शांत निरव संध्याकाळ, जरा रात्रीकडे झुकलेली. क्षितिजावर रक्तिम छटा पसरलेली होती. आजूबाजूला असलेला माणसांचा वावर मनाला जाणवत नव्हता. कुठल्याश्या अनामिक पोकळीत ते कधीचे भरकटत होते. भोवताली रोरावणारा समुद्र, धीर गंभीर आवाज करत त्या किनाऱ्यावर मला सोबत करत होता. अनवाणी चालताना ओल्या वाळूचा तो थंड स्पर्श मनाला सुखावून जात होता. पाठीमागे पाऊलांचे ठसे सोडत, आठवणींचा धागा पकडून पुढे जाताना माझे एकांडे मन भूतकाळात जात होते. स्वतःशीच आतल्या आत हितगुज करत होते.
कॅलीडोस्कोपच्या रंगीबेरंगी काचांतून येणारे रंगीबेरंगी कवडसे त्या संधीप्रकाशात मनाच्या पडद्यावर आठवणींची नक्षी उमटवत होते. साऱ्याच आठवणी हृद्य. कधी ओठांवर हसू तर कधी डोळ्याच्या पाणावलेल्या कडा. स्वतःशीच चाललेला हा संवाद समुद्राच्या त्या गंभीर आवाजाच्या लयीत झोके घेत होता. कधी गोड आठवणींचा हा प्रवास किती वेळ चालू होता कळायला भान नव्हते. संधीप्रकाशाचा मिट्ट काळोख कधी झाला कळलेच नाही.
त्या प्रवासाला वेळेचे भान नव्हते, मुक्कामाचा पत्ता नव्हता. प्रवास अखंड चालू होता आणि चालू राहणार होता. असंख्य विचारांच्या लाटांवर लाटा येत होत्या. मनावर उमटणाऱ्या आठवणी लाटेबरोबर पुसल्या जाणाऱ्या पाउलखुणांबरोबरच वाहून जात होत्या. पुन्हा पाटी कोरी. आठवणींच्या नवीन नक्षी साठी. फक्त पुढची लाट येई पर्यंत.
आलेली लाट आधीच्या पाउलखुणा बरोबर घेऊन गेली. सागर किनाऱ्याची ती कोरी पाटी बघून क्षणात तुझी आठवण आली. अशाच ओल्या वाळूवर तू कलाकुसरीसह लिहिलेले तुझे नी माझे नाव लाट घेऊन गेली म्हणून थोडा मागे बसलेल्या माझ्याकडे तू तक्रार करत आली होतीस. आठवतंय? तक्रार करत शेजारी येऊन बसलीस. हातात हात घेऊन. त्या दिवसापासून तुला सांगीन म्हणतो पण जमत नव्हतं. तुझ्या बोलण्याकडे माझं लक्ष नसतं म्हणून तु कायम चिडचिड करायचीस. एक दिवस अशीच चिडून जी निघून गेलीस ती कायमचीच. तेव्हापासून मनात लपलेल्या गोष्टी आज बाहेर उतरल्या बघ.
तुझ्या बरोबर असताना मन कस शांत असायचं. एकदम निश्चल. विचारांची गर्दी सोडाच पण एकही विचार डोकवायचा नाही. त्याही दिवशी असाच झालं. हातात हात घेऊन अशीच शेजारी बसलेलीस, खांद्यावर मान टाकून. शांत निवांत किनाऱ्यावर. माझी नजर तुझ्या लांबसडक बोटांवर खिळलेली. माझ्या हातावर तुझ्या बोटांनी काहीबाही रेघोट्या मारत बोलत होतीस. तुझ्या नाजूक बोटाचा स्पर्श, हळुवार येणारे लाडिक शब्द. एक झिंग चडत गेली. शब्द कानावर पडत होते पण डोक्यापर्यंत काही केल्या पोचत नव्हते. जणू तुझ्या स्पर्शाची नशा अंगात भिनलेली होती. आणि अचानक खडबडून हलवल्याने मी भानावर आलो.
इतका वेळ मंजुळ असलेला तुझा आवाज चिडका होता आणि माझं कधीच लक्ष नसल्याची तक्रार करत तू उठतेस न चालायला लागलीस. मीही तडक उठून तुझी मनधरणी करायला मागे धावलो. वाळूवर तसेच पावलाचे ठसे सोडत. तेव्हा कल्पनाही नव्हती असेच ठसे सोडत तू कधी तरी निघून जाशील ती पुन्हा कधीही न येण्यासाठी. येणाऱ्या लाटेबरोबर वाळूवरची पावले तर वाहून गेली. पण मनावर उमटलेली ती पावलं अजूनही तशीच आहेत. ती कधी वाहून जातील तर माझ्याबरोबरच.