Category: Marathi

  • कसले हे नियोजन?

    भारताच्या नियोजन आयोगाच्या कृपेनी भारताच्या शहरात राहणाऱ्या लोकांना नवीन ओळख मिळाली आहे. ही ओळख आहे श्रीमंतीची. होय, तुम्ही दिवसाला २९ रुपये खर्च करता का? मग तुम्ही श्रीमंत आहात. तुम्ही दिवसभरात दोन वेळचं जेवता? होय तुम्ही श्रीमंत आहात. तुम्ही दोनदा चहा पिता? होय तुम्ही श्रीमंत आहात. नियोजन आयोगाच्या कृपेनी आज भारतातील दारिद्र्यारेशे खालील माणसे खूप कमी झाली असतील निश्चित. हो आणि हे आकडे आहेत शहरातील लोकांसाठी. कदाचित खेड्यात लोकांनी जर दिवसाला ५ रुपये खर्च केले तरी देखील ते श्रीमंत म्हणून मिरवू शकतील. म्हणे शहरांमध्ये ५ रुपयात भाकरी, ३ रुपयात पोळी, ५ रुपये दिले तर भाजी मिळते. मायबाप सरकार कृपा करून अशा दुकानांची यादी तरी जाहीर करावीत. मग खरच जर २९ रुपयात जगता आला तर उरलेले पैसे आम्ही तुमच्याच कंपन्यांच्या दारूवर उडवू म्हणजे तुम्ही अजून श्रीमंत व्हाल. मायबाप सरकार, या नियोजन आयोगाला सामान्य माणसाच्या तर्फे काही प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी. नियोजन आयोग हे विसरला का की माणसाला अन्नाव्यतिरिक्त वस्त्र आणि निवार्याची सुद्धा मुलभूत गरज आहे. या २९ रुपयात आम्ही घरभाड आणि कपड्याचा खर्च कसा बसवावा मालक? झालंच तर रातच्याला घरामध्ये दिवाबत्ती करावी लागते. त्याच्यासाठीची काही सोय लावलीये का हो मालक? मालक जरा सांगा नं, आयत्यावेळी काही झाला न इस्पितळात जावा लागला तर त्याचा खर्च कुठून करायचा हो?
    असेही आम्हाला आता ही दुकाने शोधावी लागणारच आहेत की. तुम्ही आम्हाला एकच सिलेंडर देणार आहात स्वयंपाकाला. तो जर आयत्या वेळी संपला तर आमची जी धावाधाव होणार आहे ती टाळण्यासाठी अशा स्वस्त आणि मस्त दुकानांमध्ये जाऊन जेवानेच आम्हाला सोयीचे वाटणार आहे. अगदीच सणाचा गोडधोड आपला घरी करावा आणि ते देखील जर सरकारनी सणासुदीसाठी २९ रुपयांव्यातीरिक्त काही वर्खार्चास रक्कम दिलीत तर. सिलेंडर चा काळाबाजार तुम्हाला थांबवता येत नाही म्हणून आम्हाला का त्रास देता तुम्ही?तुम्ही म्हणाल ते पैसे देतो नं त्या सिलेंडरचे? आणि रीतसर परवानगी घेऊन तर २ घेतोय. आता पुरात नाहीत तुम्हाला सिलेंडर तर नवीन बनवून घ्या नं का आपल्या देशातला लोखंड संपलं सगळं? सगळे कर देतो तुम्हाला, अगदी बिन बोभाट. तरी तुमचे सगळे निर्बंध आमच्यावर. जे लोक फुकट ग्यास वापरतात, कर देत नाहीत, वीज चोरी करतात त्यांना मात्र काही त्रास नाही. मायबाप काहीही उपाय करू नका यावर तुम्ही, नाहीतर आत्ता २९ रुपये तरी देताय तुम्ही उपाय शोधलेत तर आम्हाला कदाचित ४-५ रुपये खर्च करा म्हणून सांगाल…..

  • देवा, नाही झाला घोटाळा?

    देवा मला सांग अगदी खरी गोष्ट एक,
    बेट्या माणसाला का नाही बनवलास नेक?

    मारे दिलीस बुद्धी त्याला तू सकस,
    पण का दिलास मनात आकस?

    कणभरही स्वतःची प्रगती नाही,
    दुसऱ्याची आजीबात पाहवत नाही.,

    भ्रष्ट हावरट एकजात हा माणूस सगळा,
    वरून बगळा आतून पक्का कावळा काळा.

    नाही पडत का हा प्रश्न कधी तुला?
    माणसाला बनवून नाही झाला घोटाळा?

  • कविता

    कविता खरंच अशी ठरवून होत नाही,
    लगेच जमायला ती काही २ + २ नाही.

    मनातल्या भावनांना कवितारुप येणं,
    हे तर त्या माता सरस्वतीच देणं.

    कधी एकामागून एक येते लाट,
    कधी मनातला चातक बघतो वाट.

    कवितेला असते कधी नाजूक किनार,
    तर येते कधी परिस्थितीची वज्रधार.

    जपलं जातं कधी कधी गुलाबी स्वप्नं,
    तर कधी व्यक्त होतं भयाण दुःस्वप्न.

    तरीही कविता असते मनाच्या जवळ,
    आनंदाने भरून जाते आपली पूर्ण ओंजळ.

  • हसू आणि आसू

    त्या दिवशी दुरवर

    एकटाच फिरताना,

    सागरावरून येणारा

    गार वर पिताना,

    ओठी होते हसू तुझी

    आठवण काढताना,

    नयनी मात्र आसू

    हा विरह सोसताना…

  • सब कुच चलता है

    स्वर्गस्थ पुण्यात्मे रोज अश्रू ढाळत आहेत

    प्रिय मातृभूमीची दैना बघून अस्वस्थ आहेत,

    पण इथे आम्हाला आज ‘देशसे क्या लेनादेना है’

    फक्त आमचा खिसा भर ‘यहा सबकुछ चलता है’

    कुठल्याही क्षुल्लक गोष्टीची इथे ब्रेकिंग न्यूज होते

    मुंबई मे बडा भूचाल ही बातमी खाली स्क्रोल होते,

    कशात काही नसतं हो ‘हमको सिर्फ TRP बढाना है’

    फक्त आमचा खिसा भर ‘यहा सबकुछ चलता है’

    इथे वजनाशिवाय फाईलीला पाय फुटत नाही

    कामे होताच नाहीत जोवर हात ओले करत नाही,

    त्यांची इच्छा नसते हो ‘घरवाली मान्गती है’

    फक्त आमचा खिसा भर ‘यहा सबकुछ चलता है’

    चुकांशिवाय कुठलाच कागदपत्र बनत नाही

    महाराष्ट्राचं नाशिक UP त गेलं तरी हरकत नाही

    जाब विचारला तर उत्तर एकाच ‘क्या इतनाही काम है?’

    फक्त आमचा खिसा भर ‘यहा सबकुछ चलता है’

    नेत्यांनी तर देशाला आज बाजारात उभे केले

    म्हणच आहे न कुंपणानेच शेत खाल्ले ,

    तसा त्यांचा दोष नाही हा ‘ये सिस्टम ही खराब है’

    फक्त आमचा खिसा भर ‘यहा सबकुछ चलता है’

    या सर्व काळोखात बारीक तिरीप दिसते आहे

    उज्वल भविष्याचं किमान स्वप्न तरी पडत आहे,

    काहींना आता पटू लागलं ‘यार ये सब बदलना है’

    आम्हाला तो देश हवाय ‘जहा सिर्फ अच्छा ही चलता है’

  • सापडले….

    लहान मुल, निरागस, मनमोकळ, हसणारं, इकडे तिकडे मनसोक्त भटकत आनंदी आयुष्य जगणारे. काळाबरोबर मोठे होऊ लागते आणि ते चेहेर्यावरचा हसू कुठे तरी न सांगता निघून जाते. शांतपणे. मग अचानक कधीतरी निवांत क्षणी मागील आठवणी दाटून येतात आणि मग अचानक लक्षात येतं किती काळ लोटलाय आपण मनमोकळे हसलोच नाहीये. अधिकाराच्या बुरख्याखाली कुठे तरी आपण स्वतःची ओळख विसरून गेलोय. स्वतःच्या घरात बायकोच्या हातचा जेवताना, मुलांच्या यशाकडे प्रगतीकडे बघताना, आई वडिलांची सेवा करताना देखील तो अधिकारी नावाचा बुरखा अंगावरून उतरत नाही. जणू घट्ट गोंद लावून चिकटवून टाकला आहे. कुठे एखादा चांगला विनोद ऐकला तरी चेहेऱ्यावरची माशी उडत नाही. चांगलं गाणं ऐकलं तर मनमोकळी दाद देता येत नाही. जणू कोणताही आनंद उपभोगणच जणू आपण विसरून गेलोय. एकाच विचार मनात येतो आपण असा वागलो तर लोक काय म्हणतील. या अवाजवी लोकलाजेस्तव आपल्याला कळतच नाही की आपण किती आनंदाचे अनमोल क्षण वाया घालवले.

    मग अचानक कधीतरी जुने फोटो सापडतात, एखाद्या जुन्या गाण्याच्या ओळी कानी येतात आणि त्या सगळ्याशी जोडल्या गेलेल्या असंख्य हसऱ्या आठवणी आपल्या भोवती गलका करतात. आपण नको म्हणत असताही हात घालून तो साहेबी अंगरखा टरटरा फाडून टाकतात. आणि हाताला धरून जवळजवळ ओढतच घेऊन जातात आपल्याबरोबर. बराच काळ भटकत बसतो आपण. वेळकाळाचं भान विसरून आपणही त्यांच्याबरोबर हुंदडतो. यथावकाश भटकून झालं कि आठवणीच आपल्याला पुन्हा आणून सोडतात घरी. सोबत देतात एक नवी उमेद. एक अनामिक उर्जा आणि पुन्हा साहेबी मुखवटा न घालण्याची ताकीद….