Author: Adi Sathe

  • जात

    जात म्हणजे जात म्हणजे जात असते,
    तुमच्या आमच्या मनातनं ती कधीच जात नसते.
    कारण, जात म्हणजे जात म्हणजे जात असते.

    मुल जन्मल्याबरोबरच त्याला जात येते,
    त्याच्या कपाळीचा शिक्का होऊन बसते,
    खरं तर त्याला काहीच कळत नसते,
    पण, जात म्हणजे जात म्हणजे जात असते.

    काळाबरोबर त्याचं वय वाढत जाते,
    जातीची त्याला नेहमीच सोबत असते,
    शिक्षणासाठी तर जाताच पहिली लागते,
    कारण, जात म्हणजे जात म्हणजे जात असते.

    शिक्षण संपवून पुढे त्यांनी नोकरी धरली,
    तिथेही जातीनेच आपली वर्णी लावली,
    सोयरीकीला तर वाढू जातीचीच लागते,
    कारण, जात म्हणजे जात म्हणजे जात असते,

    नोकरी सोडून पुढे तो राजकारणात पडतो,
    जातीमुळेच तिथेही तो पटापट वर चढतो,
    जातीमुळे कोणीच त्याला नाडत नसते,
    कारण, जात म्हणजे जात म्हणजे जात असते,

    हळू हळू वयाबरोबर शरीर थकून जाते,
    जात मात्र त्याला घट्ट चिकटून असते,
    अखेर त्याच्याबरोबरच तीही मातीत जाते,
    कारण, जात म्हणजे जात म्हणजे जात असते,
    एकदा चिकटली की ती मेल्यावरच जाते.

  • मौन

    ओठांचे मिटले असणे जरी समान ते दिसते
    कित्येक भिन्न परी अर्थ आहे त्यात दडले.
    मूक संमती असे कधी, कधी असे हतबलता,
    घट्ट मिटल्या ओठांमागे दाबला कधी हुंदका.
    डोळे येती धावून मदती बऱ्याचदा ओठांच्या,
    मूक कबुली देऊन जाती मनातल्या भावांच्या.

  • तो आणि ती…

    तो नि ती, रम्य सागर किनारी,

    सोबत फक्त खळाळत्या लहरी.

    हाती हात अन् डोके त्याच्या खांद्यावर,

    दोघातला निःशब्द संवाद सागरतीरावर.

     

    विश्वासाच्या आणाभाका दिल्या,

    कधी रुसवे फुगवेही झाले.

    तुझ्या मिठीत समावताच जणू,

    मनी सागराचे उधाण आले.

     

    सारेच चालू होते निःशब्द,

    फक्त मनांचाच तो संवाद.

    क्वचित कधीतरी घालते मन,

    चुकार अश्रूंना साद.

     

    त्याचा तिचा मूक संवाद,

    असाच अखंड चालतो.

    कधी उधाण तर कधी शांत,

    जणू सागरच मनी आंदोलतो.

  • क्षण

    क्षणाक्षणाला क्षण हा सरतो
    हाती केवळ भ्रम तो उरतो.
    कधी भविष्यातील स्वप्नांचा
    कधी भूतातील भुताचा असतो.

  • आजीची गोष्ट

    आजीची गोष्ट

    मी लिहिता झालो त्याचं कारण मला काहीकेल्या आजतागायत सापडलं नाहीये. गेली ६-७ वर्ष सुचेल तेव्हा सुचेल ते लिहीत गेलो. बऱ्याचदा धागा अर्धवट तुटायचा, कधी वीण पूर्ण जमायची. पण मी वाचता, ऐकता झालो त्याचं कारण म्हणजे आमची आजी. माझ्या आयुष्यात गोष्टींचा कवितांचा प्रवेश झालं तो आजीच्या तोंडूनच. अगदी लहानपणी मला वाटायचा, “आजी कित्ती हुशार आहे नाही. इतक्या गोष्टी पाठ आहेत तिला.” अन् ती सांगायची पण इतकी रंगवून की शेवट येई पर्यंत उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली असे. राम, कृष्ण, इसापनीती अशा पारंपारिक गोष्टींबरोबरच ती बाकीच्याही गोष्टी सांगत असे. त्यात राजा राणी, जंगल, राक्षस असं काही नसे. आमच्यासारख्याच छोट्या मुलांच्या गोष्टी असत. कधीही तिनी पुस्तकातून गोष्टी वाचून दाखवल्याचं मला आठवत नाही.

    रविवारच्या मुलांच्या पुरवणीत पहिल्यांदा आजीचा नाव वाचला तेव्हा लक्षात आलं, अरे या गोष्टी आजीनी पाठ केलेल्या नाहीयेत, ती स्वतःच लिहिते. दर रविवारचा पेपर उघडून बघायची घाई झालेली असायची. गोष्टीखाली आजीचं नांव दिसलं रे दिसलं की अधाशासारखी मी ती वाचून काढायचो. पण जर नाव नसेल तर मात्र हिरमोड हून मी त्या पपेरला हातही नाही लावायचो. आजी कधी लिहिते याकडे लक्ष ठेवायला लागलो. तिचं नाव पेपर मध्ये वाचायला बघायला मोठी मजा वाटायची. पुढे केवळ आजीनी सांगितल म्हणून बाकीच्या गोष्टीही वाचू लागलो आणि हळू हळू वाचनाची आवड लागली.

    मला आजही आठवतं, एका उन्हाळ्याच्या सुटीत; पाचव्या सहाव्या इयत्तेची असेल कदाचित; आजीच्या कपाटात एका वेगळ्याच रंगाचा कव्हर असलेला पुस्तक दिसलं. चांगला मोठ्ठ होतं. सहज उत्सुकता म्हणून हातात घेतला. त्यावर असलेल्या पिवळ्या रंगाच्या बाईंडिंगचं फारच अप्रूप वाटत होत. चालून पाहू काय आहे ते म्हणून उघडलेलं पुस्तक त्यानंतर मान पाठ एक करून ३ दिवसात संपवूनच मी ठेवलं. आयुष्यात वाचलेलं पाहिलं मोठं पुस्तक, ‘श्रीमान योगी’. त्यानंतर आजीच्या मागे लागून त्यातली कित्येक पुस्तक मी वाचून काढली.

    आजीही लिहीत होतीच. आजी केळवल मुलांच्याच गोष्टी लिहिते हा माझा समज कुठल्याश्या बुधवार गुरुवारच्या पेपरच्या पुरवणीनी साफ चुकीचा ठरवला. आजीची एक कुठलीशी कविता आणि एक लेख त्या पुरवणीत छापून आला होता. भोवताली घड्या कुठल्याही गोष्टी आजीच्या नजरेतून सुटत नसता. कुठे बारीकसं जरी कथाबीज दिसलं की पुढच्या दोन दिवसात आजीची गोष्ट तयार असे. घडणाऱ्या घटना इतक्या बारकाईनी अभ्यासता येत की नक्कीच एखाद्या पेपरमध्ये स्तंभ लिहू शकली असती पण तिने तिचं लिखाण आजपर्यंत केवळ छंद म्हणूनच जपलं.

    तिच्या राम-कृष्णांच्या गोष्टीतही फारशी चमत्कृती नसते. केवळ अवतार म्हणून कुठलेही चमत्कार तिनी गोष्ट म्हणून सांगितले नाहीत. त्यांच्या कृतीतून दिसणाऱ्या त्यांच्या चातुर्य, शौर्य, लोकांना बरोबर नेण्याची त्यांची हातोटी अशा चांगल्या गुणांबद्दल आजी सांगायची. पण कोणताही पुरावा असल्याशिवाय आजीनी राम-कृष्णांच्या गोष्टीसाठी कोणत्याही घटना घेतल्या नाहीत.

    कितीतरी वेळा आजी शिबिरांमध्ये जाऊन गोष्टी सांगायची. पण आता वयापरत्वे असं कुठे जाणे होत नाही. पण नवनवीन गोष्टींना काही अंत नाही. पूर्वी गोष्टी, कविता, लेख लिहून झाले की ते वृत्तपत्रांच्या कार्यालयात पोचवायची जबाबदारी आम्हा नातवंडांवर असायची. पण आता दुसऱ्या शहरात असल्यानी पोस्ट खाते इमाने इतबारे आजीची सेवा करतं. आज जी काही थोडफार वाचनाची आवड आहे. सुचेल तसे जे लिहीत असतो तो केवळ आणि केवळ आजीचं आशीर्वाद. तिने अजूनही आमच्यासाठी अशाच चं गोष्टी लिहीत राहाव्यात हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • तात्या

    तात्या, परखड रोखठोक पण काळजाच्या जवळच्या गोष्टी निघाल्या की तितकाच हळवा होणारा. आपले अंतरंग काहीही हातचे नं राखता आपल्या लिखाणातून मांडणारा. वास्तविक तात्याला कधीच प्रत्यक्षात भेटायचा योग आला नाही. फेसबुकावर ओळख झाली तीच मुळात एका उत्तम लेखामुळे. त्या क्षणापासून असा एकाही लेख तात्यानी लिहिला नसेल जो मी वाचला नाहीये. (जुने लेख सोडून द्या तात्या…). माझ्या भावविश्वात आढळ कोपरा निर्माण केलाय तात्या.

    आज स्पष्ट कबुल करतो; मला तात्याचा हेवा वाटतो. आपण जळतो साला त्याच्या नशिबावर. जळतो त्याच्या मोजक्या शब्दात व्यक्तिचित्र उभा करायच्या हातोटीवर (थोड्या क्लुप्त्या मला पण सांगा की तात्या). जळतो त्याला लाभलेल्या थोरामोठ्यांच्या सहवासाबद्दल, त्यांच्याकडून मिळालेल्या कौतुकाबद्दल, आशिर्वादाबद्दल वाचतो तेव्हा तर पार जाळून कोळसाच होतो.

    तात्या, एकच मागणं आहे. हात मस्तकी ठेवून आशीर्वाद द्यावा. दिग्गजांच्या पायी मस्तक ठेवल्याचं समाधान मिळेल. पु लंनी रावसाहेब आत्ता लिहिलं असतं तर मी नक्की म्हटला असतं रावसाहेब म्हणजे आपणच. “शौक करायच्या जागी शौक करायचा. उघड करायचा. शिवराळ बोलना पण कधीही अश्लील किंवा अश्लाघ्य नं वाटणारे.” त्या भाषेशिवाय तात्या अभ्यंकर मनाला मान्यच होत नाही.

    तात्या.. असेच लिहिते राहा. बस आता लवकर दर्शनाचा योग येऊ दे.