Category: कविता

  • किनारा

    दूर अजुनी किनारा
    ही ओढीची जलधारा
    कसे जावे पैलतीरा
    पाठ फिरावी हा वारा

    त्या पैलतीरावरी
    वाट साजण पाहतो.
    त्या एका भेटीसाठी
    सारा जीव तो झुरतो.

  • देवा, नाही झाला घोटाळा?

    देवा मला सांग अगदी खरी गोष्ट एक,
    बेट्या माणसाला का नाही बनवलास नेक?

    मारे दिलीस बुद्धी त्याला तू सकस,
    पण का दिलास मनात आकस?

    कणभरही स्वतःची प्रगती नाही,
    दुसऱ्याची आजीबात पाहवत नाही.,

    भ्रष्ट हावरट एकजात हा माणूस सगळा,
    वरून बगळा आतून पक्का कावळा काळा.

    नाही पडत का हा प्रश्न कधी तुला?
    माणसाला बनवून नाही झाला घोटाळा?

  • कविता

    कविता खरंच अशी ठरवून होत नाही,
    लगेच जमायला ती काही २ + २ नाही.

    मनातल्या भावनांना कवितारुप येणं,
    हे तर त्या माता सरस्वतीच देणं.

    कधी एकामागून एक येते लाट,
    कधी मनातला चातक बघतो वाट.

    कवितेला असते कधी नाजूक किनार,
    तर येते कधी परिस्थितीची वज्रधार.

    जपलं जातं कधी कधी गुलाबी स्वप्नं,
    तर कधी व्यक्त होतं भयाण दुःस्वप्न.

    तरीही कविता असते मनाच्या जवळ,
    आनंदाने भरून जाते आपली पूर्ण ओंजळ.

  • हसू आणि आसू

    त्या दिवशी दुरवर

    एकटाच फिरताना,

    सागरावरून येणारा

    गार वर पिताना,

    ओठी होते हसू तुझी

    आठवण काढताना,

    नयनी मात्र आसू

    हा विरह सोसताना…

  • सब कुच चलता है

    स्वर्गस्थ पुण्यात्मे रोज अश्रू ढाळत आहेत

    प्रिय मातृभूमीची दैना बघून अस्वस्थ आहेत,

    पण इथे आम्हाला आज ‘देशसे क्या लेनादेना है’

    फक्त आमचा खिसा भर ‘यहा सबकुछ चलता है’

    कुठल्याही क्षुल्लक गोष्टीची इथे ब्रेकिंग न्यूज होते

    मुंबई मे बडा भूचाल ही बातमी खाली स्क्रोल होते,

    कशात काही नसतं हो ‘हमको सिर्फ TRP बढाना है’

    फक्त आमचा खिसा भर ‘यहा सबकुछ चलता है’

    इथे वजनाशिवाय फाईलीला पाय फुटत नाही

    कामे होताच नाहीत जोवर हात ओले करत नाही,

    त्यांची इच्छा नसते हो ‘घरवाली मान्गती है’

    फक्त आमचा खिसा भर ‘यहा सबकुछ चलता है’

    चुकांशिवाय कुठलाच कागदपत्र बनत नाही

    महाराष्ट्राचं नाशिक UP त गेलं तरी हरकत नाही

    जाब विचारला तर उत्तर एकाच ‘क्या इतनाही काम है?’

    फक्त आमचा खिसा भर ‘यहा सबकुछ चलता है’

    नेत्यांनी तर देशाला आज बाजारात उभे केले

    म्हणच आहे न कुंपणानेच शेत खाल्ले ,

    तसा त्यांचा दोष नाही हा ‘ये सिस्टम ही खराब है’

    फक्त आमचा खिसा भर ‘यहा सबकुछ चलता है’

    या सर्व काळोखात बारीक तिरीप दिसते आहे

    उज्वल भविष्याचं किमान स्वप्न तरी पडत आहे,

    काहींना आता पटू लागलं ‘यार ये सब बदलना है’

    आम्हाला तो देश हवाय ‘जहा सिर्फ अच्छा ही चलता है’

  • न येणारं उत्तर

    सुचतं कधीतरी कोसळत्या प्रपातासारखं,
    कधी अगदीच हळुवार नाजूक फुलासारखं.

    घेत भराऱ्या गगनात कधी उंच उडणारं सुचतं,
    कधी मनाच्या कोपऱ्यात खोल खोल दडलेलं सुचतं.

    कधी सुचतं जणू निळाशार संथ तलाव,
    तर कधी सुचतं वादळात सापडली नाव.

    सुचतं कधी सागरासारखं उग्र अन धीरगंभीर,
    तर कधी लहान मुल जणू अवखळ सैरभैर.

    आत्ता सुचतंय बघ कसं अलगद पडणारं पीस जणू,
    कसं सुचतं याचा उत्तर देताना मी काय म्हणू?