशक्य आहे. चीड आली कि पहिले शिवीच बाहेर पडते ना? मग त्या चित्रपटातून सध्याच्या शिक्षणपद्धाती बद्दलची चीड तर दाखवायची होती.  मग त्यांनी काय वापरावा नावात अशी त्यांची अपेक्षा होती? शिक्षणाचा उदो उदो???

         आज काय तर म्हणे आम्ही माय नेम इज खान नाही दाखवू देणार. त्या आधी सगळ्यांनी शिवाजी राजे भोसले बोलतोय बघावा.. अरे ह्यात काय तर्कसंगती आहे??? शिवाजी राजे आधीच सगळ्यांचा बघून झाला आहे की. आणि कोणत्या गोष्टींची तुलना करताय??? माय नेम इज खान काय  अफझलखानावरचा  चित्रपट आहे की शाहिस्तेखानावरचा की ज्याची तुलना “मी शिवाजी राजे भोसले बोलतो आहे” शी व्हावी? का त्यात सांगितलं आहे की महाराष्ट्रात जा आणि सगळ्या मराठी लोकांना भारताबाहेर हाकलून द्या? अरे कशालापण विरोध करायचा का? नशीब त्या हरीश्न्द्राच्या निर्मितीकथेचं नाहीतर एखादा दादासाहेबांचा वारस उठून त्याला ऑस्कर मध्ये पोहोचवण्याच्या आधीच खाली ओढून घेऊन आला असतं. कारण दिला असतं दादासाहेबांचे केस उजवीकडे जास्त होते. अश्या क्षुल्लक कारणांसाठी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवितात. दंगा करतात, तोडफोड करतात. पण हे  लोक विसरून जातात की आपण जे मोडतो ते सरकार आपल्याच पैश्यातून भरून काढणार आहे… ते थोडीच स्वतःचे पैसे टाकणारेत.

           अजून एक खूळ निघालं आहे. सरकार म्हणत आम्ही चित्रपटगृहांना पोलीस संरक्षण देऊ. आता मला सांगा, कोण शहाणा माणूस इतक्या पहाऱ्यात थेटरात जाईल? त्याला काय हौस आहे पैसे खर्चून डोक्याला ताप करून घ्यायची?? तो गप घरी सी डी आणून नाही बघणार?? म्हणजे तुमच्या विरोध वगैरेचा काही उपयोग झाला का?? लोकांनी बघायचा तो बघितलाच की… उगीच आपली शक्ती वाया घालवायची आणि दहशत निर्माण करून सामान्य लोकांना त्रास द्यायचा. जेणेकरून या लोकशाहीत लोक आपल्या नावानी दडपून जातील. मग आपल्याला मोकळा रान मिळेल नको ते उद्योग करायला…. हे काय एखाद्या पक्षाचे नाही… सगळेच पक्ष इथून तिथून सारखेच आहेत. जो तो लोकांना दडपायला बघतो आहे. असं वाटत या लोकशाही पेक्षा दडपशाहीच बरी होती. इथे नुसतीच नावाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य, पण जरा कोणी काही मोठ्या नेत्याबद्दल बोलला की त्याचा खूनच काय तो व्हायचा बाकी उरतो… अरे कुठे आग असल्याशिवाय धूर निघत नाही न??? नेते मंडळीनी छान वागा तुम्हाला कशाला विरोध करायची वेळच येणार नाही न.

  • दुरावा

    हा दुरावा का असतो प्रत्येक प्रेमात?

    पण एक न्याराच सुख असतं त्यात.

    प्रेमात बऱ्याचदा हाच सोबत असतो,

    दोघांना बेटा सदा वेडावत असतो.

    वाकोल्या बघून दोघं जाम चिडतात,

    पण राग  कुठेतरी लांब भिरकावतात.

    ती त्याला आणि तो तिला;

    कल्पून दुराव्यालाच कुरवाळतात.

  • मनाचं कोडं

    न सुटणार गहन कोडं

    असतं आपलं मन.
    खरच कुणी सांगेल का
    काय असतं मन?
    विचारांचं दळण दळणार
    जातं म्हणजे मन?
    की गहिऱ्या डोहासारखं
    शांत निश्चल मन?
    हळुवार नाजूक गुलाब जणू
    भुरळ पाडत मन?
    की त्याच्याच काट्यासारखं
    टोकदार असतं मन?
    वादळी पावसासारखा
    झोडपत ते मन?
    की मृद्गंध देणारी
    पहिली सर असतं मन?
    खरंच डोकं फुटलं तरी
    उमजत नाही हे मन.
    सांगेल कुणी समजावून
    काय असतं मन?
  • कैफियत

    मित्रांनो नमस्कार,, आज मी काही तुमच्याशी गप्पा मारणार नाहीये. आपल्यावर हे बारीक नजर ठेऊन असलेले हे मोट्ठे लोक आहेत नं.. हो हो तुम्हीच, या असे समोर येऊन बसता का?? तुमच्याशीच बोलायचं थोडं. मित्रांनो तुम्ही असे माझ्या बाजूला येऊन बसा. म्हणजे कसे व्यवस्थित २ गट होतील ना. तर मी म्हणत होतो कि मी तुमच्याशी गप्पा मारणार नाहीये. तर आज मी मांडणारे एक कैफियत. आपल्या सगळ्यांच्या वतीनी या मोठ्यांसमोर. काय म्हणताय कैफियत कसची ना? सांगतो कि… आपले आमच्या वागण्या बोलण्यावर काही आक्षेप आहेत, जे साहजिकच आम्हाला मान्य नाहीत, त्या बद्दल…. आमची हि कैफियत ऐकून घेऊन त्यावर काही तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे आणि तशी अशा वाटते म्हणून मांडतो आहे तुमच्यासमोर..

    सगळ्यात मोठ्ठा आरोप तुम्ही लोकं करता तो म्हणजे आमची सर्जनशीलताच संपली आहे.. हि गोष्ट तर अजिबात मान्य नाही आम्हाला. आमची सृजनाची क्षेत्रच जर वेगळी असतील आणि ती तुम्हाला माहितीच नसतील तर सर्जनशीलता दिसेलच कशी?? आज दिवसाला एक या दरानी संगणकात बदल होत आहेत. नवनवीन डिजिटल उत्पादने बाजारात येत आहेत. अनेक सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत. मोबाईलसारख्या उपकरणांमध्ये प्रचंड झपाट्यानी बदल होत आहेत, जे आपण सगळ्यांनी अंगिकारले आहेत. जग अगदी एका बटणाच्या दुरीवर आलं आहे. हि सगळी कुणाची तरी सर्जनशीलताच आहे नं???

    आज अनेक नवनवीन लेखक, कवी उदयाला येत आहेत, जुन्या पुस्तकाच्या अगदी नियमीतपणे आवृत्या निघत आहेत; तरी ओरड आहेच आम्ही काही वाचत नाही.. सारखं ऐकवतात “वाचाल तर वाचाल”. पण आजच्या घड्याळाच्या काट्यांवर पळण्याच्या दिवसात पुस्तकांचा रसास्वाद घ्यावा तरी कसा? त्यावर पण आम्ही उपाय शोधलाय नं. पुस्तकांची अभिवचन करून ती ध्वनिमुद्रित करून ठेवली आहेत. त्यांचा आस्वाद आम्ही घेत असतोच की. अशा डिजिटल पुस्तकांची ई-वाचनालये सुद्धा बनवलीत आम्ही.

    आमच्यावर अजून एक जाहीर आरोप होतो.. “तुम्ही दिवसभर नुसते या खोक्यांसमोर बसा आणि चष्म्यांचे नंबर वाढवा. कुठे बाहेर म्हणून जायला नको.” अहो आम्हाला पण फिरावासा वाटतं नं. आम्ही फिरतो सुद्धा. आणि जर फिरत नसतो तर वैनतेय, पगमार्क्स यांसारख्या ट्रेकिंगच्या आणि इतर अनेक पर्यटन संस्थांचे कारभार इतक्या सुरळीत आणि तेजीत चालेल असते??? कधीच बंद पडायला हव्या होत्यान ना..

    आमच्यातही काही दोष आहेत ना ते नाकारता येणारच नाहीत. तशी इच्छा पण नाहीये. नुकते कुठे ते कळायला लागलेत पण अजून वळले नाहीयेत. वळतीलही हळू हळू. अनेक प्रश्न, गंभीर समस्या थैमान घालताच आहेत की. खालावलेली नितीमत्ता, धर्मातील पंथांमधील तेढ, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ह्रास, हे सगळे कमी होते म्हणून राष्ट्रहितापेक्षा स्वहित मोठे मानून देश विक्रीसाठी बाजारात उभा केला गेला. सगळीकडे घाण झाली आहे. पण घरची साफसफाई करण्यात हात कोण खराब करून घेईल? सगळे आपले ग्रीन कार्डच्या मागे. डिग्री मिळाली की पळाले तिकडे. खोऱ्यानी मिळणारा पैसे दिसतो पण त्याच खोऱ्यानी तो तिथे खर्च पण करावा लागतो हे इथून दिसत नाही ना. तरी आपले सगळे पळतात तिकडे.

    इथेही काही कमी पैसा नाही हो. इथे पण बख्खळ मिळतो. मग आमचे डोळे थोडे निळसर हिरवट दिसु लागतात. पैश्यांचा रंग येतो ना त्यात. मग आपले आई वडील अचानक भंगार माल वाटू लागतात. मग त्यांची रवानगी होते वृद्धाश्रमात. विचार पण करत नाहीत की आज पैसे मिळवण्याइतकी जी काय आपली लायकी आहे ती यांच्यामुळेच. बिचारे आपले निमूटपणे स्वतःच्या कष्टानी उभं केलेलं घर सोडतात. वर्ष वर्ष साधी विचारपूस पण त्यांच्या वाट्याला येत नाही.

    नैतिकतेच्या नावानी तर बोंब झाली आहे. चित्रपट आणि दूरदर्शन मालिका तर अगदी बघवत नाहीत. अरे ते बालगंधर्व पुरुष असून कधी पदर ढळत नसे त्यांचा. आताच्या नट्यातर कधी आमचे कपडे फेडताय याचीच अगदी आतुरतेनी वाट बघत असतात जणू. आणि अंधानुकारणाचा जन्मसिद्ध हक्क बजावण्यासाठी तरुण मंडळी टपलेलीच असतात. ते तरी काय करणार त्यांना अंगभर चापूनचोपून साडी नेसलेली स्त्रीच आजकाल दिसत नाही ना कुठे.

    मान्य आहे आमच्यात मद्य संस्कृती वाढते आहे. त्याला सोसायटी स्टेटसचा सोनेरी मुलामा चढवला जातोय. सरकारचाही त्याला अनुदानांसकट भक्कम पाठबळ मिळतोय. पण जे वाइट त्याला चांगला कसं म्हणायचं? इतरही अनेक छोटे मोठे दोष आहेत आमच्या पिढीत. याचा अर्थ असा नाही की आम्ही अगदीच टाकाऊ आहोत.

    मित्रांनो आपली कैफियत मांडता मांडता मी त्यांच्याही कैफियतीचे काही काही मुद्दे मांडलेत. काय हो, बरोबर ना?? मग… आपण त्यांना वचन द्यायचं ना? दोष दूर करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांचं.. हा थोडं वेळ द्यावा लागेल. कष्ट पडतील थोडे.थोडं अवघड आहे. पण करणार ना? मग देऊ होकार??? माझा तर आहेच हो पण तुमच्याही होकाराची वाट बघतोय…

  • लब्बाड ढगा

    का रे लब्बाड ढगा,

    असं का तू करतोस?
    उन्हात काळवांडलास
    म्हणून का रे लपतोस??
    असं किती लपशील
    पटक्कन ये ना..
    तुझ्याकडच गोड गोड पाणी,
    मला तू दे ना.
    ए… उगी नाटक केलास ना
    तर डोंगर दादाला सांगीन.
    दूर दूर पळताना तुला
    रंगे हाथो पकडीन.
    त्यांनी एकदा पकडलं
    कि मग काय करशील?
    इतका वेळ लपवलेलं
    एका मिनिटात देशील