काळजात उतरलेली कट्यार

18192468_1919179508297339_3990675473360239615_o.jpg

अगदी राजे रजवाड्यांच्या काळापासून साहित्य संगीत नृत्य नाट्य आपल्या महाराष्ट्राला तसे नवे नाही. पण अभिनय आणि संगीत यांच्या एकत्र जोडीने मराठी मनाचा पगडा घेतला तो संगीत नाटकाच्या उदयापासून. देवल, खाडिलकर, मास्टर कृष्णराव, बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, राम गणेश गडकरी, इत्यादींपासून सुरू झालेला हा लेखक संगीतकार गायक ही नावं घेत घेत आपण पोचतो ते पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्यापर्यंत. सौभद्र, शाकुंतल, एकच प्याला, वगैरे नाटकांतून घेतल्या गेलेल्या विषयांपेक्षा एकदम वेगळा विषय दारव्हेकर मास्तर घेऊन आले. तसा तो विषय काही अगदीच अपरिचित होता अशातला भाग नाही. महाराष्ट्राला असलेल्या थोर शास्त्रीय संगीत परंपरेत या विषयाची थोडी बहुत चर्चा होतीच. पण संगीतात अगदी खोलवर रुजलेल्या घराणेशाहीला इतक्या उघडपणे रंगमंचावर आणणे हे सुद्धा एक कौतुकच. आणि या विषयाला चार चांद लावले ते पंडित अभिषेकींनी. दोन घराण्यातील सांगीतिक भेद, वेगवेगळी सौंदर्यस्थानं आणि नाटकातील द्वंद्व अगदी ठसठशीतपणे उभं केलं आपल्या पदांमधून.

katyar_kaljat_ghusali_ver6

आणि नुकताच ३० तारखेला याच नाटकावर आधारित अफलातून चित्रपट Zee5 वर रिलीज झाला. सुबोध भावे पुन्हा एकदा ही अजरामर कलाकृती मराठी रसिकांसमोर घेऊन आला “कट्यार काळजात घुसली” या चित्रपटातून. जसं हे नाटक रुपेरी पडद्यावर उभं करणं मोठं कौशल्याचं आणि जबाबदारीचं काम होतं तसंच त्याचं संगीत निर्माण करणं एखाद्या शिवधनुष्यासारखच होतं. अभिषेकी बुवांनी संगीत दिलेली आणि वसंतरावांनी अजरामर केलेली पदं पुन्हा रेकॉर्ड करणं आणि शिवाय मूळ चालींमध्ये मिसळून जाईल अशा नव्या चाली बांधणं आजिबात सोपं काम नव्हतं. पण शंकर एहसान लॉय या त्रिकुटानी हे शिवधनुष्य नुसतं पेललं नाही तर त्यावर प्रत्यंचाही चढवली. मूळ नाटकातील ‘या भवनातील गीत पुराणे’ या पदाच्या ऐवजी येणार ‘दिल की तपिश’ हे गाणं अगदी खांसाहेब आफताब हुसेन यांच्या गायकीचे होऊन गेले आहे. आज अभिषेकी बुवा असते तर त्यांनी या चालीसाठी तिघांचे अफाट कौतुक केलं असतं.

तसे पाहिले तर सारेच भारतीय चित्रपट संगीत प्रधानच. त्यामुळे पाश्चात्य जगात असलेली musical film ही संकल्पना आपल्याकडे वेगळी अशी निर्माणच नाही झाली. पण तरीही मराठी चित्रपटातून काही संगीताच्या सभोवती कथा गुंफलेले काही चित्रपट आधीही होऊन गेले. लोकशाहीर राम जोशी, पिंजरा, आणि काही वर्षांपूर्वी आलेला नटरंग हे चित्रपट महाराष्ट्राच्या लावणीभोवती गुंफले गेले. पण प्रामुख्याने तथाकथित पांढरपेशा समाज आणि तमाशा यांच्यात असलेली दरी मोडून कुण्या एकाचा त्या क्षेत्रात निषिद्ध मानला गेलेला प्रवास या एका समान धाग्याने हे चित्रपट बांधले गेले आहेत.

या व्यतिरिक्त २००९ मध्ये आलेला जोगवा हा यल्लम्मा देवीच्या नावाने जोगवा मागत फिरणाऱ्या जोगत्यांच्या आयुष्यावरचा एक राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला चित्रपट. हे जोगते देवीची भजनं, जोगवे गात गात जोगवा मागत आयुष्य घालवत असल्याने या चित्रपटाची धाटणी सुद्धा एक musical चीच आहे. पण कट्यार… चा विषय आणि सांगीतिक संदर्भच त्याला या साऱ्या चित्रपटांपासून वेगळा काढतो.

नाही म्हणायला Morning Raga हा शबाना आझमी यांची भूमिका असलेला चित्रपट शास्त्रीय संगीताची बाजू चित्रपटांमध्ये घेऊन आला होता. आजच्या काळात जेव्हा आधुनिक संगीताचा बोलबाला आहे, रॉक मेटल वगैरे संगीत मोठ्या प्रमाणावर सादर होतं अशा वातावरणात शबाना आझमींच्या पात्राला त्यांचे कर्नाटक शास्त्रीय संगीत एक मोठया कार्यक्रमात सादर करायची महत्वाकांक्षा घेऊन जगत असते. पण कट्यारमधली महत्वाकांक्षा आपल्याला एका निराळ्याच जगात घेऊन जाते. कट्यारची गोष्ट उलगडते ती राजेरजवाड्यांच्या काळात जेव्हा कला आणि कलाकार राजाश्रयाने वाढत होती. ही एक अप्रस्थापित संगीतशैलीची प्रसिद्धीसाठीची महत्वाकांक्षा आहे.

ही महत्वाकांक्षा, एक वेगळ्याच पातळीवरचे अटीतटीचे सांगीतिक द्वंद्व, मानवी स्वभावाचे ईर्षा, असूया, प्रेम, कालासक्ती असे वेगवेगळे पदर हे सारे एक चित्रपटातून दाखवतांना नाटकात उपलब्ध नसलेलं स्थल स्वातंत्र्य या वेळी सुबोध भावेंनी दिग्दर्शक म्हणून फार सुंदरपणे हाताळले आहे. मला खात्री आहे की हा चित्रपट आपण सर्वांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन पहिला असेलच. पण इतकी सुंदर कलाकृती पुनःपुन्हा पाहण्याची संधी आता आपल्या अगदी दारात चालून आली आहे. तेव्हा ही संधी तुम्ही आजिबात दवडू नका आणि अभिषेकी बुवांच्या पदांसोबतच शंकर एहसान लॉय यांच्या गाण्यांचा, सुबोध भावे, सचिन पिळगांवकर, मृण्मयी देशपांडे, अमृता खानविलकर आणि प्रथमच अभिनय करणारे शंकर महादेवन यांच्या उत्तम अभिनयाचा आनंद घरबसल्या हवं तेव्हा नक्की घ्या.


Discover more from Adi's Journal

Subscribe to get the latest posts sent to your email.


Comments

One response to “काळजात उतरलेली कट्यार”

  1. Khup chhan article ??? abhyaspurna lekhan ??

Leave a Reply