Your cart is currently empty!
महाराष्ट्राचे प्रातःस्मरणीय शककर्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज “तारखेनुसार” जयंती. त्यानिमित्तानी नुकताच गणेशउत्सवात दिसणाऱ्या “मी येतोय” च्या धरतीवरचा ‘देव येतोय’ असं लिहिलेला वर दिलेला फोटो माझ्या एका मित्रानी एका whatsapp ग्रुपवर पाठवला. पण मला आज हा फोटो पाहून एक गोष्ट खटकते आहे ती म्हणजे महाराजांना आपण देतोय ते ‘देवत्व’. थांबा, कोणतीही टोकाची प्रतिक्रिया देण्या आधी कृपाकरून मी लिहितो आहे ते पूर्ण शेवटल्या शब्दापर्यंत वाचा. छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत थोर, धोरणी आणि दूरदृष्टी लाभलेले महान राज्यकर्ते होते यात शंका नाही. कोणत्याही मराठी माणसाचे याबाबत दुमत असणे अशक्य आहे. किंबहुना मराठीच का, जगभरात त्यांचे समकालीन किंवा त्यांच्या काळानंतर झालेले अनेक अभ्यासक हेच मत मांडतात.
महाराजांच्या न भूतो न भविष्यती अशा पराक्रमात त्यांना साथ देणारे त्यांनी टाकलेला शब्द झेलणारे आणि महाराजांसाठी जीव तळहातावर घेऊन काम करणारे लोक कोणत्या जातीपातीचे होते, कोणत्या धर्मातले होते, या वादात मला अजिबात रस नाही. पण महाराजांचे कर्तुत्व, त्यांचे धाडस, त्यांचे शौर्य, आपल्या सामर्थ्याची पूर्ण जाण ठेवून आखलेली विशेष अशी गनिमिकाव्याची रणनीती, निक्षून टाळलेला सैन्यातील हत्तींचा वापर, “रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये” अशी शिस्त लावणारी आज्ञापत्रे तसेच प्रसंगी आततायी शौर्य न गाजवत हौतात्म्य पत्करण्यापेक्षा चार पावले मागे येण्यातली ओळखलेली योग्यता हे सारे सारे एका प्रचंड मुत्सद्दी आणि तल्लख बुद्धीच्या राज्यकर्त्याची ओळख पटवून देणारे मुद्दे आहेत.
सरंजामशाहीत असलेली राजाची पराधीनता ओळखून उभारलेली नवीन सैनिकी व्यवस्था, जमिनीची लावून दिलेली रयतवारी, नव्याने निर्माण केलेली शेतसारा पद्धती, त्याकाळात दुष्काळानंतर उपलब्ध करून दिली जाणारी सरकारी गोदामातून शेतकी मदत मग ती बी-बियाणांच्या रुपात असेल किंवा जनावरांच्या स्वरूपातील असेल, जाणीवपूर्वक केलेली मार्गांची व्यवस्था असेल किंवा पाण्याच्या स्त्रोतांची व्यवस्था असेल, या साऱ्या गोष्टीतून त्यांच्या डोक्यात असलेला ‘रयतेच्या कल्याणासाठी सतत जागरूक राहणारा एक कुशल प्रशासक’ दिसून येतोच की.
महाराजांची सगळीच कारकीर्द काही १००% यश देणारी होती असे नाही. विशालगडावर अडकून पडण्याची वेळ असो की आग्र्याला नशिबी आलेली नजर कैद असो किंवा ज्याची परिणीती आग्र्याच्या प्रकरणात झाली ती मिर्झाराजा जयसिंगची महाराष्ट्राच्या उरावर थैमान घालणारी स्वारी असो, हे काही अपयश या महान राजाला पचवावे लागलेच होते. पण महाराजांची जिद्द आणि स्वाभिमान इतका प्रबळ होता की या साऱ्यांच्या नाकावर टिचून महाराजांनी स्वतःचे सार्वभौम राज्य निर्माण केले. सार्वभौमत्व मिळवल्याखेरीज राज्यास स्थैर्य नाही हे ओळखून पैठणच्या ब्रह्मवृंदाने नकार दिलेला असतांना काशीच्या गागाभट्टांना (ज्यांनी स्वतः काशी विश्वनाथावर पडलेले घणाचे घाव बघितले होते आणि या राज्याभिषेकाची आवश्यकता आणि त्याचे महत्व ओळखले होते) पाचारण करून राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेकाच्या निमित्ताने नवीन कालगणना सुरु करत महाराज ‘शककर्ते’ झाले. छत्रपती झाले.
इतके देदीप्यमान कर्तुत्व असतांना तुम्हा आम्हा पामराला त्याजागी देवत्व दिसले नाही तरच नवल आहे. पण आपण कटाक्षाने ते देवत्व या महामानवाला देणे टाळले पाहिजे. महाराजानाचा पराक्रम जर आपण त्यांना मानव ठेवूनच बघितला तर तो अधिक भव्यदिव्य आणि उदात्त वाटत नाही का? एकदा देवत्व दिलं की चमत्कार आले, दैवी ताकद आहे मग “छे त्यांना काय अवघड होतं” हा भाव आला. अर्थात सगळ्यांच्याच मनात येईल असं नाही पण जे आज इतक्या शतकांनी ‘श्रीरामाच्या’ बाबतीत होतं आहे ते छत्रपतींच्या बाबतीत होऊ नये. त्यांचे कर्तुत्व देवत्वाच्या आड झाकोळले जाउ नये इतकीच अपेक्षा आहे.
~~~
आदित्य साठे
Adi’s Journal
१९-०२-२०१८
Discover more from Adi's Journal
Subscribe to get the latest posts sent to your email.
Leave a Reply