
या बंद कोठडीला आहे एकच खिडकी,
वर उंच, आणि गजांनी बंद असलेली.
दिसत नाही काहीच मला त्यातून, पण…
ऐकू येतात मला आवाज अनेक.
दिवस सुरू होता होता कोठडीतील अंधार पालटायच्या आधी
मला जाग येते ती किलबिलाटानी,
बहुदा कोपऱ्यावर एक डेरेदार वृक्ष असावा
ज्यावर असावीत बांधली घरटी असंख्य पक्षांनी.
थोड्याच वेळात किलबिलाटाची जागा घेतात ते मोटारींचे आणि दुचक्यांचे आवाज नि कर्कश भोंगे.
मग इथलाही दिवस सुरू होतो आणि
जणू आकाशवाणीचे सभा संपावी तशी या रेडिओ पासून आमची ताटातूट होते, ती पुन्हा संध्याकाळच्या सभेत भेट होण्यासाठी.
वाहनांचे आवाज कमी कमी होत जातात आमची जेवणं उरकून दिवे मालवले जाई पर्यंत.
आणि उरतात माझ्या सोबतीला रातकिड्यांचे, दूर भुंकणाऱ्या कुत्र्याचे आणि वटवाघळांच्या फडफडण्याचे आवाज.
आणि आलीच तर चंद्रप्रकाशाची एखादी तिरीप.
कारण, माझ्या बंद कोठडीला आहे एकच खिडकी,
वर उंच, आणि गजांनी बंद असलेली.
ज्यातून दिसत काहीच नाही, पण ऐकू येतं, बाहेरचं सारं जग…
~~~
आदित्य साठे
१३-०५-२०२०
गजांची खिडकी, Adi’s Journal च्या YouTube Channel वर
ही कविता मला सुचली ती स्स्नेनेहल एकबोटे या माझ्या चित्रकार मैत्रिणीच्या या चित्रावरून. स्नेहल एक उत्तम छायाचित्रकार देखील आहे. तिची चित्रे व छायाचित्रे तुम्ही तिच्या instagram handle वर जाऊन बघू शकता…
Leave a Reply