नमस्कार मित्रांनो..
एक काम करा एक १९-२० वर्षाच्या तरुणाची खोली डोळ्यापुढे आणा. सोयीसाठी आपण त्याचं नाव बंड्या??? नको खूप जुनं वाटतं. सनी ठेऊ. चालेल?? साधारण काय चित्र डोळ्यापुढे उभं राहील??? एका बाजूला कॉट आहे, ज्यावर इतका पसारा आहे की गादी आहे की नाही हेच दिसत नाही. पसारा म्हणजे काय हो, २ – ४ cd ची कव्हर्स पडली आहे, एखाद दुसरी वही आणि पुस्तक, ५-६ कपडे, आणि तो स्वतः. इतक्या सगळ्या गोष्टी असल्या की मग कशी काय गादी सापडेल??? ही झाली कॉट. दुसरीकडे कधीही न अवरलेल कपाट. न अवरलेल म्हणजे जर उघडलं तर किमान ७-८ गोष्टी खाली आल्याच पाहिजेत. एका बाजूला अभ्यासासाठी म्हणून वडिलांनी कौतुकानी घेतलेलं टेबल. पण चिरंजीवांनी जणू तिथे कधीच अभ्यास न करण्याचा चंग बांधलेला असतो. त्यावर फक्त परीक्षे आधी २-३ दिवसच हात लावण्यासाठी घेतलेली वह्या पुस्तकं, मुलगा कॉमर्सचा असेल तर पुस्तकांची जागा शार्प्स घेतात इतकाच काय तो फरक. बाकी हात लावण्याचा काळ सारखाच. एका कोपऱ्यात क्रिकेटचं किंवा तत्सम कोणत्या खेळाचं समान पडलेलं. आणि हो एका स्पेशल टेबलवर मुलाचा लाडका मित्र…. संगणक… हे महाराज आपले दिवसभर त्याच्याशी हितगुज करण्यात मग्न होऊन बसलेले असतात.
मित्रांनो ही सगळी रचना तुमच्या पुढे अशासाठी उभी केली की ती जर तुमच्या डोळ्यापुढे आली तर मी पुढे जे सांगणारे ते तुम्हाला छान एन्जॉय करता येईल. हा तर आपण मगाशी सगळी खोली डोळ्याखालून घातली. अशीच ती सनीच्या मातोश्रींनी पण घातली. आणि सनीचा कान धरून सांगितला की आजच्या आज जर ही खोली आवरली नाहीस न तर जेवायला देणार नाही. तर बच्चमजी म्हणाले… चालेल आई मी बाहेर जाईन… त्यावर बिचाऱ्या आईसाहेब काय करणार??? मुकाट्याने दाराबाहेर गेल्या.. आणि बेट्याला आताच कोंडून ठेवला.. म्हणाल्या आता जा बाहेर जेवायला, आधी खोली आवर मग बाहेर काढीन तुला.
बिच्चारा सनी…. मग तोही चिडला आणि आतून कडी लावून घेतली. थोडी आदळ आपट केली पण काही उपयोग नाही. म्हणून शेवटी खोली आवरायचं ठरवलं. शेवटी नाइलाजानी का होईना, आपण साफ होणार म्हणून त्या खोलिनी निश्वास टाकला.
अशा रितीने सनी महाराज कामाला लागले. एक एक पसारा पहिले जमिनीवर ओतला. ते चित्र बघितलं ना तर काय वाटेल सांगू का?? जुना बाजार असतो ना ढिगानी वस्तू लावून ठेवलेल्या असतात त्यात.. त्यातलं दुकान वाटत होता.. काय काय गोळा केलेलं.. वा वा… अगदी इयत्ता पहिली पासूनच्या गोष्टी असाव्यात. त्या जशा जशा डोळ्यासमोर येत गेल्या तसा हा पठ्या विसरत गेला की आपल्याला हे सगळे आवरायचे आहे. बेटा त्या एकेका गोष्टीत इतका हरवत जायचा. जणू त्याच्या डोळ्यासमोर तेव्हाच्या सगळ्या घटनांचा जणू चित्रपटच चालू होता. त्याला दिसत होते ते त्याचे लहानपणीचे मित्र मैत्रिणी; हा पप्पू, ही रिंकी, ही टीना, हा राक्या, अरे बोनी कुठे दिसत नाही ते… अरे हा सापडला… हा आपल्या मुंजीतला फोटो. सगळेच आहेत की जमलेले. सध्या कुठे असतील हे सगळे?? बऱ्याच दिवसात,,, छे छे वर्षात म्हणावे लागेल, बऱ्याच वर्षात भेटले नाहीयेत. हा सगळा ९वी चा ग्रुप. हाच सगळाच्या सगळा पुढे १०वी ब मध्ये आलेला.फक्त तो विकी तेवढा नव्हता आपल्यात, नाही. शाळा बदलली त्यांनी. काय करतोय कुणास ठावूक. अरे हा बॉक्स कसला आहे??? अरे बापरे कसे विसरलो आपण??? यात तर सगळी भेट कार्ड आहेत आपल्याला मिळालेली. वाढदिवसाची, दिवाळीची, नवीन वर्षाची. हे कोणी दिलेलं?? हे नीरज चं, हे कोण सारंग, हे सायली, हे अप्पू, हे.. असू देत खूप आहेत.. नंतर बघू.
असं सगळं चालू होता. बाहेर आई आपली वाट बघतेय महाराज आत्ता येतील मग येतील. तिला कुठे माहिती आहे आत काय चालू आहे. ती वाट बघतेय त्याची जेवायला. हाक मारून पण काही उपयोग नाही झाला. सनी तंद्रीत होता ना… जाऊन कडी उघडून बघितली तर त्यांनी आतून लावून घेतलेली…. शेवटी तिने नाद सोडून दिला आणि जेवून घेतलं आणि झोपली. हे महाराज सगळ्या आठवणींमध्ये फिरून आल्यावर भानावर आले. बघतात तर घड्याळात दुपारचे ५ वाजलेले. भराभर सगळं आवरलं. आणि बाहेर पडायला जातो तर दर बंद. मग त्याला आठवतं.. अरे आईनी दर लावलेलं आवरत नाही म्हणून. मग हाक मारल्यावर आईनी दर उघडलं आणि आधी घाई घाईत त्याच्यावर प्रश्नांचा भडिमारच सुरु केला. आणि मधेच थबकलिच खोलीचं रूप बघून. आणि लाडाने सनीला जवळ घेत म्हणाली. अरे बाबा मला किती काळजी वाटत होती. वाटलं काय करतोय हा दार लावलं तर… मी मध्ये उघडून बघायला आले तर तू आतून लावून घेतलेलस. चल जेवायला भूक लागली असेल ना???
अशी एकंदरीत ती खोली आवरली गेली पण त्याबरोबरच सनीला त्याच्या आठवणीच्या खजिन्यातले अनेक हरवलेले मोती मिळवून देणारी ठरली. मग मित्रांनो तुम्ही कधी शोधताय तुमचे हरवलेले मोती???? तुमच्या उत्तराची वाट बघतोय हं….
Leave a Reply