Adi's Journal

Pieces of my thourhgs

बंधमुक्त

माहित नाही काय कारण आहे, पण कित्येक वेळा मला खूप काही लिहावसं वाटतं पण एक विषय म्हणून डोक्यात पक्का होत नाही. अनेक विषयांचे असंख्य तुकडे तुकडे गर्दी करून असतात डोक्यात. कित्येकदा समोर असलेल्या कागदांचा पोत, रंग तर कधी नवीनच घेतलेले पेन. असं काही न काही मला लिहायला प्रवृत्त करत असतं पण मन आणि डोकं आजीबात साथ देत नाही.

नुकतच सादत हसन मंटोचं पुस्तक वाचनात आलं. त्यात तो स्वतःच्या गोष्टींबद्दल लिहिताना म्हणतो की गोष्टी माझ्या खिशातून तयार होतात. त्या माझ्या डोक्यात मनात कधीच नसतात. त्यांना मी खिशात घेऊन फिरतो. लिहायला बसतो तेव्हा मन आणि डोकं अगदी कोरं असतं. पण कागदावर पेन टेकलं रे टेकलं कि आपोआप गोष्टी खिशातून बाहेर येऊन कागदावर उमटतात. आज माझंही तसंच काहीसं झालंय. नुकतेच छानसे रिसायकल्ड कागद आणलेत. त्यांचा रंग आणि पोत वेगळाच आहे. थोडेसे पिवळसर असलेले ते कागद सध्या रोज मला खुणावतात. त्यामुळे सारखं काही तरी लिहावसं वाटतं.

कित्येक दिवसांनी आज मी कागद पेन घेऊन लिहितोय, नाही तर दर वेळी आपलं कॉम्पुटर कीबोर्ड वर बोटं फिरवणं चालू असतं. पण आत्तासुद्धा मनात पक्का विषय नाही. विचारांची रेल्वे सुटली आहे. गंतव्य माहिती नाही. वाटेत लागतील त्या स्टेशन वर मनात आला तर थांबायचं, पुढच्या वाटेनी खुणावलं कि गाडीनी फलाट सोडायचा अशी परिस्थिती आहे. हे माझ्या ब्लॉगवर किंवा कुठे प्रकाशित करेनच असाही नाही. आजचा हा प्रवास फक्त माझा आहे, माझ्यापुरता आहे. (तुम्ही इथे हे वाचताय म्हणजे अर्थातच परिस्थिती थोडी बदलली आहे म्हणायच)

कुठलाही विषय नसणं किती चानाहे नाही? एका प्रकारे स्वातंत्र्यच. “येऊ का आत?” असं विचारत एखादा विचार मनात डोकावलाच, तर त्याचं बिनधास्त स्वागत करता येतं. विचारपूस करता येते. विषय आला कि एक प्रकारच बंधन आलं. एक चौकात बांधली गेली आणि अशा आगंतुक पाहुण्यांना वाटा बंद झाल्या. निघालेल्या रेल्वेला शेवटचं स्टेशन लागलं, मार्ग आखून दिला गेला आणि वाटेतले टप्पे सुद्धा ठरवून टाकले. अहो इतकाच काय, प्रवासाची वेळ सुद्धा बांधली गेली. पाठीवर एका पोतडीत समान भरायचं आणि अज्ञात प्रदेशात भटकंती करायची काय मजा असेल याचा पुसटसा अंदाज मला आज हे लिहिण्यातून येत आहे. काहीच प्लान नाही. कुठे जायची घाई नाही. जिथे असू तिथला भोवताल डोळे भरून पहायचा, मन तृप्त झालं की मनात येईल ती दिशा पकडून पुढील प्रवास सुरु. खाराचाशी एखादी ट्रीप अगदी परदेशात नाही तर निदान आपल्याच देशात कुठेशी करायला हवी. हे backpack trip च वेड Europe मध्ये बरच आहे. बॅग पाठुंगळी मारायची अन मनात येईल तिकडे निघायचं. कसलं वेगळच थ्रील आहे यात.

समोरचा कागद बघून खरं तर मला आजीबात इच्छा नाहीये हे लिखाण थांबवायची, पण रोजच्या व्यवहारांना आमच्यासारख्या हौशी लेखकाच्या आयुष्यात फाटा थोडाच मारता येतोय? शनिवारची सुट्टी असली तरी वीकेंडची म्हणून खूप कामं साचली आहेत. पण पुन्हा हेहीत्गुज नक्की होणार. तेव्हा परत भेटूच.

Related Posts

Leave a Reply