ललित

वास्तविक ललित साहित्याची गोडी लागली तेव्हा ह्यालाच ललित साहित्य म्हणतात हे देखील कळत नव्हतं. नेमका प्रसंग अथवा कोणाच लिखाण वाचलं ते आठवत नाही पण ‘अरे या आठवणी, हे अनुभव वाचायला आपल्याला जास्त आवडतंय’ इतक्या साध्या आवडीतून ते चालू झालं. मराठी वृत्तपत्रांच्या रविवार विशेष पुरावणीतले असे लेखच बहुदा याला कारणीभूत असावेत. लहानपणीची गोष्टी शोधणारी नजर हळूहळू असे लेख शोधू लागली होती.

अनेक विषयांवर छोटेखानी लेख मला फार विशेष वाटायचे. शाळेत असतानाचे हे वेड पुरवायचा एकमेव मार्ग म्हणजे रविवार विशेष पुरवण्या. घरी येणारा गावकरी अन् सकाळ वाचून झाले की शेजारी – पाजारी येणारे इतर पेपर धुंडाळायला मी पसार व्हायचो. त्यावेळी कादंबरी वगैरे इतर दीर्घ विस्ताराच्या लिखाणाकडे माझं फारसा ओढा नव्हता (तसा तो अजूनही कमीच आहे पण आजकाल मधून मधून ते पण वाचले जाते.) त्यामुळे घरच्यांनी वाचनालयातून आणलेल्या पुस्तकांवर माझं डोळा फारच कमी असे.

पुढे सायकल पिटाळीत शाळेत जाणे चालू झाले. माझ्या शाळेच्या रस्त्यावरच नाशिकचे सार्वजनिक वाचनालय लागायचे. माझे आजोबा त्याचे आजीव सभासद. घरी यायची ती पुस्तकं इथलीच असत. आता माझ्या रस्त्यात असल्यामुळे ‘अरे वाचनालय रस्त्यातच आहे तर जाता येता हे पुस्तक तेव्हडं बदलून आण.’ हे आईचं सांगणं माझ्या पथ्यावरच पडलं. ही संधी तेव्हा फार मोलाची वाटायची. माझ्या आवडीचं पुस्तक त्या प्रचंड ग्रंथ भांडारातून शोधून आणताना अलीबाबाची गुहा मिळाल्याचं समाधान वाटायचं. आवडीचे पुस्तक शोधत असताना एखादं पुस्तक चाळायला सुरवात झाली तर घड्याळानी तासभराची परिक्रमा कधी केली हे कळतच नसे.

त्या काळात कोणाकोणाचे लेखन वाचले हे विशेष आठवत नाही पण पुढे कॉलेजला गेल्यावर पुस्तकं विकत आणण्याचा नाद लागला. तेव्हा मात्र ललित लेखनामध्ये माझ्या मनात घर केलं ते शांताबाई शेळक्यांनी. त्यांचे कविता संग्रह कधी विकत घेतले नाहीत पण ललित लेखसंग्रहांची भुरळ मात्र मनावर कायम राहिली आहे. आजही अनेक वेळा ती जुनी पुस्तकं काढून कुठलेही पान उघडून वाचताना तितकाच आनंद मिळतो.

शांताबाईंबरोबरच प्रवीण दवणे, अनिल अवचट, द. मा. मिरासदारांचे काही लेख, विजय तेंडुलकरांचे ललित लेखसंग्रह, डॉ. विजया राजाध्यक्षांच लिखाण, इरावती कर्वे, दुर्गा भागवतांची पुस्तकं यात त्यांच्या लेखणीतून उतरलेले अनुभव, त्यांचे विचार मनाचा ठाव घेतच होते. एकीकडे मराठीतली ही विचार आणि अनुभवांची भिक्षांदेही चालू असताना इग्रजी भाषेच्या प्रचंड ग्रंथ भांडाराच्या दालनाच दार माझ्यासाठी उघडलं.

हे दालनही प्रचंड भव्यच, पण इथेही पहिली धाव गेली ती ललित लेखनाकडेच. तसं बघितलं तर मी वाचलेलं पाहिलं इंग्रजी पुस्तक सुधा मूर्तीचं ‘वाईज् – अदरवाईज्’ त्यातली सोपी भाषा आणि मनाला भिडणारी शैली बघून मी सुधाजींची बाकी पुस्तकं अगदी अधाशासारखी वाचून काढली. सुधाजींच्या दक्षिण भारतात भ्रमंती झाल्यावर बोट धरलं ते थेट देहरादूनच्या पर्वतराजीत रमणाऱ्या रस्किन बाँड या अँग्लो – इंडिअन आजोबांच. अर्थात मी बोट धरलं तेव्हा ते आजोबा झाले होते पण त्याचं जुनं लिखाण वाचताना जणू त्यांच्या तोंडूनच ते अनुभव आपण ऐकतोय असंच वाटतं. पुढे प्रीती शेनॉय च्या ’३४ बबलगम्स अँड कँडीज्’चा आस्वाद घेत एखाद्या महानगराच्या पार्श्वभूमीवर लिहलेलं लिखाण वाचलं. पण नंतर इंग्रजीमध्ये माझं मोहरा कथाविश्वाकडे वळला.

आजकाल फेसबुकच्या विवध समूहातून असं स्फुट लेखन करणारे अनेक छान छान लेखक भेटले आहेत. हे नवीन आजकाल माध्यम फार प्रभावी झालं आहे. तात्या अभ्यंकर, कल्याणी बापट, मधुसूदन थत्ते, वैदेही शेवडे, भक्ती असे अनेक जण आपापल्या पोतडीतील विचारांची मुक्त उधळण माझ्यासारख्या रसिकांवर करत असतात. त्याचाही आस्वाद घेणं चालूच असतं. माझीही लिखाणाची किरकोळ आवड मी त्या समूहांवर भागवत असतो.

आता वाचनाच्या कक्षा रुंदावल्यात, इतरही अनेक लेखन प्रकार आवडू लागले आहेत. पुस्तकं विकत घेता घेता आता कपाट भरू लागलंय. पण आजही माझे पाय जरा जास्त वेळ रेंगाळतात ते ललित लेखसंग्रहांपाशीच. मग ते मराठी पुस्तकांचे भांडार असलेलं ‘अक्षरधारा’ असो की इंग्रजी पुस्तकांचा खजिना असलेलं ‘क्रॉसवर्ड’.

Leave a Reply

%d bloggers like this: