Category: प्रासंगिक

  • दुर्गे दुर्दशा भारी

    नैमित्यिक कारणांनी आपल्या सगळ्यांचीच दुर्ग भ्रमंती चालू असते. इच्छा असते ती रोजच्या जीवनातून कुठे लांब जाऊन काही वेगळा अनुभव घेण्याची. दोन-चार डोकी गोळा होतात, गाड्या निघतात, पाठीवर १-२ दिवसांचं समान, कॅमरा इत्यादी साहित्य लादलं जातं आणि प्रवास सुरु होतो तो एका अनामिक ओढिनी. काही नवीन अनुभव गाठीशी घेण्याच्या इच्छेनी, गणरायाचे नाव घेऊन शिवाजीमहाराजांना मुजरा करून गडाच्या पायथ्याला पाय लागतो आणि पुढच्या पावली अडखळतो. मनातले उदात्त भव्य इतिहासाचे चित्र खळकन पडून फुटते आणि समोर उभे राहते ते दुर्लक्षित, उपेक्षित, अस्वच्छ ऐतिहासिक स्मारक. ज्यांनी कोणे एके काळी महाराजांची पायधूळ आपल्या मस्तकी धरली, स्वराज्यातील प्रत्येक बऱ्या वाईट घटना बघितल्या, ते वैभव अनुभवलं, लढायांचा थरार अनुभवला, शत्रूच्या रक्ताने न्हाऊन निघालेल्या रणचंडीची पूजा आपल्या पदारातील काही समिधा वाहून केली, आपल्या कोटा बुरुजांवर असंख्य वार झेलत स्वराज्यासाठी झुंजणाऱ्या महाराष्ट्र वीरांचा रक्षण केलं; त्याच गडकोटांची ही अवस्था पावला-पावलाला मनाला असंख्य ठेचा देत जाते. मनात कुठे तरी आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. कुठे चुकलं आमचं? आमच्या दिपस्तंभांची ही अशी अवस्था?

    प्रातःस्मरणीय आणि वंदनीय अशा लोकांनी रक्ताचं पाणी करून प्रसंगी जीवावर उदार होऊन निर्माण केलेल्या या अमूल्य ठेव्याला असं कणाकणांनी लुबाडण्याचा काय अधिकार आहे आम्हाला? जिथे जातो तिथे स्वतःचा ठसा उमटवण्याची आमची धडपड हे ही लक्षात घेत नाही कि अरे ज्यांनी हे उभारलं त्यांनी कधी स्वतःचे नाव यावर कोरले नाही, आणि आपण खुशाल गावांसकट नामावली प्रसिद्ध करून मोकळे झालो. कशाबद्दल? कुठला पराक्रम जाहीर करायचाय? शत्रूच्या अस्त्र शास्त्रांचे घाव या दगडांना फुलासारखे वाटले असतील पण आपल्यावर कोरली जाणारी ही नवे त्यांना वाज्राघाताचे दुःख देत असतील. आज जर हे दगड सजीव झाले तर म्हणतील अरे जगातल्या सगळ्या तीर्थांत अंघोळी केल्या तरी आमच्यावर लागलेले हे डाग आम्ही कसे धुतले जाणार?
    दैव दुर्विलासाची एक एक पायरी आम्ही चढतोच आहोत. स्वतःची घरे अगदी ४-४ वेळा स्वच्छ करणारे आपण, या ठिकाणी गेलो की मात्र कोणी बघत नाही आणि मी टाकला कचरा तर काय फरक पडतोय असा विचार करून जिथे खातो तिथेच घाण, प्लास्टिक चा कचरा टाकून चालू लागतो. मुंबईची घाण साचून साचून शेवटी त्या मिठी नदीनी तांडव घातलेच. तिथे आपण राहतो म्हणून जाणवले तरी पण या स्मराकांवर घातलेले निसर्गाचे तांडव आपल्या कोडग्या नजरांना आणि बधीर मनाला कधी जाणवेल? परकीय राष्ट्रांचे बघा, त्यांची ऐतिहासिक स्मारके हजारो वर्षे जपून ठेवत आहेत. काही पडझड झालीच तर पुन्हा मूळ स्वरुपात आणण्यासाठी आकाश पातळ एक करत आहेत. मग आपल्याकडेच ही अनास्था का? रायगडाच्या पवित्र स्थानी या नतद्रष्टांची दारू पिऊन बाटल्या फेकायची हिम्मत होतेच कशी? आणि ते हि थेट सिंहासनाच्या जागेवर!!!!! लाज वाटली पाहिजे आपल्याला की आपण स्वतःला मराठी म्हणवून घेतो, शिवजयंतीला वर्षातून एकदा नव्हे तर दोनदा चौकाचौकात लाउडस्पीकरच्या भिंतींमधून पोवाडे वाजवतो. काय उपयोग आपल्या या शिवभक्तीचा आव आणण्याचा? अरे महाराजांचे आदर्श कधी बघितले नाहीत, तर आचाराने पाळणे दूरची गोष्ट, त्यांच्या जयंतीवरून वाद घालणारी माणसं आपण. काय फरक पडतो जर ती हिंदू पंचांगानुसार साजरी केली तर? कशाला हवी युरोपियन तारीख?

    मागे मित्रांनी एक गमतीदार किस्सा सांगितला, स्थळ आपल्या परिचयाचेच, किल्ले सिंहगड, कोणतासा शनिवार अथवा रविवार, किल्ल्यावर जोडप्यांची गर्दी. मित्राला कुठून बुद्धी / दुर्बिद्धी झाली देव जाने पण तो तिथे उपटला आणि जे काही वाक्य कानांवर पडले ते ऐकून वेडा झाला. एका जोडप्यात संवाद चालू होता. तो बिचारा आपल्या मोडक्या तोडक्या मातृभाषेत, मराठीत, तिला सिंहगडाची गोष्ट सामावण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. “you know , महाराजांना किल्ला घेणं तसं अवघड पडायला लागलं आणि मग त्यांनी तानाजीला बोलावलं” मित्र म्हणाला मी पुढचा ऐकू शकलो नाही. जेव्हा किस्सा मी प्रथम ऐकला तेवा मी पण हसत बसलो, पण थोड्याच वेळात मनात विचार आला, त्या बिचाऱ्याचा तरी त्यात काय दोष? त्यानी वयाच्या ५ व्या वर्षापासून हाच इतिहास ऐकला, आहे वाचला आहे. दुर्दैव आहे भारताचा कि आपल्या इतिहासाची गळचेपी जी ब्रिटिशांनी केली ती आजही चालूच आहे. अरे का नाही शिकवत आम्हाला तो दैदिप्यमान इतिहास, जो छत्रपती शिवरायांनी इथे महाराष्ट्रात घडवला, महाराणा प्रतापांनी भिल्लांच्या साथीत मेवाडच्या वाळवंटात उभारला. राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब, तात्या तोप्यांनी १८५७ साली घडवला, सुभाषबाबूंनी जपान मधून उद्घोशीला, भगतसिंग इत्यादी प्रभृतींनी पंजाबात धगधगत ठेवला, स्वातंत्र्यवीरांनी शत्रूच्या घरातून सोनिरी अक्षरात कोरला.

    कुठे आहे आमचा इतिहास? आजच्या इतिहासाच्या पुस्तकांतून दिसतात ती फक्त इटालियन, रशियन, फ्रेंच राज्यक्रांतीची थोडकी वर्णने, महाय्द्धांचे प्रसंग, औद्योगिक क्रांती, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अहिंसात्मक निदर्शने, का नाही शिकवला जात आम्हाला बाकीचा पण इतिहास? एकदा प्रयोग करून बघाच. आमचं हा जाज्वल्य इतिहास शिकवाच. मग बघा अवघ्या हिंदुस्थानातील ऐतिहासिक स्मारके पुन्हा जिवंत होतील आणि गतकाळच्या वैभवानी ओउन्हा झळकू लागतील.

  • कोणीच दोषी नाही बघ…..

    इतके दिवस यावर काही लिहिण्याचं टाळत होतो. प्रत्येक जण लिहितोच आहे. पण आता राहवत नाही. अत्यंत बिकट अवस्था असलेल्या शरीरानी अखेर साथ सोडली आणि ती देवाघरी गेली. मी तर म्हणीन सुटली. कित्येक वर्ष भिजत पडलेल्या इतर खटल्यांसारखा हिचाही खटला पडून राहणार. तब्येत सुधारली असती तरी तिच्या वाट्याला सामान्य जगणं आला असतं? “७ च्या आत घरात”ला अनुत्तरीत प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. तिच्या मित्रांनीच कशाला कुटुंबियांनी तरी स्वीकारली असती तिला? त्यांचा तरी काय दोष. सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यायला लावणाऱ्यांचे वंशज आम्ही. कसे स्वीकारणार तिला? इथे तर उघड उघड बलात्कार झालाय. अग्निपारीक्षेचाही संबंध येत नाही. परकीय आक्रमणांच्या वेळी बलात्कार करून बाटवलेल्या स्त्रियांना स्वीकारले नाही तर या एकट्या मुलीला कोणी स्वीकारले असते?

    ताई, सुटलीस बघ सगळ्या यातनांमधून. हे लोक खटला तरी काय चालवणार. आधीच्या खटल्यांचा तरी कुठे निकाल लावलाय. वर्षानुवर्ष तसेच पडलेत. ते नराधम निसर्गदत्त मृत्यूच सुख उपभोगून मारणार. तुझ्या शीलाला हात लावण्याचा अपराध करणारेही बहुदा याच सुखाचा उपभोग घेतील बघ. वर गेली आहेस, तिथेच बघ काही होतं का. किमान इथून हे मेले कि तिथे तरी योग्य शिक्षा होऊ दे त्यांना. इथून गेलीस आणि वाचलीस बघ स्वतःच्या स्त्रीत्वाची लाज वाटेल अश्या प्रश्नोत्तारांपासून. त्यांचे प्रश्न ऐकून पण तू विचार केला असतात अत्त्याचार सहन करून गप्प बसलो असतो तर कदाचित कमी त्रास झाला असता. वकिलांचा पण दोष नाहीईये बघ त्यात. १०० अपराधी सुटले तरी चालते त्यांना पण तो १ निरपराध फासावर जाता कामा नये. (अर्थात त्यांनी शिक्षा दिली तरी ती रद्द करायला वर बसलेलेच असतात.)

    सुरवातीला तुला वाटलं असेल चला प्रसारमाध्यमे तरी आपल्या बाजूनी उभी आहेत. पण लवकरच तुझा भ्रमनिरास झाला असता. तुझ्यावरच्या अत्त्याचारांचा त्यांनी TRP केला असता. १०० वेळा प्रत्येकानी येऊन तुला, तुझ्या घरच्यांना विचारला असतं, “ये सब आपके साथ हुवा; तो आपको कैसा लाग रहा है?” “तुला बोललं पाहिजे, तुझ्या भावना नक्की कळल्या पाहिजेत. नक्की तुला काय वाटतं.” “जरा details मे बता सकते हो exactly आपके साथ क्या क्या हुवा.” जो मित्र तुझ्या मदतीला उभा ठाकला होता, ज्यांनी तुझ्यासाठी बेदम मार खाल्ला त्याला पण विचारायला कमी केलं नसतं; “आपकी दोस्त के साथ ये सब हुवा है तो आज आप कैसा मेहसूस करते है?” अरे नालायाकांनो तुम्हाला काही लाज? ज्या बिचाऱ्याच्या मनाला तिला वाचवता न आल्याबद्दल असंख्य वेदना होत असतील, जो कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही, त्याला काय विचारताय. तुझा TRP झाला नाही वाचलीस बघ तू.

    हजारोंचा जमाव आला तुझ्या मदतीसाठी धावून, काळे कपडे, काळ्या फिती, काळे फोटो की असेल नसेल ते सगळं काळं करून आले. अरे लोकांनो पण तुमची मनं काळी झालीत त्याच काय करणार आहात? निषेध मोर्च्यावरून घरी जाताना दिसलीच एखादी फटाकडी पोरगी कि माना मोडेपर्यंत तोंड उघडी टाकून लाळ गाळत बघत बसणार. अचकट विचकट टीका टिपण्णी करणार. थोडी लाज वाटू द्या रे. अर्थात तुमचा दोष नाहीच तो. वर्षानुवर्ष तुमच्या आदर्श सिनेकालावान्तांकडून तेच बघताय. शिरीष कणेकरांनी एकदम बरोबर सांगून ठेवलाय की. जणू पुढचे सारे आयुष्य सुखाचे जावे म्हणून आपला एक संकेतिक चिन्ह म्हणून चित्रपटात अतीप्रसंग दाखवतात. अरे पण का? हि विकृती का दाखवावी लागते तुम्हाला?

    ते जाऊदे हो. आता तर नट्याच कपडे फेडायला अधिक उत्सुक असतात. मुळात फेडायला अंगावर आधी असतंच कितीसं. वीतभर कपडे पण नकोसे होतात. चित्रपटाच्या कथा ऐकतानाच विचारतात, बेडसीन न किसिंग सीन किती ते सांगा. मग माझी किंमत सांगते. अर्थात नट नट्यांचा तरी त्यात फारसं दोष नाहीचे. वास्तववादी चित्रपटांची मागणी प्रेक्षक करतात या नावाखाली निर्माते पण तेच बनवतात हो. मला खरच सांगा भारतातल्या कोणत्या शहरांमध्ये बायका वितभर कपड्यांच्या तुकड्यांवर फिरतात. एकावेळी ५-५ पुरुषांबरोबर संबंध ठेवतात? अर्थात परत दोष न निर्मात्यांचा न प्रेक्षकांचा. प्रत्येक जण दुसऱ्याकडे बोट दाखवतो. निर्माते म्हणतात प्रेक्षक मागतो, प्रेक्षक म्हणतात निर्माता दाखवतो.

    तुझ्या तब्येतीची चौकशी करायला झाडून सगळ्या नेत्यांनी या न त्या प्रकारे हजेरी लावली. आजिबात विश्वास ठेऊ नकोस त्यांच्यावर. २६० लोकनेते कोणाची तरी तुझ्यासारखीच अवस्था केलेली असूनही त्या खुर्च्यामध्ये जाऊन बसलेत. ढोंगी लोकांना लाजा पण वाटत नाहीत. उघड उघड यादी देतात आमच्यावर असलेले गुन्हे म्हणून. द्यावीच लागते म्हणा त्यांना. निवडणूक आयोगाचा नियमच आहे. पण असा नियम करणार नाहीत ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना निवडणूक नाही. शेवटी जगाचा नियम आहे. जोवर गुन्हा सिद्ध होत नाही तोवर आम्ही निरपराध असतो. त्या नेत्यांचा पण दोष नाहीचे. हे सगळे गुन्हे केल्याशिवाय त्यांना कोणी तिकीटच देत नाही ग निवडणूक लढवायला. नेता होण्याची एन्ट्रन्स टेस्ट आहे असंच म्हण न हवं तर.

    कोणाकोणाचे दोष नाही याची यादी तरी तू नी मी किती मोठी करत बसणार? तसा तुला स्वसंरक्षण जमलं नाही यात तुझाही दोष नाहीये आणि मी इथे यादी करत बसण्यापेक्षा दुसरं काही करू शकत नाही यांत माझाही काहीच दोष नाहीये.

  • बदल

    आपल्या कडून अनपेक्षितपणे घडलेल्या गोष्टींचा पुढे काय परिणाम होईल याची कधी कधी आपल्यालाच कल्पना येत नाही. त्या वेळी खरतर ती कृती खूपच क्षुल्लक असते, म्हटलं तर नगण्य. आपल्याला माहितीही नसतं आपल्याकडून काय झालाय. आणि आपण पुढे निघून जातो. पुन्हा त्याबद्दल विचारही येत नाहीत. पण त्यानंतर होणाऱ्या घटना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत.

    जसा काळ पुढे  जातो आपली मतं निर्माण होतात, मग ती सामाजिक असोत, राजकीय असोत अगदी कौटुंबिक देखील असोत. पण ती मतं तयार होताना ज्या परिस्थितीत तयार होतात, पक्की होत जातात, ती परिस्थितीची बीजं आपणच कोठेतरी त्या नकळत घडलेल्या घटनेत पेरलेली असतात हे आपल्या लक्षात देखील येत नाही. मनात त्या परिस्थितीबद्दल तेढ निर्माण होते आणि आपण त्यापासून दूर जाऊ लागतो.
    अगदीच थोडे असतात ते असे अगदीच थोडे असतात जे परिस्थिती बदलू बघतात. आणि अशांच्याच प्रयत्नातून असे काही तयार होते. बघितला तर अगधी छोटं पण योग्य प्रसार झाला तर अत्यंत प्रभावी. बघा तुम्हाला पटतंय का??
  • ८ वर्षाचे चरित्र….

    या लेखाच्या सुरुवातीलाच मला प्रांजळ पणे सांगावे वाटते कि मला कोणावरही वैयाक्क्तिक टीका करायची इच्छा नाही. पण लिखित स्वरुपात काही समोर आले म्हणून हे लिहावे वाटले. आज काही पुस्तके मागवावीत म्हणून इंटरनेटवर शोधात होतो, अचानक पणे पुस्तक समोर आले ते श्री राहुल गांधी यांच्या चरित्राचे. त्यांनी कार्य केले यात वाद नाही, सन २००८ पासून ते लोकसभेचे सदस्य आहेत. साहजिकपणे त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काम केले असेलच. शिवाय कोंग्रेस पक्षाचे युवा नेते आहेत, शिवाय कार्यकारी मंडळात मनाच्या आणि प्रतिष्ठेच्या पदावर आहेत.

    त्यांच्याबद्दल पुस्तक लिहिले जावे याबद्दल माझे काही म्हणणे नाही पण सन २००८ ते २०१२ या केवळ ४ – ६ वर्षांच्या कार्यावर चरित्रलेखन करणे कितपत योग्य वाटते? राहुल यांच्या मातोश्रींचे चारित्र्य लिहिले तर ते निश्चितच योग्य ठरेल कारण आज त्या इतके वर्ष भारतीय राजकारणात सक्रीय आहेत आणि राजीवजींचा वारसा अगदी समर्थपणे पेलत आहेत. अनुभव समृद्ध अशी कारकीर्द आहे.

    चरित्र लेखनासाठी किमान १५ – २० वर्षांची कारकीर्द असावी असे माझे वय्यक्तिक मत आहे. या कालावधीत चरित्रनायकाच्या मातांना निश्चित दिशा मिळालेली असते. ठळकपणे दिसतील अशी गुणवैशिष्ठे समोर आलेली असतात. कारकीर्दीमध्ये ठोस असे काही कमावलेले असते. मैलाचे दगड पार केले जातात. आज राहुल गांधी तरुण आहेत. अजून खूप वर्ष कारकीर्द बाकी आहे. निश्चित ते काही खास कार्य करतील. पण या आधीच चरित्र लिहिले तर नंतरच्या कार्याला न्याय मिळणार नाही. आत्ता लिहिलेले चरित्र चूक आहे अथवा त्यात काही कमतरता आहे अशातला भाग नाही पण पुढे होणाऱ्या घटना अत्यंत महत्व असू शकते, भारत राष्ट्राच्या दृष्टीनी. राहुल गांधींच्या कारकीर्दीच्या दृष्टीनी. आज राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून बघितले जाते. त्यांच्या भविष्यातील त्या कार्याची दखल कशी घेणार.

    चरित्र लिहिले याबद्दल आक्षेप नाही पण लेखकांनी प्रकाशन करण्यासाठी थोडे थांबायला हवे होते. कदाचित अजून काही महत्वाचे घटनाक्रम त्यात आले असते. भारतीय राजकारणाला मिळणाऱ्या काही अजून वळणांचा उल्लेख त्यात आला असता. अजून काही वर्षांनी पुन्हा चरित्र लेखनाचा लेखकाचा त्रास वाचला असता. आणि आपल्याला एक परिपूर्ण जीवनालेख दाखवणारे उत्तम चरित्र वाचायला मिळाले असते.

  • कसले हे नियोजन?

    भारताच्या नियोजन आयोगाच्या कृपेनी भारताच्या शहरात राहणाऱ्या लोकांना नवीन ओळख मिळाली आहे. ही ओळख आहे श्रीमंतीची. होय, तुम्ही दिवसाला २९ रुपये खर्च करता का? मग तुम्ही श्रीमंत आहात. तुम्ही दिवसभरात दोन वेळचं जेवता? होय तुम्ही श्रीमंत आहात. तुम्ही दोनदा चहा पिता? होय तुम्ही श्रीमंत आहात. नियोजन आयोगाच्या कृपेनी आज भारतातील दारिद्र्यारेशे खालील माणसे खूप कमी झाली असतील निश्चित. हो आणि हे आकडे आहेत शहरातील लोकांसाठी. कदाचित खेड्यात लोकांनी जर दिवसाला ५ रुपये खर्च केले तरी देखील ते श्रीमंत म्हणून मिरवू शकतील. म्हणे शहरांमध्ये ५ रुपयात भाकरी, ३ रुपयात पोळी, ५ रुपये दिले तर भाजी मिळते. मायबाप सरकार कृपा करून अशा दुकानांची यादी तरी जाहीर करावीत. मग खरच जर २९ रुपयात जगता आला तर उरलेले पैसे आम्ही तुमच्याच कंपन्यांच्या दारूवर उडवू म्हणजे तुम्ही अजून श्रीमंत व्हाल. मायबाप सरकार, या नियोजन आयोगाला सामान्य माणसाच्या तर्फे काही प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी. नियोजन आयोग हे विसरला का की माणसाला अन्नाव्यतिरिक्त वस्त्र आणि निवार्याची सुद्धा मुलभूत गरज आहे. या २९ रुपयात आम्ही घरभाड आणि कपड्याचा खर्च कसा बसवावा मालक? झालंच तर रातच्याला घरामध्ये दिवाबत्ती करावी लागते. त्याच्यासाठीची काही सोय लावलीये का हो मालक? मालक जरा सांगा नं, आयत्यावेळी काही झाला न इस्पितळात जावा लागला तर त्याचा खर्च कुठून करायचा हो?
    असेही आम्हाला आता ही दुकाने शोधावी लागणारच आहेत की. तुम्ही आम्हाला एकच सिलेंडर देणार आहात स्वयंपाकाला. तो जर आयत्या वेळी संपला तर आमची जी धावाधाव होणार आहे ती टाळण्यासाठी अशा स्वस्त आणि मस्त दुकानांमध्ये जाऊन जेवानेच आम्हाला सोयीचे वाटणार आहे. अगदीच सणाचा गोडधोड आपला घरी करावा आणि ते देखील जर सरकारनी सणासुदीसाठी २९ रुपयांव्यातीरिक्त काही वर्खार्चास रक्कम दिलीत तर. सिलेंडर चा काळाबाजार तुम्हाला थांबवता येत नाही म्हणून आम्हाला का त्रास देता तुम्ही?तुम्ही म्हणाल ते पैसे देतो नं त्या सिलेंडरचे? आणि रीतसर परवानगी घेऊन तर २ घेतोय. आता पुरात नाहीत तुम्हाला सिलेंडर तर नवीन बनवून घ्या नं का आपल्या देशातला लोखंड संपलं सगळं? सगळे कर देतो तुम्हाला, अगदी बिन बोभाट. तरी तुमचे सगळे निर्बंध आमच्यावर. जे लोक फुकट ग्यास वापरतात, कर देत नाहीत, वीज चोरी करतात त्यांना मात्र काही त्रास नाही. मायबाप काहीही उपाय करू नका यावर तुम्ही, नाहीतर आत्ता २९ रुपये तरी देताय तुम्ही उपाय शोधलेत तर आम्हाला कदाचित ४-५ रुपये खर्च करा म्हणून सांगाल…..

  • पडलो तरी आमचे नाक आहे ते वरच…..

    गेले काही दिवस भारताच्या इज्जतीचे पंचनामे लगोलग जगभर प्रसिद्ध होत आहेत. कारण तर सगळ्यांनाच माहिती आहे. बहुचर्चित (अर्थातच या सगळ्या प्रकारांनी) राष्ट्रकुल स्पर्धा. ज्या आपल्याकडे होणार हे खूपच आधी समजले होते (सुदैवच म्हणायाचे). मग आपले महारथी कलमाडी साहेब पुढे आले आणि सगळे संयोजनाचे खा ते (खाते) आपल्या समर्थ हातांत घेतले. मग सुरु झाली ती राष्ट्रकुल स्पर्धांचे शिवधनुष्य पेलण्याची तयारी. पाठीशी होता राष्ट्रकुल युवा स्पर्धांचा दांडगा (?) अनुभव. पटापट सूत्रे हलली. निविदा सुटल्या. कामांची विभागणी झाली. (नक्की कामांचीच?) आणि भल्या मोठ्ठ्या व्यवस्था नामक गाड्याला गती आली. अर्थात कूर्म गतीच होती ती यात वादच नाही. पण कूर्म का होईना गती तर मिळाली.


    हळू हळू दिवस कमी होत होते. कामांच्या फाईली सरकत होत्या. क्रीडांगणे, राहण्याच्या सदनिका आकाराला (?) येत होत्या. मग अचानक लक्षात आला की दिवस फारच कमी राहिलेत आणि कामा तर हवी तशी संपलीच नाहीत. मग लगेच बैठका झाडल्या. भराभर सूचना गेल्या कामे लवकरात लवकर पूर्ण करा. अंतिम मुदती सुधारून ठरवण्यात आल्या. मात्र कामगार आणि पैसा मात्र काही वाढला नाही. परिणामस्वरूप कामे उरकायच्या मागे मंडळी लागली. दिवस जवळ येत होते तसे कामे आकाराला येताना आता किमान दिसत होती. पण शेवटी भारत देशात जे होणे तेच झाले. लक्षात असे आले की अरे पुढचे प्रवेशद्वार तर मस्त सजलंय पण बाकी दारांना मात्र अजून गीलावाच झाला नाहीये. म्हणजे सौंदर्य स्थळे तर उत्तम सजली पण आवश्यक सोयी सुविधा, क्रीडांगणे खेळांसाठी तर तयारच झाली नाहीयेत. परदेशी खेळाडूंच्या राहण्याच्या जागा अजून बऱ्याच अपूर्ण आहेत. पुन्हा एकदा बैठका झाल्या, मंत्री गट, अधिकारी गटांच्या भेटी झाल्या. पाहण्या झाल्या. पुन्हा सुधारित मुदती आल्या. थोड्या प्रमाणात साधनसामुग्रीत वाढ झाली. पुन्हा कामे नेटानी सुरु झाली.


    अचानक एके सकाळी लोकांनी त्यांचे दूरदर्शन साचा चालू केला तर बातमी झळकली की राष्ट्रकुल स्पर्धांसाठीच्या तयारीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. मग पुन्हा तीच नेहमीच्या घटना सुरु झाल्या. चौकशी समिती, मंत्र्यांच्या बैठका आणि बरेच काही. कलमाडी साहेब आपले छातीठोकपणे सांगत होते की असे काही नाही झालेले सारे काही आलबेल आहे. सर्व तयारी नियोजनानुसार चालू आहे आणि या स्पर्धा यशस्वी होणार आहेत. पण बिचार्यांवर विश्वास ठेवायला कोणी तयारच होत नाही. त्यातच भारताचे परम मित्र भारतातील हस्तकांना हाताशी धरून सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करतात. नेहमीच्याच साधनांनी हो. बॉम्बस्फोट आणि परदेशी नागरिकांवर गोळीबाराच्या घटना स्पर्धा स्थळा जवळ होतात आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या संघटना सुरक्षेच्या परीक्षणासाठी डेरेदाखल होतात.


    इतका सगळा झालेला की कमी होतं तर स्पर्धांसाठी बांधण्यात आलेला पादचारी पूल कोसळतो. त्याच दुपारी भारत्तोलन; म्हणजेच मराठीत वेटलिफ्टिंग हो; ज्या ठिकाणी होणार त्या सभागृहाचे छत कोसळते. आणि समोर येतो तो बांधकाम या बाबतीतला हलगर्जीपणा आणि स्पर्धांच्या अगदी १० दिवस आधीपर्यंत अपूर्ण असलेली खेळाडूंच्या राहण्याच्या ठिकाणची गैरसोय. अनेक सदनिका अर्धवट झाल्यात, स्वच्छतेच्या नावानी आनंदी आनंदच आहे. भारताच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या पान तंबाखूच्या पीचकाऱ्यांची नक्षी सगळ्या सदनिकांमध्ये काढली आहे. गाद्यांवाराच्या चादरी तर कोणे एकेकाळी पांढऱ्या असतील अशा जाणवत होत्या. त्यावर बरेच डाग पडलेले होते.
    दरम्यानच्या काळात निसर्गानी पण आपले हात साफ करून घेतले. आयतीच सारी माणसे कोंडीत सापडलेली त्याला. धुंवाधार पाऊस पडला आणि दिल्लीत कधी नव्हे तो भला थोरला पूर आला. रस्ते पाण्याखाली गेले.पुन्हा एकदा बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उभा करायला क्रीडानागरीतला कोराकार्करीत रस्ता पार खचून गेला. सदनिकांमध्ये पाणी साचलं, दिल्लीत डेंग्यूची साथ पसरली. हि सगळी वृत्ते परदेशी वृत्तामाध्यामांतून प्रसिद्ध झाली आणि अनेक अग्रमानांकित खेळाडूंनी स्पर्धेतून माघार जाहीर केली. इतकं सगळं झालं तेवा कुठे पंतप्रधानांनी मध्ये हस्तक्षेप करून बैठक घेतली, स्वच्छतेचा, सुरक्षेचा, अपुर्या कामांचा सगळ्या बाबींचा आढावा घेतला. आणि बाकीची कामे २४ ते ४८ तासात पूर्ण करायला सांगितली.


    आता मला सांगा जे इतक्या वर्षात जमला नाही ते १-२ दिवसात होणारे का? आणि इतकं सगळं झालं तरी कलमाडी साहेब आपले तेच पालुपद लावून आहेत. “सारे काही नियोजित कार्यक्रमानुसार चालू आहे, स्पर्धा नक्की यशस्वी होणार.” नाही म्हणायला राष्ट्रकुल स्पर्धांच्या अधिकाऱ्यांनी थोडा अनुकूल विचार मांडलाय; तयारी समाधानकारक आहे म्हणून. पण एकंदरीत परिस्थिती आणि वृत्ते बघता सामान्य जनतेचे मत तर ठाम झालंय. एकंदरीत परिस्थिती अवघड आहे आणि या सगळ्यांनी आपापली खा ती उत्तम सांभाळून देशाची शान जगात पार धुळीला मिळवली आहे. आणि आपल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे “बघा बघा बघा सगळी कामे नित चालू आहेत. १-२ दिवसात बाकी कामे संपतील…आम्ही कितीही जोरात पडलो तरी आमचे नाक आहे ते वरच…”